संदीप वाळुंज
दररोज वर्तमानपत्रात छापून येते किंवा दूरचित्रवाहिन्यांवर सांगितले जाते की, आज सेन्सेक्स इतक्यावर बंद झाला, निफ्टी इतका वाढला किंवा घसरला. त्या आकड्यावरून पुढे निष्कर्षही काढलेला असतो. बाजार अरुंद पट्ट्यात स्थिरावला आहे, गुंतवणुकीच्या संधी कमी झाल्या आहेत वगैरे. आणि नकळत त्याचा परिणाम आर्थिक निर्णयांवर होतो. सेन्सेक्स आणि निफ्टी हे जणू असे आरसे झाले आहेत, ज्यातून संपूर्ण देश बाजाराचे प्रतिबिंब पाहतो.पण आरसा नेमके काय काम करतो, याचा जरा विचार करा. तो फक्त एका प्रश्नाचे उत्तर देतो, “या क्षणी मी कसा दिसतोय?” तुमची बलस्थाने कोणती किंवा तुमच्यातील उणिवा काय, तुमची क्षमता, तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात किंवा भविष्यात तुम्ही कुठे पोहोचू शकता, हे त्याला दाखवता येत नाही.

सेन्सेक्स आणि निफ्टी हे अगदी असेच आरसे आहेत. ते बाजारातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या त्या क्षणाच्या बाजारमूल्याचे मर्यादित पण अचूक प्रतिबिंब दाखवतात. पण लाखो गुंतवणूकदार या प्रतिबिंबालाच संपत्ती निर्मितीचे संपूर्ण सत्य मानण्याची चूक करतात. त्यामुळे या निर्देशांकांचा योग्य उपयोग करायचा असेल, तर तुम्हाला चार गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.-ते कसे तयार होतात,

-ते काय दाखवतात,-काय दाखवू शकत नाहीत आणि

-त्यांच्यापलीकडे जाऊन आपण आणखी काय तपासले पाहिजे.

हे मर्यादित प्रतिबिंब कसे तयार होते?

सेन्सेक्समध्ये बीएसईमधल्या आघाडीच्या केवळ ३० कंपन्यांचा समावेश केलेला आहे. निफ्टी एनएसईच्या फक्त ५० सर्वात मोठ्या कंपन्यांवर आधारित आहे. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की, या व्यतिरिक्त भारतात इतर हजारो सूचिबद्ध कंपन्याही आहेत, ज्यांत दैनंदिन व्यवहार होतात.इतकेच नव्हे तर हे निर्देशांक ‘फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन’ पद्धतीने तयार केले जातात. म्हणजेच त्यांच्यात मोठ्या कंपन्यांचे वजन यांत्रिक पद्धतीने खूप जास्त असते. निफ्टी ५० चा विचार केला तर, संपूर्ण निर्देशांकाची जवळपास ६० टक्के हालचाल ही केवळ तेरा किंवा चौदा कंपन्यांच्या समभागांमुळे (शेअर्स) ठरते.

म्हणूनच जेव्हा एखादा निवेदक म्हणतो, की “आज निफ्टी स्थिर (फ्लॅट) होता,” तेव्हा त्याचा खरा अर्थ असा असतो की “भारतातील सर्वात मोठ्या तेरा-चौदा कंपन्यांच्या भारित सरासरीत आज फारसा बदल झाला नाही.” पण सामान्य गुंतवणूकदार याचा अर्थ लावतो. “आज बाजारात काहीच घडले नाही.” या एका गैरसमजातूनच असंख्य गुंतवणूकदारांची दिशाभूल होते.याचा अर्थ माध्यमे चुकीची माहिती देतात, असा मुळीच नाही.

बाजाराला संवादासाठी एका सामायिक भाषेची गरज असते. धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि जागतिक गुंतवणूकदार यांना समजेल असा एक सामायिक मापदंड (बेंचमार्क) आवश्यक असतो. पण अतिपरिचयामुळे सामान्य गुंतवणूकदार या मापदंडांना संपूर्ण बाजाराचे प्रतिबिंब समजू लागतात आणि तिथेच घोडे पेंड खाते.मग हा आरसा असा ‘अर्धामुर्धा’ का बनवला आहे?निर्देशांक चुकीच्या पद्धतीने बनवले आहेत, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तुम्ही ज्या कामाची अपेक्षा त्यांच्याकडून करत आहात, त्या कामासाठी ते बनवलेलेच नाहीत. निर्देशांकाची निर्मिती ही वस्तूतः बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेली आहे. बाजारातील मोठ्या, तरल आणि प्रस्थापित कंपन्यांच्या दैनंदिन वाटचालीचा सारांश एका पारदर्शक व गुंतवणूकयोग्य आकड्यात संख्याबद्ध करणे हे त्यांचे काम आहे आणि हे काम ते अत्यंत यशस्वीरीत्या करतात.

कमी खर्चिक, गुंतवणुकीसाठी योग्य तरलता असलेले आणि गुंतवणूकदारांना उथळ कथांमागे धावण्यापासून रोखून वास्तविक, फायदेशीर व्यवसायाशी जोडून ठेवणारे निर्देशांक हे उत्कृष्ट आधारबिंदू आहेत.मुद्दा हा आहे की निर्देशांकाचे उद्दिष्ट आणि गुंतवणूकदाराचे ध्येय एक नसते.

निर्देशांकाचे काम बाजाराचे प्रतिनिधित्व करणे आहे.तुमचे काम संपत्ती निर्माण करणे आहे आणि ही दोन पूर्णपणे वेगळी उद्दिष्टे आहेत.

निर्देशांकाला एखादी ढासळणारी कंपनी स्वतःच्या विवेकाने विकता येत नाही. नियम सांगतील तेव्हाच ती निर्देशांकातून बाहेर पडते. एखाद्या उत्कृष्ट कंपनीत नियमापेक्षा जास्त वजन देता येत नाही. एखाद्या थकलेल्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि उद्याचे विजेते वेळेआधी ओळखून त्यात गुंतवणूक करता येत नाही. त्याच्या रचनेच्या नियमांनुसार एखादी कंपनी विशिष्ट आकाराची मोठी झाल्याशिवाय तिला निर्देशांकात प्रवेशच मिळत नाही.

त्यामुळे निर्देशांक विजेत्यांचे स्वागत ते विजेते झाल्यानंतर करतो. बऱ्याचदा एखादी झपाट्याने वाढणारी कंपनी निर्देशांकात प्रवेश करण्याइतकी मोठी होईपर्यंत तिच्या संपत्ती निर्मितीचा मोठा टप्पा आधीच पार पडलेला असतो. त्यामुळे संपत्तीवृद्धीचा प्रयत्न करणाऱ्या अनेक पोर्टफोलिओंमध्ये निर्देशांकाबाहेरील समभागांचाही समावेश असतो आणि त्याचमुळे निर्देशांकातील हालचाल तुमच्या पोर्टफोलिओचे किंवा तुमच्यासमोरील संधींचे खरे प्रतिबिंब कधीच असू शकत नाही.

या आरशात काय दिसत नाही?हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रतिबिंब काय दाखवू शकत नाही हे समजले की, बाजाराचे वेगळेच वास्तव दिसू लागते.सपाट दिसणारा निर्देशांक आत मोठी उलथापालथ लपवू शकतो: निर्देशांक ही एक सरासरी असल्याने एका क्षेत्रातील जोरदार तेजी दुसऱ्या क्षेत्रातील मोठ्या घसरणीने पूर्णपणे झाकली जाऊ शकते. एखाद्या दिवशी निर्देशांक कोणताही बदल न होता बंद होतो तेव्हा असे वाटते की आजचा दिवस अगदी शांत होता. प्रत्यक्षात मात्र बाजारात खूप काही घडत असते.

उदाहरणार्थ, मोठ्या बँकिंग समभागांना सर्दी झाली की निफ्टी गोठल्यासारखा दिसतो, पण त्याच वेळी उत्पादन, संरक्षण किंवा वाहन उद्योगात जोरदार तेजी सुरू असू शकते.प्रत्येक बाजारामध्ये काही छुपे बाजार दडलेले असतात: संथ गतीने चालणाऱ्या बाजारातही विशिष्ट विभाग किंवा क्षेत्रांमध्ये प्रचंड तेजी असू शकते आणि त्याच वेळी, काही ठिकाणी छुपी मंदी असू शकते जिथे लोकांचे पैसे हळूहळू बुडत असतात. मुख्य निर्देशांक यापैकी कशाचेही दर्शन घडवू शकत नाही. तो या सर्वांची सरासरी काढून एक अशी सामान्य आकडेवारी सादर करतो, जी कोणाच्याही प्रत्यक्ष अनुभवाचे अचूक वर्णन करत नाही.बाजाराचे नेतृत्व करणाऱ्या क्षेत्रांमध्ये अदृश्यपणे बदल होत असतात: तेजीच्या बाजारातही नेतृत्वाची धुरा सतत एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे सोपवली जात असते. ज्या वित्तीय कंपन्यांनी गेल्या दशकात बाजाराचे नेतृत्व केले, त्यांची जागा आता कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा संक्रमण किंवा नवीन उत्पादन क्षेत्रातील कंपन्या घेत असू शकतात.

केवळ निर्देशांकाच्या पातळीवर लक्ष ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना बाजार ‘हळूहळू वाढत आहे’ एवढेच समजते पण बाजाराचे मुख्य इंजिनच बदलले जात आहे, हे अनेकदा लक्षातही येत नाही. ही सर्वात महागडी चूक किंवा ‘अंधत्व’ ठरू शकते, कारण पुढच्या दशकातील संपत्तीची निर्मिती नेमक्या याच बदलांवर अवलंबून असते.मग या प्रतिबिंबापलीकडे काय पाहावे?

आरसा संपूर्ण चित्र दाखवत नाही याचा अर्थ तो फेकून द्यावा आणि लपलेल्या तेजीच्या मागे अंधाधुंद धावावे असा अजिबात नाही. अशा वागण्याने गुंतवणूकदार बाजाराच्या सर्वात धोकादायक आणि लहरी कोपऱ्यात चुकीच्या वेळी प्रवेश करतात.या समस्येवर योग्य उपाय म्हणजे आरशाला त्याच्या कुवतीबाहेरचे प्रश्न विचारणे थांबवणे आणि त्याबरोबर अधिक चांगली साधने वापरणे.तुमचा गुंतवणूक डॅशबोर्ड अधिक व्यापक करा:

मुख्य निफ्टीबरोबर निफ्टी ५०० सारख्या व्यापक निर्देशांकावरही नजर ठेवा. त्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांचा समावेश असतो. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या ‘ठळक’ बातम्यांमध्ये न दिसणाऱ्या संधी अनेकदा इथे दिसतात.

निफ्टी मिडकॅप १५० आणि स्मॉलकॅप २५० निर्देशांक वेगवेगळे करून पाहा. त्यात आघाडीचे निर्देशांकांनी झाकून टाकलेली क्षेत्रे स्पष्ट दिसू शकतात. मात्र हेही लक्षात ठेवा, हे निर्देशांक जितक्या वेगाने वर जातात, तितक्याच वेगाने खालीही येतात.

विविध क्षेत्रांचे स्वतंत्र निर्देशांक पाहा. त्यामुळे बाजाराचे नेतृत्व बदलत असल्याचे संकेत मुख्य निर्देशांकांत बदल होण्यापूर्वीच मिळू शकतात.निफ्टीच्या समान-वजन (इक्वल-वेट) आवृत्तीची तुलना मूळ निर्देशांकाशी करा. दोन्हीमधील फरक संपूर्ण बाजाराची हालचाल प्रत्यक्षात काही मोजक्या दिग्गज कंपन्यांवर किती अवलंबून आहे हे दाखवतो.

‘अॅडव्हान्स-डिक्लाइन रेशो’ तपासा. एखाद्या दिवशी किती समभाग वाढले आणि किती घसरले, हे तो दाखवतो. त्यामुळे वरवर सपाट दिसणाऱ्या बाजारात प्रत्यक्षात व्यापक तेजी आहे की व्यापक घसरण, याचा अंदाज येतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदैव हे लक्षात ठेवा.तुमच्या पोर्टफोलिओमध्ये केवळ बाजारातील सर्वात मोठ्या कंपन्या नाहीत.

तुमची आर्थिक उद्दिष्टे ही निर्देशांकांची जबाबदारी नाही.आणि तुमचा स्कोअरबोर्ड केवळ तुमचा पोर्टफोलिओ हाच आहे, जो पूर्णपणे तुमच्या गरजा, आयुष्याचे टप्पे, जोखीम पत्करण्याची तयारी आणि तुम्ही निवडलेल्या कंपन्या यावर आधारित आहे.