आशीष ठाकूर
Share Market Prediction Marathi :
विद्यमान वर्षात २८ फेब्रुवारीपासून इराण, अमेरिका युद्ध सुरू झालं त्यानंतर युद्धबंदी, शांतता करार यांच्या बैठका होत होत्या. त्या त्या वेळच्या शांतता कराराची शाई वाळायच्या आत, पुन्हा युद्ध सुरू आणि ये रे माझ्या मागल्या, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं तर राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना होऊन बाजारस्नेही पियुष गोयल अथवा शक्तिकांत दास यांच्याकडे अर्थमंत्रीपद येईल अशी वंदता. अशा विविध चर्चेच्या फैरी समाज माध्यमांमध्ये झडत होत्या. पण प्रत्यक्षात मात्र काही होताना दिसत नसल्याने निफ्टीची वाटचाल ही २३,८०० ते २४,३००अशा ५०० अंशांच्या परिघातच अडकलेली होती.

निफ्टीची कशी राहणार?

निफ्टी निर्देशांकावर तेजी अवतरण्यास, सकारात्मक गोष्टी जसं की समाधानकारक पाऊस, व्यापार करारात भारतासाठी सुसह्य अशी आयात कराची रचना, कंपन्यांचे त्रैमासिक समाधानकारक निकाल व कंपनी संचालक मंडळाचा आशादायक भविष्यकालीन वाटचालीबद्दल मार्गदर्शन, समाधानकारक पावसामुळे पिकपाणी उत्तम होऊन महागाई, चलनवाढ काबूत राहून कर्जावरील व्याजदर स्वस्त होतील का, याची वेडी अथवा‘छोटीशी आशा’ या छोटीशी आशांमध्ये अमेरिका, इराण, इस्रायल या तिन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी होऊन तो शांतता करार तिन्ही देश पाळतील ही भाबडी आशा नाहीतर रशिया, युक्रेन युद्धासारख भिजत घोंगड पडल्यास, किमान खनिज तेलाचे भाव तरी गगनाला भिडणार नाहीत याची दक्षता. या सर्व सकारात्मक घटनांमध्ये निफ्टी निर्देशांकावर २४,००० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ डोळ्यासमोर ठेवून निफ्टी निर्देशांकाच भविष्यकालीन आलेखन करूया. निफ्टी निर्देशांक २४,०००चा स्तर सातत्याने राखत, २४,३०० चा स्तर पार केल्यास, निफ्टी निर्देशांक प्रथम २४,५०० ते २४,८०० व त्या नंतर २५,००० ते २५,३०० च्या स्तराला गवसणी घालेल.

वरील छोटयाशा आशांच, खोट्या आशांमध्ये/अपेक्षाभंगामध्ये रूपांतरित झाले तर निफ्टी निर्देशांक २४,००० चा स्तर तोडत निफ्टी निर्देशांकाच खालचे लक्ष्य २३,१०० ते २२,५०० असेल.

सरलेल्या महिन्यातील घातक उतारामुळे बाजाराच्या नाकावर तर सुत होतच! यात भर पडली ती ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची’ माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे ‘कृत्रिम प्रज्ञेच्या’ दहशतीमुळे या क्षेत्रालाच ‘कृत्रिम श्वास प्रणालीचा’ आधार घ्यावा लागतो की काय? इथपर्यंत या क्षेत्राची पडझड झाली होती. ज्याच दृश्य स्वरूप म्हणजे ‘तांत्रिक विश्लेषणातील ’साप्ताहिक व मासिक आलेखावर (वीकली व मंथली चार्टवर) या क्षेत्राचा आरएसआय हा ३० अंशांवर आलेला आहे, जो पुढील तीन ते पाच वर्षासाठी या क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणुकीवर आश्वासक परतावा देईल, हे सूचित करत आहे. (सेबीच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लेखकाची गुंतवणूक आहे हे वाचकांनी गृहीत धराव)

बँक निफ्टी निर्देशांक :- ३ जुलैचा बंद भाव :- ५७,९३८.५० / महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- ५७,४५०

बँक निफ्टीनी ५७,४५० चा स्तर सातत्याने राखल्यास बँक निफ्टीच प्रथम वरचे लक्ष्य ५८,७०० द्वितीय लक्ष्य ६०,२००असेल. बँक निफ्टी निर्देशांकाला ५७,४५० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास बँक निफ्टी निर्देशांकाच प्रथम खालचे लक्ष्य ५७,२००तर द्वितीय खालचे लक्ष्य ५६,३५० असेल.

सेन्सेक्स :-३ जुलैचा बंद भाव:- ७७,७६३.९१ / महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- ७७,५००

सेन्सेक्सनी ७७,५०० चा स्तर सातत्याने राखल्यास, सेन्सेक्सच प्रथम वरचे लक्ष्य ७९,३५० आणि द्वितीय लक्ष्य ८०,५५० असेल. सेन्सेक्सनी ७७,५०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास सेन्सेक्सच खालचे लक्ष्य ७६,०००असेल.


सोन्याची वाटचाल (एमसीएक्स आधारित):- महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- १,४५,०००

एमसीएक्स निर्देशांकावरील सोन्याच्या किंमतीने १,४५,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,५२,८०० द्वितीय वरचे लक्ष्य १,५७,००० असेल. एमसीएक्स निर्देशांकावरील सोन्याच्या किंमतीने १,४५,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास सोन्याच्या किंमतीचे खालचे लक्ष्य १,४०,००० असेल.

चांदीची वाटचाल(एमसीएक्स आधारित):- महत्वाचा केंद्रबिंदू स्तर:- २,३०,०००

एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीने २,३०,०००चा स्तर सातत्याने राखल्यास,तिच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य २,४१,५०० तर द्वितीय वरचे लक्ष्य २,५४,०००असेल.एमसीएक्स वरील चांदीच्या किंमतीने २,३०,०००चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास,चांदीच्या किंमतीचे खालचे लक्ष्य २,२०,००० असेल.

आशीष ठाकूर
ashishthakur1966@gmail.com
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीनआहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’आणी इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे.गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.