Options Settlement Types Share Market Trading Guide Marathi: आपण गेल्या दोन भागांत विविध प्रकारचे ‘मार्जिन’ बघितले. आता ऑप्शनची ‘सेटलमेन्ट’ कशी होते ते बघणार आहोत.
ऑप्शन्स करार अर्थात ‘कॉन्ट्रॅक्ट’ची तीन प्रकारे सेटलमेन्ट करण्यात येते. रोजच्या प्रीमियमच्या (Premium) आधारे होणारी सेटलमेन्ट आणि एक्सरसाइज सेटलमेन्ट (Exercise Settlement) शिवाय ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट खरेदी-विक्री करतो, त्यावेळी अखेरच्या टप्प्यात फायनल सेटलमेन्ट (Final Settlement) करावी लागते. फायनल सेटलमेंटच्या वेळी तीन प्रकारची प्रक्रिया करावी लागते.
डेली प्रीमियम सेटलमेन्ट (Daily Premium Settlement):
रोजच्या प्रीमियमच्या आधारे होणारी सेटलमेन्ट (Daily Premium Settlement): ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑप्शन्स खरेदी करणारा ते खरेदीच्या बदल्यात प्रीमियम देतो. तर ऑप्शन्सची विक्री करणाऱ्याला प्रीमियम प्राप्त होतो. या प्रक्रियेत ऑप्शन्स खरेदी करणारा प्रीमियम देतो तर ऑप्शन्स विक्री करणाऱ्याला तो प्रीमियम प्राप्त होतो. यालाच ‘डेली प्रिमियम सेटलमेन्ट’ म्हणतात. हा ऑप्शन्समधील रोजचा व्यवहार आहे. जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन्स खरेदी करता, तेव्हा तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो (Pay-in), आणि जो विक्रेता असतो त्याला तो प्रीमियम मिळतो (Pay-out). प्रीमियमची रक्कम खरेदी करणाऱ्या खात्यातून काढली जाते आणि ऑप्शन विकणाऱ्याच्या खात्यात वळती केली जाते.
इन्टरिम एक्सरसाइज सेटलमेन्ट (Interim Exercise Settlement)
एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट केला असेल त्याच वेळी इन्टरिम एक्सरसाइज सेटलमेन्ट केली जाते. शेअरमधील ऑप्शन्स कॉन्टॅक्टमध्ये अमेरिकन स्टाइल ऑप्शन्स वापरले जाते. (भारतात मात्र युरोपियन स्टाइल ऑप्शन्सच्या माध्यमातून व्यवहार पार पडतात) आपण या आधी युरोपियन आणि अमेरिकन स्टाइल ऑप्शन्स बघितले आहे. तरीही थोडक्यात आपण येथे परत उजळणी करूया. अमेरिकन आणि युरोपियन ऑप्शन्समधील मुख्य फरक प्रत्येक ऑप्शन्सच्या (अमल) पूर्ण होण्याच्या कालावधीशी संबंधित असतो. अमेरिकन ऑप्शन्सचा उपयोग खरेदीदार ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर कोणत्याही दिवशी पूर्ण करू शकतो. तसेच युरोपियन ऑप्शन्सचा उपयोग फक्त ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टच्या मुदत समाप्तीच्या वेळीच पूर्ण करता येतो. ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर ऑप्शन ‘इन द मनी’ असेल (म्हणजेच खरेदीदाराला नफा होत असेल) तर खरेदीदार मुदतीपूर्वीच ऑप्शन्सचा व्यवहार पूर्ण करेल, यालाच ‘इन्टरिम एक्सरसाइज सेटलमेन्ट’ म्हणतात. सध्या भारतीय शेअर बाजारात (NSE/BSE) ‘स्टॉक ऑप्शन्स’देखील ‘युरोपियन स्टाइलने होतात.
फायनल एक्सरसाइज सेटलमेन्ट (Final Exercise Settlement):
दीर्घ कालावधीचे प्रत्येक ‘इन द मनी’ ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्याच्या शेवटच्या तारखेला ऑप्शन्स कालावधी पूर्ण होताना ‘फायनल एक्सरसाईज सेटलमेन्ट’ करण्यात येते. या प्रकारच्या सर्व ‘लॉन्ग पोझिशन’ ला अमलात आणले जाते. ज्या गुंतवणूकदाराकडे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्याच्या तारखेला ‘इन द मनी’ ऑप्शन्स असेल असे ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट अमलात आणण्यात येतात यालाच ‘फायनल एक्सरसाइज सेटलमेन्ट’ म्हणतात.
‘फायनल एक्सरसाइज सेटलमेन्ट’ फक्त ‘इन द मनी’ (In-The-Money – ITM) ऑप्शन्ससाठीच केली जाते.
आयटीएम ऑप्शन्स: म्हणजेच असे ऑप्शन्स ज्यांच्यामध्ये खरेदीदाराला नफा होत असतो. एक्सपायरीच्या दिवशी हे ऑप्शन्स स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिकली) अमलात आणले जातात.
ओटीएम आणि एटीएम ऑप्शन्स: जे ऑप्शन्स ‘आउट ऑफ द मनी’ (ओटीएम) किंवा ‘ॲट द मनी’ (एटीएम) असतात, त्यांचे मूल्य एक्सपायरीला शून्य (०) होते. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्याही सेटलमेन्टची गरज नसते, ते करार आपोआप कालबाह्य होतात.
मार्क टू मार्केट सेटलमेन्ट (Mark to Market – MTM Settlement) ही फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहारांमधील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, शेअर बाजारातील रोजच्या चढ-उतारानुसार व्यवहारात होणारा नफा किंवा तोटा रोजच्या रोज हिशोब करून निश्चित करणे म्हणजेच ‘मार्क टू मार्केट सेटलमेंट’ होय.
- फ्युचर्समध्ये: मार्क टू मार्केट सेटलमेन्ट दररोज अनिवार्य असते आणि रोज खात्यात पैसे जमा-वजा होतात.
- ऑप्शन्स खरेदीदारासाठी: तुम्ही जो प्रीमियम दिला आहे, त्यापेक्षा जास्त तोटा होऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शन्स बायरसाठी रोज पैसे खात्यातून वजा होत नाहीत, फक्त स्क्रीनवर ‘नोशनल’ नफा-तोटा दिसतो.
- ऑप्शन विक्रेत्यासाठी: ऑप्शन्स विक्रेत्याची जोखीम अमर्याद असते, त्यामुळे त्यांच्यासाठी मार्जिन आणि मार्क टू मार्केटचे नियम कडक असतात.
आता हे प्रकरण वाचल्यानंतर आपल्याला कदाचित थोडी चिंता वाटत असेल की, ही सर्व आकडेमोड कशी करणार? पण, मी तुमचा ताण एकदम कमी करणार आहे. हे प्रकरण तुम्हाला कदाचित थोडे कठीण वाटले असेल. नक्कीच मार्जिन आणि सेटलमेन्ट महत्त्वाचे समजून घेण्याजोगे विषय आहेत. पण तुम्हाला मार्जिन आणि सेटलमेन्टबद्दल एवढी संपूर्ण माहिती लक्षात ठेवायची गरज नाही. कारण आपला ब्रोकर आपल्याला मार्जिनबद्दल आवश्यक माहिती देत असतो. म्हणजे ब्रोकरला आपण कोणता व्यवहार करायचा आहे म्हणजेच फ्युचर्स किंवा ऑप्शन्समध्ये व्यवहार करायचा आहे, असे सांगितल्यास तो आपल्याला किती मार्जिन आवश्यक आहे ते सांगतो. तसेच आपण स्वतः ऑनलाइन व्यवहार करत असल्यास आपण व्यवहार करते वेळी आपल्या संगणकावर आपल्याला मार्जिन किती रक्कम आवश्यक आहे, याची सूचना येते. त्यामुळे मार्जिन किती लागणार कसे लागणार याचा जास्त ताण न घेता व्यवहार सुरू करा. मात्र आपल्याला सर्व माहिती असणे आवश्यक आहे म्हणूनच या लेखाचे प्रयोजन.
