सुधीर जोशी
निवृत्तीनंतरच्या २५ वर्षांचे आर्थिक नियोजन प्रत्येकाकडे असायला हवे. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा केवळ बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेला असेल तर तो उर्वरित आयुष्य समाधानाने जगायला पुरेलच असे नाही. शेअर बाजारात गुंतवणुकीला या वयात स्वतंत्रपणे पुन्हा सुरुवात करायला हरकत नाही, पण… काहींनी तरुणपणी बनवलेल्या ‘बकेट लिस्ट’मधील काही शिल्लक गोष्टी रिटायर झाल्यावर करण्यासाठी ठेवलेल्या असतात.

शेअर बाजाराचे थ्रिल अनुभवणे ही त्यापैकी एक. नोकरीसाठी लोकलने प्रवास करत असताना ऐकलेल्या मार्केटवरील रंगलेल्या चर्चा, ऑफिसमधील यंग जनरेशने मारलेल्या बढाया, ऑफिसमधील एखाद्या सीनियर माणसाचे बाजारात किती एक्सपोजर आहे याबद्दल चालत असलेली कुजबुज, हर्षद मेहतावर बनविलेल्या चित्रपटातील थरार अनुभवताना आपणही थोडे नशीब अजमावायला हरकत नाही अशी इच्छा झालेली असते.

काही धाडसी यात उडी घेतात व नशीब काढतात, तर बरेच जण निवृत्त झालो, थोडा पैसा हाताशी आला व निवांत वेळ मिळाला की यात पडू असा बाळबोध विचार करतात. काही धाडसी लोक स्वत:ला वेळ नाही म्हणून आपला पैसा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी दुसऱ्याकडे सोपवून बऱ्याच वेळा पस्तावलेलेही असतात; पण नंतर स्वतंत्रपणे पुन्हा सुरुवात करायला उत्सुक असतात. अशा सेकंड इनिंग खेळू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे थोडेसे मार्गदर्शन.

ज्येष्ठांनी या क्षेत्रात का जावे?

निवृत्तीनंतर शरीर धडधाकट ठेवण्यासाठी जसा हलका व्यायाम, चालणे महत्त्वाचे तसा मेंदू तल्लख ठेवण्यासाठी व आपल्या बुद्धीचा सद्उपयोग करण्यासाठी शेअर बाजार हादेखील एक उत्तम मार्ग आहे. निरनिराळ्या कंपन्यांबद्दल वर्तमानपत्र, टीव्ही व सोशल मीडियामधून मिळणारी माहिती संकलित करणे, देशातील व जगातील आर्थिक घडामोडींवर नजर ठेवणे, कंपन्यांचे तिमाही व वार्षिक निकाल या सर्व अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत. त्या तुमच्या मेंदूला उत्तम खुराक देतील.

महागाईशी सुसंगत राहणारे उत्पन्न मिळवायचे असेल तर आपली काही गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडित असणाऱ्या पर्यायांमध्ये असायलाच हवी. मग ती थेट शेअर्स घेऊन किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाद्वारे करता येईल.

आरोग्य सुविधांमधील वाढ आणि वाढलेले जीवनमान यामुळे निवृत्तीनंतरच्या २५ वर्षांचे आर्थिक नियोजन प्रत्येकाकडे असायला हवे. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा केवळ बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेला असेल तर तो उर्वरित आयुष्य समाधानाने जगायला पुरेलच असे नाही.ॉ

शेअर बाजारातील गुंतवणुकीत रोकडसुलभता असते. दोन ते तीन दिवसांत आपण पैसे मोकळे करू शकतो. पण इतर मुदत ठेवींत अशी सुविधा मिळत नाही.

तुमच्या कार्यकाळातील अनुभवाचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. एखाद्याला असलेल्या बँकिंग, विमा, औषधनिर्मिती, वाहन, माहिती तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील अनुभवाचा त्या त्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फायदा करून घेता येतो.

लाभांश (डिव्हिडंड) उत्पन्न

नियमितपणे चांगले लाभांश देणाऱ्या टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिरो मोटर्स, बालकृष्ण इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीसारख्या कंपन्या तुम्हाला वार्षिक रोकड मिळण्याचा मार्ग ठरू शकतात; पण त्यांची खरेदीपण योग्य वेळी करणे महत्त्वाचे.

आधी काय खबरदारी घ्यावी?

दैनंदिन खर्चाची तरतूद: जर तुम्हाला दरमहा मिळणारे निवृत्तिवेतन (पेन्शन) नसेल तर ते मिळण्याचा बंदोबस्त तुम्ही सर्वात आधी करायला हवा. त्यासाठी वयवंदना योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, रिझर्व्ह बँकेचे रोखे, बँकेतील किंवा काही नामांकित कंपन्यांमधील मुदत ठेवी असे प्रकार उपलब्ध आहेत.

आरोग्य विमा: आरोग्य विम्याची पॉलिसी निवृत्त व्हायच्या काही वर्षे आधी काढलेली असली तर ते उपयुक्त ठरेल. तरुणपणीच मोठ्या मुदतीची पॉलिसी काढलेली असेल तर जास्त चांगले. कारण त्यामुळे वैद्यकीय तपासणी किंवा मधुमेहासारख्या आजारांमुळे पॉलिसीवर येणारे निर्बंध कमी असतात. जर अशी पॉलिसी नसेल तर आपल्या मुलांना त्यांच्या कंपनीतर्फे काढल्या जाणाऱ्या पॉलिसीमध्ये आपले नाव जरूर घालायला सांगा.

भविष्यातील मोठे खर्च: मुलामुलींची लग्ने वा घरासाठी लागणारे पैसे जर नजीकच्या काळात लागणार असतील तर ते शेअर बाजारात अजिबात गुंतवू नका, कारण तुमच्या गरजेच्या काळात जर बाजार खाली गेला असेल तर तुम्हाला गुंतवणूक तोट्यात विकावी लागेल. अशा पैशांसाठी खर्चाच्या कालमानाप्रमाणे बँकेतील ठेवी, लिक्विड फंड असे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

शेअर्सचा पोर्टफोलिया बनविताना पाळायचे काही नियम:

१. स्वतंत्र खात्याचे महत्त्व: शेअर बाजारातील गुंतवणुकीचे हिशेब वेगळे राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राखून ठेवलेला पैसा दैनंदिन वापराच्या खात्यात येता कामा नये. त्यासाठी आयसीआयसीआय किंवा इतर बँकांमध्ये थ्री-इन-वन खात्यांचा पर्याय आहे. यामध्ये बँकेत बचत खाते, डी-मॅट व ट्रेडिंग अशी संलग्न खाती उघडता येतात. जर दुसऱ्या दलाली पेढीकडे ट्रेडिंग करत असाल तर त्या ट्रेडिंग खात्याशी जोडलेले बचत खाते फक्त शेअर्सच्या व्यवहारांसाठीच वापरा.

२. तुम्ही गुंतवणूकदार होणार का ट्रेडिंग करणार हे आधी निश्चित करायला हवे. गुंतवणूकदार असाल तर शेअर घेतल्यावर जर तो एक-दोन दिवसांत खाली आला तर विचलित होऊ नका. वाट पाहा. ट्रेडिंग करत असाल तर रोजच्या रोज अथवा अल्प मुदतीत शेअर विकून मोकळे व्हा; पण एक मात्र लक्षात असू द्या की, कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे.

३. किती कंपन्यांचे शेअर असावेत: साधारणपणे २० कंपन्यांचा पोर्टफोलियो तुम्हाला समर्थपणे सांभाळता येईल. त्यामध्ये अंदाजे १० लार्जकॅप आणि अन्य १० या मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्या असाव्यात. लार्जकॅप कंपन्या इतरांच्या मानाने व्यवसायात स्थिरस्थावर असतात.

४. फ्युचर व ऑप्शन्स : निवृत्त लोकांनी या भानगडीत न पडलेले बरे. फ्युचर व ऑप्शन्सची बाजारातील मोठी दोलायमानता सांभाळणे वाढत्या वयात नसता मानसिक ताण देईल. अनेक शैक्षणिक कोर्सेस यावर भर देतात व ते किती सोपे आहे ते दाखवितात; पण प्रत्यक्षात केवळ दोन टक्के गुंतवणूकदार यात पैसा कमावतात. शिवाय यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत प्राप्तिकराचे नियम फार वेगळे आहेत. ते आधी समजून घेणेही महत्त्वाचे आहे. रोखीचे व्यवहार करून शेअर्सची डिलिव्हरी घेणे व देणे हा सरळ मार्ग कमी जोखमीचा व दीर्घ मुदतीत मोठा फायदा करून देणारा आहे.

५. मानसिक संतुलन सांभाळणे: जर एखाद्या दिवशी पडलेल्या बाजाराने तुम्ही चिंतित होणार असाल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही. भावनेच्या भरात कुठलाही व्यवहार न करणे व योग्य वेळी नफावसुली किंवा ‘स्टॉप लॉस’ची मर्यादा पाळून गुंतवणुकीमधून बाहेर पडणे केव्हाही चांगले. प्रत्येक जण चुका करतो. स्वत:ला माफ करा व पुढे जा. केलेल्या चुकीमुळे झालेले नुकसान ही शिकण्याची किंमत समजा.

६. नफावसुली कधी व कशी: प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे नफावसुलीचे धोरण ठरवावे लागेल. जर तुम्ही नफ्याचे अपेक्षित प्रमाण ठरविले असेल तर अधिक नफ्याची हाव न धरता नफा वसूल करायला हवा. शॉर्ट व लाँग टर्म नफ्यावर भराव्या लागणाऱ्या अनुक्रमे १५ व १० टक्के प्राप्तिकराचा यात विचार असायला हवा. जर तुम्हाला काही मोठ्या खर्चासाठी शेअर बाजारातील पैसे लागणार असतील तर अशा खर्चाच्या काही महिने आधीच नफावसुली करायला हवी. आयत्या वेळी विक्री करायला गेल्यावर बाजार पडलेला असेल तर तुम्हाला नुकसान होऊ शकते.

७. ब्रोकरेज प्लॅन: काही दलाली पेढ्या आगाऊ रक्कम जमा केली तर ब्रोकरेजमध्ये सवलत देतात. व रोजच्या व्यवहारातील ब्रोकरेज आगाऊ भरलेल्या रकमेतून वळते करतात. असे प्लॅन घ्यायची घाई करू नका. जर तुम्हाला सहा महिन्यांनी अंदाज आला की हे व्यवहार तुम्हाला जमत आहेत तर पुढील दोन वर्षे पुरेल अशा रकमेचा ब्रोकरेज प्लॅन घ्या.

८. नॉमिनेशन महत्त्वाचे: बचत, डीमॅट व ट्रेडिंग अशा तीनही खात्यांसाठी नॉमिनेशन करता येते. ते सुरुवातीलाच करून घ्या.

९. भांडवल: शेअर बाजारासाठी वेगळी ठेवलेली रक्कम अगदीच कमी नको. साधारण पाच लाख रुपयांच्या भांडवलाने सुरुवात करता येईल. त्यामुळे एका कंपनीत साधारण २५ हजार रुपयांची गुंतवणूक होईल. पुढे जम बसला की गुंतवणूक वाढवता येईल. तसेच मिळणाऱ्या नफ्याने व डिव्हिडंडरूपी उत्पन्नाने तुमचे भांडवल वाढत राहील. कुठच्याही परिस्थितीमध्ये कर्ज काढून शेअर्स घेऊ नका.

१०. कंपन्यांची निवड: वर सांगितल्याप्रमाणे लार्ज कॅप आणि मिड व स्मॉल कॅपचे धोरण कायम ठेवून आपल्या पोर्टफोलियोत सर्व क्षेत्रांचे संतुलन असावे. तसेच त्या त्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या निवडाव्यात. उदाहरणार्थ बँकिंग (एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक), ग्राहकोपभोगी वस्तू (एफएमसीजी) (हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा कंझ्युमर), माहिती-तंत्रज्ञान (इन्फोसिस, टीसीएस), धातू (टाटा स्टील, हिंडाल्को), औषध व आरोग्यसेवा (सन फार्मा, डॉ. रेड्डीज), वाहन (मारुती, महिंद्रा) इत्यादी. त्यामुळे जोखीम विभागली जाईल.

११. माहितीचे स्रोत: रोजच्या दैनंदिन वृत्तपत्रातील अर्थविषयक पाने, अर्थव्यवस्था व भांडवली बाजाराला वाहून घेतलेली वृत्तपत्रे किंवा टीव्ही चॅनेल्स याखेरीज इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही संकेतस्थळांवर तुम्हाला माहितीचा खजिना सापडेल. याखेरीज अशा काही संकेतस्थळांवर तुमचा पोर्टफोलियो तयार करून ठेवता येईल. त्यामुळे नफा-तोट्याची अद्ययावत माहिती तुम्हाला कळेल व खरेदी-विक्रीचे निर्णय घेणे सोपे होईल. तुमच्याकडे असलेल्या कंपन्यांबाबतच्या बातम्या देखील तुम्हाला मिळतील.

बाकीचे पर्याय

ज्यांना शेअर बाजारात व्यवहार करणे जमणार नसेल त्यांना खालील पर्याय उपलब्ध आहेत.

१. पोर्टफोलियो मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस): अनेक बँका व वित्तीय संस्था अशी सेवा पुरवतात. ‘सेबी’ने मान्यता दिलेल्या संस्थेकडून कमीत कमी पन्नास लाख रुपये गुंतवून तुम्हाला ही सेवा घेता येते. यामध्ये कुशल पोर्टफोलियो व्यवस्थापक तुमचा पोर्टफोलियो सांभाळतो. त्याला संस्थेतील भांडवली बाजारावर संशोधन करणाऱ्या इतरांचे मार्गदर्शन मिळते. यासाठी तुम्हाला दलालीव्यतिरिक्त पोर्टफोलियोच्या जास्तीत जास्त २.५ टक्के वार्षिक फी ‘सेबी’च्या नियमांप्रमाणे आकारली जाते. यामध्ये भाग घेताना तुम्ही फी कमी करण्यासाठी वाटाघाटी करून बघायला हरकत नाही. गुंतवणुकीसंबंधी सर्व निर्णय घ्यायचे अधिकार तुम्ही पोर्टफोलियो व्यवस्थापकाला दिलेले असतात. दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीचा ताळेबंद तुम्हाला पाठवला जातो.

२. म्युच्युअल फंड: बाजारात अनेक भांडवली पेढ्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे इक्विटी म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. कुठले फंड निवडायचे हा स्वतंत्र विषय आहे. त्यासाठी जाणकारांची मदत घेणे केव्हाही चांगले. या पर्यायामध्ये तुम्हाला रोज बाजारावर लक्ष ठेवायची गरज नाही, कारण फंड व्यवस्थापक हे काम करत असतो. या दोन्ही पर्यायांमध्ये तुमचा रोजचा सहभाग नसतो. त्यामुळे स्वत: अभ्यास करून निर्णय घेण्याचा आनंद यात मिळत नाही.शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे; पण जोखमीबरोबर मोठ्या फायद्याची संधी यात आहे. स्वत: विचार करून, धाडस दाखवून फायदा मिळवण्याचे समाधान यात आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचे साधन आहे. आततायीपणे निर्णय न घेता संयमाने व्यवहार केल्यास करोडपती होण्याची संधी यात आहे. तुम्ही केलेल्या व्यवहारातून तुम्हाला फायद्याबरोबर आनंद व समाधान मिळणे व तणावमुक्त जीवन जगणे महत्त्वाचे आहे.

शेअर बाजारात व्यवहार करून मिळालेल्या नफ्याचा विनियोग आपल्या ‘बकेट लिस्ट’मधील पर्यटन, मनोरंजन, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण अशा मौजमजांसोबत सेवाभावी संस्थांना दानधर्म, गोरगरिबांना मदत यासाठी केला तर तो अनुभव तुम्हाला उर्वरित आयुष्यात फार मोठे आंतरिक समाधान देणारा ठरेल.

(सुधीर जोशी: sudhirjoshi23@gmail.com)