आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार. म्हणजेच चलनवाढ / महागाई वाढणार हे आपण समजू शकतो. इराण – इस्रायल, अमेरिका युद्धाने चरणसीमा गाठल्यामुळे भांडवली बाजार गडगडणे हे पण स्वाभाविकच. पण अशा अनिश्चिततेच्या वेळेला गुंतवणूकदारांचा प्रथम भरवसा हा सोन्या, चांदीच्या गुंतवणुकीवर असतो. युद्धकालीन परिस्थितीत नेहमीच सोन्या, चांदीचे भाव वधारतात. या वेळेला सोन्या-चांदीने युद्धाच्या अगोदरच अशी काही तेजीची आतिषबाजी करत, तेजीचे फटाके फोडले की अवघ्या पाच महिन्यांत १,१०,००० रुपयांवरची चांदी ४,२०,००० रुपये, तर सोने ९८,००० रुपयांवरून १,८०,००० रुपयांवर झेपावले.
सोन्या, चांदीचे भाव हे झपाट्याने भूमिती श्रेणीत झेपावल्याने या मौल्यवान धातूंची लकाकी झाकोळणार हे ठरलेलेच. झालंही तसेच, अवघ्या तीन दिवसांत चांदी ४,२०,००० रुपयांवरून, २,२६,००० रुपये, तर सोन्याचे भाव १,८०,००० रुपयांवरून १,३३,६८७ रुपयांवर घसरले. या वेळेला संपत्ती संकलन करणारी विविध स्रोत / क्षेत्रच युद्धांनी प्रभावित झाल्याने, सर्वच क्षेत्र मंदीचा सूर आळवत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणत आहेत आणि सर्वांची कृती ही ‘ऑल फेल डाऊन’ अशी धाटणीची आहे. आताच्या उदास, विषण्ण अशा सामाजिक, आर्थिक परिस्थितीला कविवर्य सुधीर मोघे यांच्या ‘मन मनास उमगत नाही, आधार कुठे शोधावा!’ या काव्यपंक्तीचा आशय अगदी चपखल बसतो. जशी काळ्या ढगाला रुपेरी किनार असते तसेच आज आपण भांडवली बाजारासाठी रुपेरी किनार शोधू या.
तांत्रिक विश्लेषणातील ऑक्सिलेटर परिमाणातील ‘आरएसआय’ (रिलेटीव स्ट्रेन्ग्थ इंडेक्स) हे परिमाण आजच्या घडीला महत्त्वाचे ठरावे. बाजाराचा तळ अथवा उच्चांकाचे भाकीत करण्यासाठी या परिमाणाचा आधार घेतला जातो. जसे की नीचांक शोधण्यासाठी साप्ताहिक आलेखावर (वीकली चार्ट) ‘आरएसआय’ ३० अंशांवर येतो तेव्हा नीचांक दृष्टीपथात असतो. सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकाचा ‘आरएसआय’ ३० अंशांवर आलेला आहे. दुसरे परिमाण म्हणजे, घातक चढ, उतार, घुसळणीचा / व्होलॅटॅलिटी निर्देशांक – ‘विक्स’ हा २८ वरून सद्य:स्थितीत २५.५ वर आहे. सर्वसाधारणपणे ‘विक्स’ २८ ते ३० च्या दरम्यान बाजाराचा तळ गाठला जातो. तसेच गॅन कालमापन (गॅन टाइम सायकल) पद्धतीप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत निफ्टीने २१,८०० ते २३,००० या परिघात पायाभरणी केल्यास, निफ्टी निर्देशांक मंदीच्या गर्तेतून बाहेर येऊन, भांडवली बाजारात सुधारणा अपेक्षित आहे. या सुधारणेचे वरचे लक्ष्य २३,५००, २३,८०० ते २४,००० असे असेल. निफ्टी निर्देशांक २४,००० च्या स्तरावर सातत्याने एक महिना टिकल्यास निफ्टी निर्देशांक २५,३०० वर झेपावेल.
बँक निफ्टी निर्देशांक:
२ एप्रिलचा बंद भाव : ५१,५४८.७५ / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५१,०००
बँक निफ्टी निर्देशांकाने ५१,००० चा स्तर सातत्याने राखल्यास त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ५२,०००, द्वितीय लक्ष्य ५३,००० ते ५४,००० असेल. बँक निफ्टी निर्देशांकाला ५१,०००चा स्तर राखण्यास अपयश आल्यास बँक निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य ५०,०००, तर द्वितीय खालचे लक्ष्य ४९,००० असेल.
सेन्सेक्स:
२ एप्रिलचा बंद भाव: ७३,३१९.५५ / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७३,०००
सेन्सेक्सने ७३,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ७४,००० आणि द्वितीय लक्ष्य ७५,५०० असेल. सेन्सेक्स ७३,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास त्याचे खालचे लक्ष्य ७१,५०० असेल.
सोने (एमसीएक्स आधारित):
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,५०,००० रुपये
एमसीएक्स बाजारावरील सोन्याच्या किमतीने १,५०,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,५५,०००, द्वितीय वरचे लक्ष्य १,५८,००० असेल. एमसीएक्सवरील सोन्याच्या किमती १,५०,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, किमतीचे खालचे लक्ष्य १,३५,००० असेल.
चांदी (एमसीएक्स आधारित):
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,३०,००० रुपये
एमसीएक्स बाजारावर चांदीच्या किमतीने २,३०,०००चा स्तर सातत्याने राखल्यास, तिच्या किमतीचे प्रथम वरचे लक्ष्य २,३८,००० ते २,४५,०००, तर द्वितीय वरचे लक्ष्य २,५०,००० ते २,६५,००० असेल. एमसीएक्सवर चांदीच्या किमतीला २,३०,०००चा स्तर राखण्यास अपयश आल्यास, चांदीच्या किमतीचे प्रथम खालचे लक्ष्य २,२५,०००, द्वितीय खालचे लक्ष्य २,१५,००० असेल.
(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत, ई-मेल: ashishthakur1966@gmail.com)
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.
