केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात समभागाच्या पुनर्खरेदीवरील कर आकारणीत पुन्हा बदल प्रस्तावित केला आहे. मागील दोन वर्षांतील हा दुसरा मोठा बदल आहे. समभागाची पुनर्खरेदी म्हणजे कंपनी स्वतःच्याच समभागाची भागधारकांकडून निविदेद्वारे किंवा खुल्या बाजारातून खरेदी करते. एखादी कंपनी विविध कारणांसाठी पुनर्खरेदीचा अवलंब करू शकते.
३० सप्टेंबर, २०२४ पूर्वी शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांनी पुनर्खरेदी केलेल्या शेअरवर झालेल्या भांडवली नफ्यावर गुंतवणुकदारांना कर भरावा लागत नव्हता. शेअर पुनर्खरेदीवर गुंतवणूकदाराला जरी कर भरावा लागत नव्हता तरी कंपन्यांना मात्र या व्यवहारावर २० टक्के इतका कर भरावा लागत होता.
१ ऑक्टोबर, २०२४ पासून समभागाच्या पुनर्खरेदीवरील कर आकारणीत बदल करण्यात आला. गुंतवणूकदारांना कंपन्यांकडून समभागाच्या पुनर्खरेदीवर मिळालेली संपूर्ण रक्कम ही ‘लाभांश’ म्हणून समजण्यात येते, या रकमेतून समभाग खरेदी किंवा इतर खर्चाची वजावट मिळत नाही. या ‘लाभांशा’वर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. कंपनीने समभागाची पुनर्खरेदी केल्यानंतर त्या समभागावरील हक्क संपल्यामुळे, करदात्याला ‘भांडवली तोटा’ होतो. हा भांडवली तोटा गणताना या समभागाची विक्री किंमत ही शून्य समजली जाते. हा भांडवली तोटा समभागाच्या धारणकाळानुसार अल्प किंवा दीर्घ मुदतीचा ठरविला जातो, हा भांडवली तोटा इतर भांडवली नफ्यातून वजा करता येतो. अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून तर दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो.
१ एप्रिल, २०२६ पासून या अर्थसंकल्पात या तरतुदीत पुन्हा बदल सुचविले आहेत. कर आकारणीची पद्धत बदलण्यात आली आहे. १ एप्रिल, २०२६ नंतर झालेल्या समभागाच्या पुनर्खरेदीवर, गुंतवणूकदारांना, ‘लाभांश’ म्हणून कर भरावयाचा नाही. या पुनर्खरेदीवर झालेला नफा किंवा तोटा आता ‘भांडवली उत्पन्न’ या उत्पन्नाच्या स्रोतात करपात्र असेल. यानुसार गुंतवणूकदाराने कंपनीने समभागाची पुनर्खरेदी करण्यापूर्वी हे समभाग १२ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केले असतील तर करदात्याला होणारा नफा किंवा तोटा दीर्घ मुदतीचा असेल आणि १२ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी धारण केले असतील तर करदात्याला होणारा नफा किंवा तोटा अल्प मुदतीचा असेल. शेअर बाजारात सुचिबद्ध नसलेल्या कंपनीसाठी ही मुदत २४ महिन्यांची आहे.
सामान्य गुंतवणूकदाराला भांडवली नफा गणताना समभागाचे खरेदी मूल्य आणि समभाग पुनर्खरेदीवर मिळालेली रक्कम विचारात घ्यावी लागेल आणि समभागाच्या धारणकाळानुसार कर भरावा लागेल. शेअर बाजारात सुचिबद्ध कंपनीच्या समभागाच्या पुनर्खरेदी व्यवहारात, एकूण दीर्घ मुदतीचा भांडवली नफा (ज्यावर रोखे उलाढाल कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स -एसटीटी भरला गेला आहे) जर १,२५,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर गुंतवणूकदाराला कर भरावा लागणार नाही.
असा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा १,२५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या रकमेपेक्षा जास्त रकमेवर १२.५ टक्के इतका कर भरावा लागेल. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर (ज्यावर एसटीटी भरला गेला आहे) गुंतवणूकदाराला २० टक्के इतका कर भरावा लागेल. शेअर बाजारात सुचिबद्ध नसलेल्या कंपनीच्या समभागाच्या पुनर्खरेदी व्यवहारात गुंतवणूकदाराला दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५ टक्के कर भरावा लागेल आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागेल.
सामान्य करदात्यांना वर सांगितल्याप्रमाणे कर भरावा लागेल. या अर्थसंकल्पात कंपन्यांच्या प्रवर्तकांसाठी या कराशिवाय, अतिरिक्त कर सुचविण्यात आला आहे. हा अतिरिक्त कर २ टक्के ते १७.५ टक्के आहे.
प्रवर्तक, कंपनी असेल तर समभागाच्या पुनर्खरेदीवर (अल्प आणि दीर्घ मुदतीच्या) भांडवली नफ्यासाठी २० टक्के कर अधिक अतिरिक्त कर २ टक्के असा एकूण २२ टक्के कर (जर शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीने समभागाची पुनर्खरेदी केली असेल तर) भरावा लागेल.
प्रवर्तक, कंपनी नसेल (उदा. वैयक्तिक करदाते) तर समभागाच्या पुनर्खरेदीवर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी २० टक्के कर अधिक अतिरिक्त कर १० टक्के असा एकूण ३० टक्के कर (जर शेअरबाजारात सूचिबद्ध कंपनीने समभागाची पुनर्खरेदी केली असेल तर) भरावा लागेल. शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपनीने समभागाची पुनर्खरेदी केल्यास प्रवर्तकाला अल्प मुदतीच्या नफ्यावर त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागेल.
प्रवर्तक, कंपनी नसेल (उदा. वैयक्तिक करदाते) तर समभागाच्या पुनर्खरेदीवर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी १२.५ टक्के कर अधिक अतिरिक्त कर १७.५ टक्के असा एकूण ३० टक्के कर भरावा लागेल. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या किंवा नसलेल्या कंपनीने केलेल्या समभागाच्या पुनर्खरेदीसाठी हाच नियम लागू आहे.
या तरतुदीसाठी शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीसाठी प्रवर्तकाची व्याख्या भांडवली बाजार नियामक सेबी (सिक्युरिटीजची खरेदी-विक्री) नियमावली किंवा कंपनी कायदा २०१३ प्रमाणे आहे. शेअरबाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपनीसाठी, कंपनीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे १० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सेदारी (शेअरहोल्डिंग) असलेली व्यक्ती प्रवर्तक आहे.
या बदललेल्या तरतुदीमुळे करदात्याच्या करदायित्वावर कसा फरक पडेल ते खालील उदाहरणातून समजून घेऊ या :
उदा. एका गुंतवणूकदाराने (प्रवर्तक सोडून) शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीचे ५०० समभाग प्रत्येकी १०० रुपयांना असे एकूण ५०,००० रुपयांना जानेवारी २०२५ मध्ये शेअर बाजारामार्फत खरेदी केले. या समभागांची फेब्रुवारी, २०२६ मध्ये कंपनीने प्रत्येकी २०० रुपयांस पुनर्खरेदी केली, या व्यवहारात गुंतवणूकदाराला एकूण १ लाख रुपये (५०० समभाग X २०० रुपये) मिळाले. हे १ लाख रुपये गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात ‘लाभांश’ म्हणून करपात्र असतील आणि त्यावर त्याला ३० टक्के दराने ३०,००० रुपयांचा कर भरावा लागेल आणि समभागाचे खरेदी मूल्य ५०,००० रुपये, दीर्घ मुदतीचा (समभाग १२ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केले असल्यामुळे) भांडवली तोटा म्हणून इतर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल किंवा पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्ड करता येईल. हा तोटा इतर भांडवली नफ्यातून वजा केल्यास किंवा कॅरी फॉरवर्ड केल्यास गुंतवणूकदाराचा ६,२५० (५०,००० रुपये तोट्यावर १२.५ टक्के इतक्या कराचा फायदा होईल). हा फायदा विचारात घेऊनसुद्धा गुंतवणूकदाराला २३,७५० रुपये (३०,००० लाभांशावरील कर वजा ६,२५० भांडवली तोट्यावर वाचलेला कर) कर भरावा लागेल.
या समभागांची एप्रिल, २०२६ मध्ये कंपनीने प्रत्येकी २०० रुपयांस पुनर्खरेदी केली, याचे गुंतवणूकदाराला एकूण १ लाख रुपये (५०० समभाग X २०० रुपये) मिळाले. गुंतवणूकदाराला या पुनर्खरेदीवर ५०,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला (पुनर्खरेदी मूल्य १ लाख रुपये वजा खरेदी मूल्य ५०,००० रुपये). या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याला १२.५ टक्के इतका म्हणजेच ६,२५० रुपये कर भरावा लागेल. करदात्याला याव्यतिरिक्त दुसरा दीर्घ मुदतीचा नफा झालेला नसल्यास करदात्याला कर भरावाच लागणार नाही (कलम १९८ नुसार प्रथम १,२५,००० रुपयांवर कर नाही)
या उदाहरणात ३१ मार्च, २०२६ पूर्वीच्या तरतुदीनुसार गुंतवणूकदाराला २३,७५० रुपयांचा कर (भांडवली तोट्याचा फायदा घेऊन) भरावा लागतो, या नवीन सुचविलेल्या तरतुदीनुसार करदात्याला फक्त ६,२५० रुपये इतका कर भरावा लागेल आणि कलम १९८ नुसार इतर नफा नसल्यास करदात्याला कर भरावाच लागणार नाही.
जिथे कराचा दर दर्शविलेला आहे त्यात ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर आणि लागू असलेला अधिभार याचा समावेश नाही.
या नवीन सुचविलेल्या तरतुदीमुळे सामान्य गुंतवणूकदारांची क्लिष्ट तरतुदीपासून सुटका तर होईलच शिवाय करसुद्धा वाचेल, प्रवर्तकांनासुद्धा या नवीन तरतुदीचा फायदा थोड्या कमी प्रमाणात मिळेल. गुंतवणूकदारांना भविष्यात अशी संधी मिळाल्यास त्यांनी त्याचा जरूर विचार करावा.
प्रवीण देशपांडे – लेखक सनदी लेखापाल आहेत.

