वायदे बाजारात अर्थात ‘डेरिव्हेटिव्ह मार्केट’मध्ये व्यवहार करताना आपल्याला बऱ्याचदा आपल्या ‘ट्रेडिंग अकाऊंट’मध्ये काही निधी राखून ठेवावा लागतो, यालाच मार्जिन म्हणतात. वायदे बाजारात व्यवहार सुरू करण्यासाठी ज्या निधीची आवश्यकता असते त्याला मार्जिन मनी म्हणता येईल, इतकी सोपी व्याख्या आहे.

आता मार्जिन म्हणजे काय? ते बघू या.

शेअर बाजारात निर्देशांक असो व शेअरच्या किमती त्यात सेकंदा-सेकंदाला सतत बदल होत असतात. शेअर बाजारात अस्थिरता असते. अस्थिरता म्हणजेच शेअर भाव सतत बदलत असतात. त्यामुळेच शेअर बाजारात फ्युचर आणि ऑप्शनमध्ये व्यवहार करताना अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी जी, रक्कम ब्रोकरकडे जमा केली त्याला ‘मार्जिन’ म्हणतात. (ब्रोकरकडून हे मार्जिन एक्स्चेंजकडे देण्यात येते. येथे आपल्याला याची पूर्ण माहिती घेण्याची गरज नाही. म्हणून येथे ब्रोकरकडे रक्कम जमा केली जाते असा उल्लेख केला आहे.)

शेअरच्या भावात सतत वाढ-घट होत असल्याने मार्जिन आकारले जाते. आपण थोडक्यात उदाहरणाच्या साह्याने समजून घेऊया. समजा, आपण सन फार्मा कंपनीचे १०० शेअर १,००० रुपये प्रतिशेअर प्रमाणे खरेदी केले. हे शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला १ लाख रुपये ब्रोकरकडे जमा करावे लागतील. मात्र आपण व्यवहार केल्यानंतर निश्चित केलेल्या तारखेला ती रक्कम जमा करू शकलो नाही तर ही जोखीम टाळण्यासाठी ब्रोकर आधीच काही रक्कम बाजूला ठेवायला सांगतो. सनफार्माचे शेअर खरेदी करण्यापूवी होणाऱ्या रकमेचा (येथे १ लाख रुपयांपैकी) काही हिस्सा ब्रोकरकडे जमा करावा लागतो. याच रकमेला ‘मार्जिन मनी’ म्हणून ओळखले जातात. याशिवाय जसे ब्रोकरकडे आपण शेअर खरेदी करण्यासाठी काही रक्कम ‘मार्जिन’ म्हणून दिली. त्याचप्रमाणे शेअर (येथे सनफार्माचे १०० शेअर विकणारा) विकणाऱ्यांनादेखील त्याच्या ब्रोकरकडे ‘मार्जिन’ जमा करावे लागते. यामुळे शेअर खरेदी करणारा आणि विक्री करणारा दोन्ही ही बांधील राहतात.

आपण सन फार्माचे १०० शेअर एक लाख रुपयांना खरेदी केले होते. आता साधारणत: शेअरच्या किमतीच्या १५ टक्के मार्जिनची रक्कम म्हणून ब्रोकरकडे जमा करावी लागते. म्हणजेच येथे १५ हजार रुपये द्यावे लागतील. (बाजारातील विविध घटकांवरून मार्जिनचे गुणोत्तर निश्चित होत असते) आपण सकाळी सन फार्माचे शेअर १,००० रुपये प्रतिशेअरप्रमाणे खरेदी केले होते. आता त्याच सत्रात शेअरची किंमत कमी होऊन ९०० रुपये झाली, म्हणजेच प्रतिशेअर १०० रुपये नुकसान होईल. यावरून (१०० शेअर × १०० रुपये तोटा = १०,००० तोटा) १० हजार रुपये तोटा होईल. सन फार्माचे शेअरची किंमत कमी झाल्याने सकाळी खरेदी केलेले शेअर घेण्यास नकार दिल्यास ब्रोकर १५,००० या मार्जिनमधून १०,००० रुपये रक्कम कापून घेईल.

शेअरच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. ‘मार्जिन मनी’ देण्यामागील उद्देश असाच असतो की, शेअर खरेदी करणारा शेअर विकत घेऊन पैसे देतो, तर शेअर विकणारा शेअरची ‘डिलीव्हरी’ देतो. म्हणजेच व्यवहार पूर्ण होण्याची दोन्ही (शेअर खरेदी करणारा आणि शेअरची विक्री करणारा) गटाकडून हमी मिळते.

ऑप्शनमध्ये घेतले जाणारे मार्जिनचे विविध प्रकार (Tpes of Margins levied on Options) :-
ऑप्शनमध्ये व्यवहार करताना प्रत्येक वेळी विविध प्रकारचे मार्जिन घेतले जाते.
१) आरंभिक मार्जिन (Intial Margin)
२) एक्स्पोजर मार्जिन (Exposure Margin)

३) प्रीमियम मार्जिन (Premium Margin)
४) असाइनमेन्ट मार्जिन (Assignment Margin)

५) देखभाल मार्जिन (Maintenance Margin)
१) आरंभिक मार्जिन (Intial Margin)

फ्युचर आणि ऑप्शनच्या व्यवहारात आरंभिक मार्जिनची गणती क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या पातळीपासून केली जाते. (आपण पुढे क्लिअरिंग कॉर्पोरेशनची माहिती घेणार आहोत) म्हणजेच पोर्टफोलिओच्या आधारे मार्जिन मोजले जाते. फ्युचर आणि ऑप्शनचे किती खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शनच्या (एफ अँडओ) जेवढया पोझिशन उभ्या केल्या आहेत. त्या आधारावर आरंभिक मार्जिन मोजले जाते. स्पॅनच्या मदतीने हे मार्जिन मोजले जाते. स्टॅन्डर्ड पोर्टफोलिओ ऍनालिसीस ऑफ रिस्क यालाच स्पॅन (Standard Portfolio Analysis of Risk (SPAN) असे म्हटले जाते. स्पॅनच्या मदतीने मोजले जाणाऱ्या या मार्जिनलाच आरंभिक मार्जिन म्हणतात. शिकागो मर्कन्टाइल एक्स्चेंजने या स्फॉटवेअरची निर्मिती केली आहे. जगातील सर्वच अग्रगण्य बाजार मंचांमार्फत या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आरंभिक मार्जिन (Initial Margin) ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही ऑप्शन्स सेल (राईट) करता. सोप्या भाषेत सांगायचे तर, ट्रेड सुरू करण्यासाठी डिमॅट खात्यात आवश्यक असलेली किमान रक्कम म्हणजे आरंभिक मार्जिन.

जेव्हा ऑप्शन्स खरेदी करता (Buy CE/PE), तेव्हा फक्त ‘प्रीमियम’ भरावा लागतो. परंतु, जेव्हा ऑप्शन्स विक, तेव्हा अमर्याद जोखमीची शक्यता असते. ही जोखीम कमी करण्यासाठी बाजार मंच ठरावीक रक्कम जमा करून घेते.
स्पॅनमध्ये बाजारातील विविध स्थितींचा विचार केला जातो. म्हणजेच एक एफअँडओच्या बाजारातील पोझिशनचे मूल्य, रोख बाजारातील एखाद्या विशिष्ट शेअरचा (आपण ज्या कंपनीच्या शेअरमध्ये फ्युचर ऑप्शनचे व्यवहार करणार आहोत, त्या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव), बाजारातील भाव (Spot Price), शेअर बाजारातील अस्थिरता (Volatility) स्पॅनच्या मदतीने शेअरच्या सतत बदलत जाणाऱ्या किंमती अशा विविध १६ प्रकारच्या स्थितीचा अंदाज घेतला जातो. या विविध परिस्थितीवरून बाजारात होणाऱ्या संभावित तोट्याचा अंदाज काढला जातो आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत होणारे महत्तम नुकसान लक्षात घेऊनच आरंभिक मार्जिन निश्चित केले जाते.

स्पॅन मार्जिन दिवसातून सहा वेळा मोजले जाते. एकदा दिवसाच्या सुरुवातीला तसेच शेअर बाजाराचे कामकाज सुरू असताना चार वेळा त्यात बदल करण्यात येतो. शिवाय शेअर बाजार बंद झाल्यानंतरदेखील मार्जिनमध्ये बदल केला जातो. म्हणजेच बाजारात जेवढी अस्थिरता अधिक असेल, तेवढे जास्त मार्जिन द्यावे लागते.

आरंभिक मार्जिनमध्ये स्पॅन मार्जिनचा देखील समावेश असतो, ते अतिरिक्त सुरक्षा म्हणून घेतले जाते. साधारणपणे ते कराराच्या मूल्याच्या (Contract Value) ठराविक टक्के असते. आरंभिक मार्जिन हे स्पॅन मार्जिन आणि एक्स्पोजर मार्जिन यांच्या एकत्रीकरणातून गणले जाते.

  • मार्जिनवर परिणाम करणारे घटक

१. अस्थिरता (Volatility): जर बाजारात निर्देशांक अथआ खूप जास्त चढ-उतार असतील, तर एक्सचेंज मार्जिन वाढवते.

२. लॉट साईज (Lot Size): प्रत्येक इंडेक्स (उदा. Nifty, Bank Nifty) किंवा स्टॉकची लॉट साईज वेगवेगळी असते. लॉट साईज मोठी असल्यास मार्जिन जास्त लागते.
३. स्ट्राईक प्राईस (Strike Price): तुम्ही इन-द-मनी (ITM) की आऊट-ऑफ-द-मनी (OTM) ऑप्शन सेल करत आहात, यावरही मार्जिन अवलंबून असते.

पुढील भागात आणखी इतर कोणत्या प्रकारचे मार्जिन आकारले जातात त्याविषयी माहिती घेऊया.