त्रैमासिक आढावा २०२६
सध्याच्या काळात पोर्टफोलियोचा आढावा घेणे आव्हानात्मक आहे. आधीच मंदीच्या छायेत असलेल्या शेअर बाजाराने गेल्या महिन्याभरात पूर्णपणे मंदीत प्रवेश केला आहे. २८ फेब्रुवारीला म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून १ एप्रिलपर्यंत सेन्सेक्स ११ टक्क्यांनी घसरला असून सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात जवळपास ५२ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे १.८ लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत हे विशेष.

माझा पोर्टफोलियोमध्ये सुचवलेल्या शेअरची कामगिरी त्यामुळेच मोजणे योग्य ठरणार नाही. ७३१० रुपयांच्या गुंतवणुकीवर ८ रुपये नुकसान झाले असून ती गुंतवणूक आता ७३०२ रुपये झाली आहे. प्रीमियर एनर्जीजने केवळ तीन आठवड्यात ३० टक्के परतावा दिला आहे हे विशेष. निर्देशांकच्या तुलनेत पोर्टफोलियोची कामगिरी सरस आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांचा कस लागणार आहे. गेले चार वर्ष चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची चिन्हे नाहीतच. आता इराण, अमेरिका आणि इस्राइल युद्धाबरोबरच इतरही अनेक देश (लिबिया, क्यूबा इ.) युद्धात बळी पडण्याची भीती आहे. या युद्धात आखाती देशांचे भरपूर नुकसान झाले असून परिस्थिती पूर्वपदावर यायला काही महिने लागतील. खनिज तेलाच्या वाढत्या आणि अस्थिर किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, अमेरिकेचे भारतावरील वाढते दडपण आणि निर्बंध, परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेकडे पाठ आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिर युद्धजन्य परिस्थिती यामुळे यंदा देखील भारतीय शेअरबाजारची तसेच इक्विटी म्युच्युअल फंडांची कामगिरी सुमार राहील, अशी चिन्हे आहेत. अशा अनिश्चित काळात साहजिकच सोने- चांदी तसेच मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) आणि रोखे (बॉन्ड) याकडे गुंतवणूकदारांचा ओढा राहील. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने इक्विटीमधील गुंतवणूक संपत्ती निर्माण करते, असा अनुभव आहे. त्यामुळेच प्रत्येक पडझडीत टप्प्याटप्प्याने उत्तम कंपन्यांच्या शेअरची खरेदी करत राहणे फायद्यचे ठरेल.

सुचवलेल्या समभागांचा वारंवार आढावा घेऊन ज्या समभागांचे मूलभूत घटक मजबूत आहेत, ते राखून ठेवा आणि जे कमकुवत आहेत, त्यांचा स्टॉपलॉस लावा आणि संयम ठेवा. शेअरमधील गुंतवणूक ही एका वर्षाची चाचणी नसून, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे हा परीक्षेचा काळ असून यात टिकून राहा, कारण दीर्घकाळातच समभागांचे आणि पोर्टफोलिओचे मूल्य ओळखले जाईल.

Stocksandwealth@gmail.com