Reliance Jio IPO BHEL Profit Stocks : आखातातील युद्धाने अपेक्षितरित्या पुन्हा डोके वर काढले आहे. आता तर होर्मुझमधून येणाऱ्या तेलावर कोणी पैसे कमवायचे? याची चढाओढ सुरू झाली आहे. पण भारतीय बाजार तेजीच्या दिशेने पुढे जात आहे. अर्थात ही स्थिती या आठवड्यात आहे, म्हणजेच पुढच्या आठवड्यात कायम राहील असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण बाजारातील उत्साहवर्धक घडामोड असते, ती म्हणजे कंपन्यांचे निकाल अर्थात ‘रिझल्ट सीझन’. शेअर बाजारातील कंपन्यांची किंमत कंपन्यांच्या भविष्यातील नफ्यावर, व्यवसाय कसा वाढणार याच्या भवितव्यावर जशी अवलंबून असते तशीच ती कंपन्यांच्या तिमाही निकालांवर अवलंबून असते. या निमित्ताने गेल्या काही दिवसातील अशाच प्रमुख घडामोडींचा आढावा घेणे बाजार अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
रिलायन्सची दमदार सुरुवात
अपेक्षेपेक्षा जास्त विक्री आणि नफा नोंदवत रिलायन्सने बाजाराला सुखद धक्का दिला आहे. रसायन उद्योग, डिजिटल सर्विस, जिओ आणि पारंपरिक तेलाचा व्यवसाय या सर्वच आघाड्यांवर रिलायन्सने चांगली कामगिरी नोंदवली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या रिलायन्स जिओची उपकंपनी असलेल्या नव्या व्यवसायाने ‘पब्लिक इशू’ साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. ५जी तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी ही कंपनी कटिबद्ध आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. जिओ प्लॅटफॉर्म या कंपनीचा एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीचा नफा ९ टक्क्यांनी वाढून ७,७०० कोटींवर पोहोचला आहे. अजूनही रिलायन्स समूह खनिज तेलापासून तयार होणारे ‘बाय प्रॉडक्ट’ या व्यवसायावर अवलंबून असला तरीही रिलायन्स रिटेल, जिओच्या माध्यमातून दूरसंचारसारख्या उद्योगांमध्ये हळूहळू वाढ होते आहे, हे आशादायक चित्र आहे.
BHEL चे पुनरागमन
सरकारी मालकीच्या भारत हेव्ही इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीने अनेक वर्षांच्या तोट्याच्या स्थितीतून बाहेर येऊन पहिल्यांदाच या तिमाहीत नफ्याचा आकडा नोंदवला आहे. भारतातील आघाडीची अभियांत्रिकी आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारणारी कंपनी म्हणून भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ओळखली जाते. एकेकाळी गुंतवणूकदारांचा पहिल्या पसंतीचा शेअर असलेली ही कंपनी अनेक वर्ष विजनवासातच होती. सध्याच्या कंपनीच्या कार्यादेशाचा (ऑर्डर बुक) विचार करता ऊर्जा निर्मिती ८१ टक्के हा सर्वाधिक भरवशाचा व्यवसाय दिसतो आहे. या तिमाहीत कंपनीला एकूण २६,७०० कोटी रुपयांचे नवीन कार्यादेश आहेत व एकूण कार्यादेश अडीच लाख कोटीपर्यंत पोहोचले आहे. या कंपनीचा शेअर लगेचच विकत घ्यावा या हेतूने ही माहिती दिलेली नसून कंपन्यांच्या तिमाही निकालांवर आपले बारीक लक्ष असले पाहिजे हे या निमित्ताने सुचवायचे आहे.
जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीने पहिल्या तिमाहीत थेट दुप्पट नफा नोंदवला आहे. जागतिक बाजारामध्ये असलेल्या अस्थिरतेचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर झालेला स्पष्टपणे दिसून येतो. इराण-अमेरिका युद्धामुळे कोळशाच्या किमती वाढल्या आणि त्यातच भारतातील स्टील कंपन्या कोकिंग कोल या प्रकारातील ९० टक्के कोळसा परदेशातून आयात करतात. असे असूनही गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे जेएसडब्ल्यूला अपेक्षित नफा साध्य करता आला आहे. या कंपनीच्या आकडेवारीवरून खर्च आणि विक्री यांचा एकत्रित अभ्यास कसा झाला पाहिजे हे आपल्याला समजते.
आयातीऐवजी निर्मितीचे धोरण
भारत सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन जवळपास १८० अब्ज डॉलर एवढ्या प्रचंड रकमेची आयात हळूहळू कमी करून या सर्व वस्तू भारतात तयार कराव्यात असा आराखडा बनवण्यात येत आहे. रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी, विशेष दर्जाचे पोलाद अशी जवळपास बाराशेपेक्षा अधिक उत्पादने आपण आयात करतो. कारण त्यांचे उत्पादन भारतात होतच नाही किंवा आपल्या गरजेपेक्षा खूप कमी प्रमाणावर आपण त्याची निर्मिती करतो. सरकारी माध्यमातून ‘नॅशनल सिंगल विंडो सिस्टम’ या यंत्रणेमार्फत आगामी काळात अशी योजना आणली जाणार आहे. ज्यावेळी ही योजना प्रत्यक्ष अमलात येईल त्यावेळी त्याचा लाभार्थी गट भारतातील आघाडीच्या कंपन्या असणार आहेत हे वेगळे सांगायलाच नको.
आयपीओमध्ये गुंतवा पण…
नुकताच एसबीआय म्युच्युअल फंड या भारतातील स्टेट बँक प्रणित म्युच्युअल फंड कंपनीचा आयपीओ बाजारामध्ये येऊन धडकला. हाच शब्द महत्त्वाचा आहे कारण त्याला सुमारे ४२ पट अधिक प्रतिसाद प्राप्त झाला. भारतातील आघाडीच्या आणि विक्रमी मालमत्ता असणाऱ्या फंडाचा आयपीओ यशस्वी होणार यात शंकाच नाही. फक्त पदार्पणाच्या दिवशी लाभ मिळवण्यासाठी (लिस्टिंग गेम) पैसे गुंतवणार असला तर जोखीम काय आहे, हे समजून घ्यायला हवे. या म्युच्युअल फंडाकडे जी मालमत्ता सांभाळण्यासाठी आहे, त्यातील बराच मोठा वाटा पॅसिव्ह फंडांचा आहे. प्रॉव्हिडंड फंड आणि पेन्शन फंड या माध्यमातून येणारे पैसे निधी व्यवस्थापनासाठी सोपे असतात, पण त्यातून नफा मात्र फार होत नाही. एसबीआय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना त्याचा निश्चितच फायदा झाला आता त्याच्या आयपीओमधून नक्की किती होतो हे आगामी काळ ठरवेल!
एफएमसीजी कंपन्यांचा स्थिर व्यवसायाचा अंदाज
लोकांच्या हातातील खेळता पैसा आणि त्यांची खरेदी करायची क्षमता ही अर्थव्यवस्था जोखायची खरी पद्धत आहे. डाबर, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी या कंपन्यांनी आगामी सहा महिन्यात फारसे नकारात्मक चित्र असेल, असे म्हटलेले नाही याचा विचार करा. याला अपवाद मात्र ‘अल-निनो’ प्रभावाचा आहे. जर दक्षिण भारतात दिली आहे, त्याप्रमाणे उत्तर आणि मध्य भारतातही पावसाने ओढ दिली तर मात्र कृषी अर्थव्यवस्था संकटात येणार आणि त्याअनुषंगाने त्यावर अवलंबून असलेली निम्मी लोकसंख्या आर्थिक टंचाईमध्ये सापडण्याची शक्यता आहे. अर्थात हे चित्र सप्टेंबर महिन्यानंतर स्पष्ट होऊ शकेल.
स्टेपअप एसआयपी विसरू नका
सुदैवाची गोष्ट म्हणजे या दोन वर्षापासून भारतीय शेअर बाजार फारसे उत्साहवर्धक फायदे देत नसले तरीही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन माध्यमातून बाजारात येणारे पैसे थांबत नाहीयेत. गुंतवणूकदार आता अधिक साक्षर झाले असावेत असे म्हणता येईल. आता पुढची पातळी म्हणजे तुमच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीमध्ये ‘स्टेप अप’ हा पर्याय आणला पाहिजे. तुमची दर महिन्याची एसआयपीची रक्कम असेल त्यात वार्षिक पाच टक्के आपोआप वाढ होईल, असा पर्याय अवश्य निवडा. याचे दृश्य परिणाम समोर यायला दहा वर्षे लागतात. पण संपत्ती निर्मिती अर्थात वेल्थ क्रिएशनसाठी हा राजमार्ग आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील व्यापार करार अलीकडेच प्रत्यक्षात आला आहे, त्याविषयी पुढील लेखातून माहिती घेऊया.
