Share Market Crash Marathi Tips : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतचा तात्पुरता शांतता करा संपल्याची धोषणात करताच भारतीय शेअर बाजाराला मोठा तडाखा बसला. ८ जुलै रोजी मार्च महिन्यानंतरची सर्वात मोठी एकाच दिवसातील घसरण पाहायला मिळाली. परिणामी एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल ८ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. मात्र, चढ-उतार हा शेअर बाजाराचा स्वभाव आहे. उलट अशा पडझडीच्या काळात पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्याची आणि स्वस्त मूल्यांवर गुंतवणूक करण्याची मोठी संधी असते. यासाठी आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या ६ टीप्स पाळणे आवश्यक आहे.

१. घसरणीला घाबरून शेअर्स विकू नका

आर्थिक सल्लागारांच्या मते, बाजारातील तीव्र घसरण हा प्रत्येक गुंतवणूक चक्राचा एक सामान्य भाग असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊन घाईघाईत शेअर्स विकून बाहेर पडू नये. ‘एनरिच मनी’चे संस्थापक आणि सीईओ पोनमुडी आर. यांच्या मते, “गुंतवणूकदारांनी या घसरणीकडे आपल्या पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे.”

२. केवळ स्वस्त नव्हे, तर दर्जेदार शेअर्स खरेदी करा

बाजार घसरला की प्रत्येक शेअर्स स्वस्त मिळतो, पण सर्वच शेअर्स चांगले नसतात. तज्ज्ञांच्या मते, मजबूत ताळेबंद, चांगला रोख प्रवाह आणि सातत्यपूर्ण नफा असणाऱ्या लार्ज कॅप ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवावी. अशा कंपन्या मंदीचा सामना चांगल्या प्रकारे करतात. याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तू, आरोग्य सेवा आणि उपयुक्तता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे, कारण मंदीतही या वस्तूंची मागणी कमी होत नाही.

३. म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ सुरूच ठेवा

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारातील चढ-उतारांना तोंड देण्याचा ‘एसआयपी’ हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतात, ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी होते. मंदीच्या काळात एसआयपी सुरू ठेवणाऱ्यांना बाजार सावरल्यावर सर्वाधिक नफा झाला आहे.

४. स्थैर्यासाठी सोने आणि मुदत ठेवींचा आधार घ्या

पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी केवळ शेअर्सवर अवलंबून न राहता सोने आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्येही गुंतवणूक करावी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना टॅरिफची धमकी दिल्यानंतर डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्यात तात्पुरती घसरण झाली आहे. मात्र, ‘इन्व्हायएसेट पीएमएस’चे बिझनेस हेड हर्षल दासाणी यांच्या मते, “केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सुरूच आहे आणि भू-राजकीय जोखीम कायम असल्याने, या घसरणीचा फायदा घेऊन सोन्याची हळूहळू खरेदी करावी.” सोने हे पोर्टफोलिओसाठी उत्तम संरक्षण कवच ठरते.

५. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा

रोजच्या बातम्या वाचून किंवा घसरण पाहून नकारात्मक होऊन निर्णय घेऊ नका. ज्या गुंतवणूकदारांकडे अतिरिक्त पैसे शिल्लक आहे, त्यांनी एकदम मोठी रक्कम न गुंतवता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. लार्ज-कॅप शेअर्स, एसआयपी, सोने आणि फिक्स डिपॉझिट यांचे योग्य मिश्रण असलेला पोर्टफोलिओच दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकतो.

६. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँक मुदत ठेव

सुरक्षित परतावा शोधणाऱ्या पारंपरिक गुंतवणूकदारांसाठी फिक्स डिपॉझिट हा आजही सर्वोत्तम पर्याय आहे. शेअर बाजारातील चढ-उतारांचा एफडीवर कोणताही परिणाम होत नाही आणि मुद्दल सुरक्षित राहते. ८ जुलै २०२६ च्या आकडेवारीनुसार, सध्या विविध बँका सर्वसामान्य नागरिकांना २.६०% ते ७.४०% प्रतिवर्ष दराने व्याज देत आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अधिक व्याजदर मिळत आहे. नियमित उत्पन्नासाठी किंवा पोर्टफोलिओच्या वैविध्यतेसाठी एफडी अत्यंत उपयुक्त ठरते.