मागील वर्षभर भारतीय गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला ग्रहण लागले आहे की काय, अशी स्थिती उद्भवली आहे. एकीकडे पश्चिम आशियातील न संपणारा संघर्ष, दुसरीकडे हवामान खात्याने मान्सूनच्या अंदाजात केलेली कपात, तिसरीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमधील अंतर्गत मतभेद आणि घरात पहावे तर परदेशी गुंतवणूकदारांच्या ऐतिहासिक विक्रीच्या लाटा, हे सर्व एकाच वेळी घडत आहे.याचबरोबर आणखी एक दूरगामी परिणाम करणारा बदल शांतपणे घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अनेक कंपन्यांचे आणि क्षेत्रांचे भविष्यच जणू नव्याने लिहित आहे.
अशा वेळी गुंतवणूकदारांना, प्रत्येक घटक कोणत्या दिशेने वळण घेईल याचा पटापट अंदाज बांधून, त्यानुसार पोर्टफोलिओची व्यूहरचना बदलत राहण्याचा मोह होणे स्वाभाविकच आहे. पण ही योग्य प्रतिक्रिया नाही, हे दै.लोकसत्तेच्या चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. तेव्हा परिस्थितीचा आढावा घेऊन काय शांतपणे सोसायचे आणि कशाशी झुंजायचे, याचा ऊहापोह करण्याचा माझा हा प्रयत्न.तीन प्रकारच्या व्यवस्थात्मक अनिश्चितता भारतीय गुंतवणूकदारासमोर असलेली समष्टी आर्थिक आव्हाने ही वेगवेगळी नसून, ती एका परस्परसंबंधित व्यवस्थेचे भाग आहेत. त्यांचे तीन वेगळ्या स्तरांत वर्गीकरण करता येते.
१. धक्के – युद्ध आणि मान्सूनः
धक्के हे मुळातच वेळ आणि दिशा या दोन्ही बाबतीत पूर्णपणे अनपेक्षित असतात. पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये भीतीमुळे निर्माण होणारा अतिरिक्त जोखीम प्रीमियम जोडला जातो. तेल आयात करणाऱ्या भारतासाठी हा प्रीमियम थेट आयातीतील महागाईत रूपांतरित होतो आणि रिझर्व्ह बँकेची हालचाल करण्याची मोकळीक कमी करतो. जेव्हा शांततेची शक्यता निर्माण होते, तेव्हा तेलाचे एकही पिंप हलण्यापूर्वी हा प्रीमियम वेगाने खाली येतो (किमती कमी होतात).
मान्सून हा यालाच समांतर असा दुसरा धक्का आहे. जेव्हा हवामान खात्याने आपला अंदाज दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्क्यांवर आणला, तेव्हा ग्राहकाभिमुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित क्षेत्रांमध्ये तात्काळ विक्रीचा दबाव दिसला.आता हे दोन धक्के एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते पहा. युद्धविरामामुळे इंधन स्वस्त होऊन महागाई कमी होऊ शकते; तर कमकुवत मान्सूनमुळे अन्नधान्य महाग होऊन महागाई वाढू शकते. दोन्ही एकाच गोष्टीवर परिणाम करतात. देशांतर्गत जीवनावश्यक खर्चावर पण पूर्णपणे विरुद्ध दिशांनी. आणि या दोन्हींचा अचूक वेळ आणि प्रभाव सांगता येत नसल्याने, देशांतर्गत व्याजदरांची नजीकच्या काळातील वाटचाल खऱ्या अर्थाने अनिश्चित होऊन बसते.
२. भरती-ओहोटी – अमेरिकन व्याजदर आणि परदेशी गुंतवणूक:
या भरती-ओहोटीची दिशा तर समजते; पण वेळेचा अंदाज बांधता येत नाही. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदर उच्च पातळीवर ठेवले आहेत. अस्थिर ऊर्जा किमतींमुळे महागाईचे चित्र अस्पष्ट झाल्याने अनेक दशकांत पहिल्यांदाच फेडच्या निर्णयात बहुमताचा अभाव स्पष्टपणे दिसला आहे. जे जागतिक बाजार अमेरिकेच्या आक्रमक व्याजदर कपातीची वाट पाहत होते, त्यांना आता जवळपास कोणतीही कपात अपेक्षित नाही.
अप्रत्यक्षपणे आणि अधिक प्रभावीपणे, याचा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) प्रवाहावर नियंत्रण आहे. अमेरिकेचे सुरक्षित ट्रेझरी बॉण्ड्स डॉलरमध्ये ४ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत असल्यामुळे आणि घसरणारा रुपया परदेशी गुंतवणूकदारांचा परतावा हळूहळू गिळंकृत करत असल्याने, परदेशी गुंतवणूकदारांनी अवघ्या चार महिन्यांत भारतीय समभागांमधून तब्बल १.९८ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
सारासार विचार केल्यास हा भारताच्या क्षमतेवरील नकारात्मक कौल नाही; ही केवळ जागतिक भांडवलाची नेहमीची ओहोटी आहे. संकेत दडलेला आहे तो याच्या प्रतिलाटेत. स्थिर, स्वयंचलित अशा देशांतर्गत ‘एसआयपी’नी त्या परदेशी विक्रीपैकी सुमारे ९० टक्के शोषून घेतली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आता निफ्टी ५०० ची विक्रमी २०.९ टक्के मालकी आहे, आणि परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा दोन दशकातील नीचांकी १७.१ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. परदेशी भांडवलाची ओहोटी नक्कीच सुरू आहे, पण ती आता आपले बंदर रिकामे करू शकत नाही.
३. खोलवरचा प्रवाह – एआयची संरचनात्मक पुनर्रचनाः
कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स -एआय) हा बाजारातील एखादा अल्पकालीन उतार-चढाव नाही; तो निर्देशांकाची संपूर्ण रचना बदलू शकणारा एक कायमस्वरूपी सखोल प्रवाह आहे. तंत्रज्ञानामुळे घडणाऱ्या उलथापालथीच्या भव्य प्रवासात, एआय जुनी व्यवसाय-प्रारूपे नष्ट करत आहे. पण त्याच वेळी नवी प्रारूपे जन्मालाही घालत आहे.‘मानवी तासांच्या बिलिंग’चे जे प्रारूप भारतीय माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाचा पाया होते, तेच एआय पोखरून काढेल, अशी बाजाराची पहिली प्रतिक्रिया होती. परंतु, याचे आता अधिक प्रगल्भ पुनरावलोकन होताना दिसत आहे. जागतिक कंपन्यांचा एआयवरील खर्च वाढत असल्याने सॉफ्टवेअर एकत्रीकरण आणि सल्लागार सेवांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांकानेही अलीकडील नीचांकी पातळीवरून काहीशी सुधारणा दाखवण्यास सुरुवात केली आहे.
हे स्थित्यंतर प्रत्येक गुंतवणूकदाराला स्पर्श करते. आयटी क्षेत्राचे निर्देशांकातील वजन अजूनही मोठे आहे. त्याचे मूल्यांकन बदलले की बाजाराचे नेतृत्वही बदलते. मागील पंधरा वर्षांत संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्या पुढील पंधरा वर्षांतही तशाच राहतील असे नाही. हे तंत्रज्ञान संपूर्ण बाजारपेठेचा आकार अनेक पटींनी वाढवेल, परंतु त्यातून अंतिम विजेते कोण ठरणार हे स्पष्ट होण्यासाठी काही वर्षे लागतील.
कोलाहल विरुद्ध संकेत
हवामानाच्या अंदाजामुळे बाजारात झालेली तीन दिवसांची घसरण हा केवळ ‘गोंगाट’ होता. तात्पुरत्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे एका सत्रात आलेली तेजी हा ‘आवाज’ होता. परदेशी निधीच्या रोजच्या लाल-हिरव्या आकड्यांची हालचाल हा ‘कोलाहल’ आहे.याउलट ‘संकेत’ हे संथ, शांत आणि संयमी असतात. अन्न विरुद्ध इंधन या महागाईच्या रस्सीखेचीचा पैशाच्या किमतीवर होणारा परिणाम, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे हस्तांतरित होणारी बाजाराची सूत्रे आणि एआयमुळे निर्देशांकाच्या रचनेत होत असलेले दीर्घकालीन बदल हे खरे ‘संकेत’ आहेत. आवाज तुम्हाला केवळ थकवतो, पण संकेतांना दिलेली योग्य प्रतिक्रिया तुमच्या संपत्तीची वृद्धी करू शकते.
तर, कोणत्याही एका भाकितावर पैज लावू नका; उलट या एकत्रित परिस्थितीचा योग्य सामना करू शकेल असा पोर्टफोलिओ तयार करा. मालमत्ता-वाटपाची रचना अशी ठेवा की, ज्यासाठी कोणताही एकच आर्थिक अंदाज खरा ठरण्याची आवश्यकता नाही. अस्थिरतेपासून संरक्षण देणारा एक मजबूत पाया असू द्या आणि त्यासोबत भारताबाहेरील वाढीच्या संधी आणि थीम्स पकडणारी मोजकी जागतिक गुंतवणूकही असू द्या.
प्रत्येक युद्ध कधीतरी संपते. प्रत्येक शांततेत कधीतरी व्यत्यय येतो. यापैकी एखादी अनिश्चितता काही आठवड्यात संपेल. दुसरीला एक हंगाम लागू शकतो. जागतिक भांडवलाच्या प्रवाहातील बदलाला काही वर्षे लागू शकतात, तर एआयमुळे होणारे परिवर्तन कदाचित एक दशक घेईल. या सर्व गोष्टींना सारखेच तातडीचे मानणे हीच सर्वात मोठी चूक ठरेल.
यशस्वी गुंतवणूक म्हणजे समुद्रातील प्रत्येक लाटेवर प्रतिक्रिया देणे नव्हे, तर कोणती लाट तात्पुरती आहे, कोणती भरती-ओहोटीची आहे आणि कोणती किनारपट्टीचा नकाशाच बदलून टाकणार आहे, हे समजून घेणे होय.
