प्रमोद पुराणिक
सेन्सेक्सचा ऐतिहासिक प्रवास थक्क करणारा आहे. बघता बघता त्याने चाळीस वर्षे पूर्ण केली. मात्र इतक्या वर्षांची सोबत ही त्याची वरवरची ओळख करून देणारीच. त्याला अंतर्बाह्य समजून घेण्यासाठी ती कदाचित पुरेशी नाही. खेदाची बाब हीच की, काळ इतका सरूनही अनेकांना तो अद्याप पूर्णपणे आकळलेलाच नाही. फार आकड्यांच्या पेचात जायचे नाही असे ठरवले तरी ते टाळताही येत नाही. सेन्सेक्सच्या मागचा-पुढचा विचार आपण करत असताना, ओघाने आकडे येणे अपरिहार्यच. चाळीस वर्षांपूर्वी, २ जानेवारी १९८६ या दिवशी निर्देशांकाचा पी/ई रेशो २३.१५ पट होता. याचा अर्थ ७,१६,१६२ कोटी रुपये अपेक्षित निव्वळ नफ्यासाठी बाजाराची १६५.८० लाख कोटी रुपये मोजण्याची तयारी होती. निर्देशांकाचे दर शेअर उत्पन्न (ईपीएस) ३,६१० रुपये होते. तर उत्पन्न दर ४.३२ टक्के होता.

आता काही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न. जर बँकेतील बचत खात्यावर ३.५ टक्के व्याज कोणताही धोका पत्करण्याची गरज नसताना मिळत असताना बाजारातले गुंतवणूकदार ४.३२ टक्के उत्पन्न दर का मान्य करतात? त्याचबरोबर मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार मूल्यांकन ४७०.५ लाख कोटी रुपये आणि निर्देशांकाचे (म्हणजेच त्यात सामील ३० कंपन्यांचे एकत्रित) बाजार मूल्य जर त्यापैकी फक्त ३५ टक्केच असेल, तर मग ३५ टक्क्यांतील चढ-उतारासाठी उरलेल्या ६५ टक्क्यांवर अन्याय का करायचा? या प्रश्नांवर गुंतवणूकदार म्हणून आपल्यालाही विचार करावा लागेल.

निर्देशांक ही शेवटी गोळाबेरीज असते. सेन्सेक्सच्या नावच तो एक ‘संवेदनशील निर्देशांक’ असल्याचे सुचवणारा (जरी अनेकांच्या मनांत या संवेदनेबद्दल साशंकता असली तरी…) आहे. त्यामुळे कालानुरूप बदल हा निर्देशांकाचा स्थायी भाव आहे. व्यवसायातील बदल, विलीनीकरण व तत्सम इतर कारणांमुळे काही कंपन्या/ शेअर्स नव्याने सामील होतात, तर काही गळतात. उल्लेखनीय म्हणजे गत चाळीस वर्षात फक्त सात शेअर्स १९८६ मधील सुरुवातीपासून ते आजपावेतो निर्देशांकातील आपले स्थान अबाधित ठेवू शकले आहेत. हे सात शेअर्स म्हणजे – १. रिलायन्स इंडस्ट्रीज, २. टाटा स्टील, ३. टाटा मोटर्स (टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स), ४. लार्सन अँड टुब्रो, ५. हिंदुस्थान युनिलिव्हर, ६. आयटीसी, ७. महिंद्र अँड महिंद्र. अर्थात त्यांचे हे सनातन अढळ राहिलेले स्थान ही परतावादृष्ट्या त्यांच्या कामगिरीचेही द्योतक आहे असे नव्हे.

सेन्सेक्समधील दोष कोणते?

पहिला सर्वात मोठा दोष म्हणजे, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात शेती क्षेत्र आहे, परंतु निर्देशांकात या क्षेत्राला प्रतिनिधित्व नाही. ओढूनताणून संबंध जोडायचा तर महिंद्र ॲण्ड महिंद्र शेतीपयोगी ट्रॅक्टर्सचे उत्पादन करते, इतकाच. अन्यथा या कंपनीचा शेतीचा संबंध आहे असे म्हणता येईल? खतांचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत, पण एकाही कंपनीचा सेन्सेक्समध्ये समावेश नाही. पूर्वी गुजरात स्टेट फर्टिलायझर (जीएसएफसी) ही कंपनी निर्देशांकात होती.
हॉटेल उद्योगाला प्रतिनिधित्व नाही. आयटीसी हॉटेल्स ही आता आयटीसी लिमिटेडमधून वेगळी काढली गेलेली कंपनी आहे, हे लक्षात घेतले जावे. जहाज उद्योगातली जीई शिपिंग निर्देशांकात होती, ती आता नाही. सरकारी क्षेत्रातल्या जहाज निर्मिती कंपनीचा समावेश करता येईल, पण तसे झालेले नाही.

संरक्षण क्षेत्र प्रचंड वेगाने वाढ़ते आहे. फक्त एकच कंपनी निर्देशांकात आहे ती म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स. परंतु हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचा (एचएएल) देखील समावेश असावा, असे वाटते.
विमा क्षेत्र आणि म्युच्युअल फंडस् – ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या निर्देशांकांत नाहीत. पूर्वी इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित तसेच एकही सिमेंट कंपनी निर्देशांकात नव्हती. वारंवार वेगवेगळ्या फोरममध्ये ही मागणी केली गेल्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट निर्देशांकात आली.
नव्याने समावेश करण्यासाठी काही कंपन्यांची बेलाशक हकालपट्टी करावी लागेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातून निर्देशांकात फक्त एकमेव टीसीएस असावी. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातून फक्त एचडीएफसी बँक पुरेशी ठरेल. ज्या कंपन्यांचे फ्री-फ्लोट अर्थात उपलब्ध मूल्यांकन जास्त आहे अशाच कंपन्या सेन्सेक्समध्ये असाव्यात. इटर्नल (पूर्वीची झोमॅटो लिमिटेड) या कंपनीची तर निर्देशांकात आवश्यकताच नाही. अनुभव असाही आहे की, कंपन्यांचा काही ‘खास’ कारणांनी निर्देशांकात समावेश होतो. निकषांत न बसणारी ही वेगळी कारणे कशी काय असू शकतात? त्यामुळे निर्देशांकात समावेश कोणत्या कंपनीचा करायचा यासाठी सल्लागार मंडळ असावे. त्यात अर्थ पत्रकारितेचा अनुभव असलेली मंडळीही असावीत. म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्या यांनासुध्दा प्रतिनिधित्व मिळावे, असे वाटते.
शेवटी बाजारात राहायचे, तर निर्देशांकावर त्याच्या गुणदोषांसकट प्रेम, लोभ राखणे आपणांस अपरिहार्यच!