ऑप्शन ‘मार्जिन’ (भाग २)
Future Market Margin Money: वायदे बाजारात व्यवहार करणे म्हणजे मोठ्या लाटांवर स्वार होण्यासारखे आहे. या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी मार्जिन मनी आवश्यक असतेही केवळ एक आगाऊ रक्कम नाही तर, बाजारातील अनिश्चिततेविरुद्ध आणि मोठ्या अनपेक्षित चढ-उतारांच्या काळात गुंतवणूकदारासाठी अतिरिक्त सुरक्षा कवच म्हणून कार्य करते. आपण गेल्या लेखात आरंभिक मार्जिनबाबत माहिती घेतली. आता त्यातील आणखी इतर प्रकारांची माहिती घेऊया.
एक्सपोजर मार्जिन (Exposure Margin)
जेव्हा गुंतवणूकदार प्रारंभिक मार्जिन’ भरतो, तेव्हा त्यातील एक भाग म्हणजे स्पॅन मार्जिन असते आणि दुसरा भाग म्हणजे एक्सपोजर मार्जिनचा असतो.
एक्सपोजर मार्जिन हे ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ म्हणून ओळखले जाते. बाजारात अनपेक्षितरीत्या होणाऱ्या हालचालींमुळे किंवा अचानक आलेल्या मोठ्या चढ-उतारामुळे जे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यापासून ‘ब्रोकर’ आणि बाजारमंचाचे संरक्षण करण्यासाठी हे ‘मार्जिन’ आकारले जाते.
हे मार्जिन ऑप्शन सेलर आणि फ्युचर्स ट्रेडर्स यांच्याकडून आकारले जाते. ऑप्शन बायरला हे मार्जिन देण्याची गरज नसते. एक्सपोजर मार्जिनचा मुख्य उद्देश म्हणजे ‘ब्लॅक स्वान’ (अचानक येणारी संकटे) सारख्या घटनांपासून वाचण्यासाठी असते. जर एखाद्या ‘ट्रेडर’ला मोठे नुकसान झाले आणि तो ते भरू शकला नाही, तर अशा वेळी हे मार्जिन ब्रोकरसाठी सुरक्षा कवच म्हणून कार्य करते. साधारणपणे, एक्सपोजर मार्जिन हे एकूण कराराच्या मूल्याच्या ठरावीक टक्के असते. उदा, समजा निफ्टीचा एक लॉट सेल करायचा आहे, ज्याचे एकूण मूल्य ७ लाख रुपये आहे. तर येथे स्पॅन मार्जिन ८०,००० रुपये आणि एक्सपोजर मार्जि (२ टक्के): १४,००० रुपये लागेल. म्हणजेच एकूण आरंभिक मार्जिनपोटी ९४,००० रुपये भरावे लागतील.
थोडक्यात सांगायचे तर, स्पॅन मार्जिन हे बाजारातील ‘ओळखता’ येणाऱ्या जोखमीसाठी असते, तर एक्सपोजर मार्जिन हे ‘अचानक’ येणाऱ्या जोखमीसाठी असते.
प्रीमियम मार्जिन (Premium Margin)
जेव्हा गुंतवणूकदार एखादा ऑप्शन विकतो, तेव्हा तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी जे मार्जिन भरावे लागते, त्याला ‘प्रीमियम मार्जिन’ म्हणतात. ऑप्शन खरेदी करणाऱ्याला (बायर) फक्त प्रीमियम रक्कम द्यावी लागते, परंतु विकणाऱ्याला (सेलर) संभाव्य जोखीम पाहता बाजारमंचाकडे हे मार्जिन जमा करावे लागते.
ऑप्शन बायरला प्रीमियम मार्जिन देण्याची गरज नसते; त्यांना फक्त प्रीमियमची मूळ किंमत द्यावी लागते. कारण, वायदे बाजारात ऑप्शन विकणाऱ्याची जोखीम अमर्याद असू शकते. जर बाजार अंदाजाच्या विरुद्ध वेगाने गेला, तर होणारे मोठे नुकसान भरून काढण्यासाठी बाजारमंच आधीच हे मार्जिन राखून ठेवते. हे एक प्रकारे जोखमीच्या विरुद्ध हमी म्हणून काम करते. ऑप्शन सेलरला प्रीमियम भरावा लागत नाही, उलट तो प्रीमियम त्याला मिळतो. मात्र, सेलरला मोठ्या प्रमाणात मार्जिन भरावे लागते.
असाइनमेंट मार्जिन (Assignment Margin)
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ‘असाइनमेंट मार्जिन’ ही महत्त्वाची संकल्पना आहे. विशेषतः जेव्हा एखादा ऑप्शन त्याच्या एक्सपायरीच्या (Expiry) म्हणजेच मुदत समाप्तीच्या जवळ असतो, तेव्हा हे मार्जिन लागू होते. जेव्हा एखादा ऑप्शन सेल करता, तेव्हा एक प्रकारे समोरच्या व्यक्तीला (बायरला) ठरावीक किमतीत शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा हक्क विकलेला असतो. जर एक्सपायरीच्या वेळी बायरने आपला हक्क बजावण्याचे ठरवले (म्हणजेच तो ऑप्शन ‘In-the-Money’ राहिला), तर त्या व्यवहाराची पूर्तता करावी लागते. ही पूर्तता करण्याची क्षमता आहे की नाही, हे तपासण्यासाठी ब्रोकर जे अतिरिक्त मार्जिन घेतो करतो, त्यालाच असाइनमेंट मार्जिन म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास, असाइनमेंट मार्जिन हे कराराच्या शेवटच्या टप्प्यावर व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी घेतलेली आगाऊ सुरक्षा रक्कम आहे.
देखभाल मार्जिन (Maintenance Margin):
देखभाल मार्जिन मुख्यत: फ्युचर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी घेतले जाते. ज्याप्रमाणे वाहन चालवताना इंधनाचा काटा एका विशिष्ट मर्यादेच्या खाली जाऊ देत नाही, तसेच ट्रेडिंग खात्यामध्ये हे मार्जिन काम करते. बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आणि तोटा वाढत गेला, तर ब्रोकरला आणि मंचाला देणी पूर्ण होतील याची खात्री हवी असते. हे मार्जिन एक ‘बफर’ म्हणून कार्य करते, जेणेकरून खाते उणे होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
जेव्हा ट्रेडिंग खात्यातील रक्कम देखभाल मार्जिनच्या खाली जाते, तेव्हा ब्रोकरकडून मार्जिनसाठी कॉल केला जातो. अशा वेळी दोनच पर्याय उरतात.
पैसे भरणे: खात्यात पुन्हा पैसे जमा करून मार्जिनची पातळीवर आणणे.
पोझिशन बंद करणे: जर पैसे भरले नाहीत, तर ब्रोकर पोझिशन स्वतःहून विकून टाकू शकतो, जेणेकरून अधिक तोटा होऊ नये. म्हणजेच व्यवहार पूर्णपणे गुंडाळला जातो.
