-व्ही. एस. राधाकृष्णन
अलीकडील नियामक घडामोडींनंतर टाटा सन्स सूचिबद्ध व्हावी की नाही या प्रश्नाला नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. यातील बहुतेक चर्चा नियमन, कंपनी प्रशासन, मालकीहक्क आणि सूचिबद्धतेचे फायदे यांवर केंद्रित राहिली आहे. पण, आणखी एका पैलूचा विचार करणे आवश्यक आहे, तो म्हणजे एखाद्या मोठ्या समूहातील व्यवसायांपैकी एका व्यवसायाला दीर्घकालीन अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा सर्वोच्च होल्डिंग कंपनी कोणती भूमिका बजावते?
सूचिबद्ध होल्डिंग कंपनीचे स्पष्ट फायदे असतात, ते म्हणजे बाजारभाव, तरलता (लिक्विडिटी), व्यापक भागधारक वर्ग आणि गुंतवणूकदारांचे सातत्यपूर्ण बारकाईने लक्ष. तसेच, एकाग्र आणि कटिबद्ध दीर्घकालीन मालक कधी-कधी असे निर्णय घेऊ शकतो, जे पुढील एक किंवा दोन वर्षांसाठी आकर्षक वाटणार नाहीत, पण खूप दीर्घ कालावधीसाठी ते फायद्याचे ठरू शकतात. अशी कंपनी अतिरिक्त भांडवल पुरवू शकते, व्यवसायाला सावरण्यासाठी वेळ देऊ शकते आणि परिस्थितीनुसार समूहामध्ये भांडवलाची देवाणघेवाण करू शकते.
याचा अर्थ असा नाही की, असूचिबद्ध (अनलिस्टेड) कंपनी आपोआप चांगली ठरते किंवा सूचिबद्ध कंपन्या दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवू शकत नाहीत. मुद्दा असा आहे की, मोठ्या कंपनीकडून अपेक्षित असलेले प्रशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम ठेवून एक प्रबळ व व्यावसायिकरित्या चालवली जाणारी असूचिबद्ध सर्वोच्च होल्डिंग कंपनी भांडवल वाटपात आणि व्यवसायातील जोखमीचा योग्य हिस्सा पेलण्यात अधिक लवचिकता देऊ शकते का?
एका बँकरसाठी प्रश्न म्हणजे, व्यवसायातील जोखीम प्रत्यक्ष नुकसानात बदलते, तेव्हा ते नुकसान संबंधित उद्योग समूह स्वतः पेलतो की ते कर्जदारांच्या (बँका) माथी मारले जाते?
सूचिबद्धता: नियामकांचा आदेश
आरबीआयच्या स्केल-आधारित नियामक आराखड्यानुसार टाटा सन्सचे वर्गीकरण ‘अप्पर लेयर’ एनबीएफसी (NBFC ) म्हणून करण्यात आले आहे आणि विहित मुदतीत ती सूचिबद्ध होणे बंधनकारक आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये, आरबीआयने (RBI) टाटा सन्सचा सीआयसी नोंदणी रद्द करण्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे नियामकांची भूमिका स्पष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय नियामक अनुभव प्रामुख्याने एकाच मोठ्या समूहाच्या संरचनेमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींवर नियंत्रण ठेवण्यावर भर देतो. ही रचना पूर्णपणे संपवण्यावर नाही आणि हे एकत्रित देखरेख, प्रशासन, भांडवल आणि माहिती प्रकटीकरण आवश्यकतांद्वारे साध्य केले जाते.
टाटा सन्सच्या संदर्भात यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो: अधिक कडक नियामक देखरेखीसाठी मूळ होल्डिंग कंपनी स्वतःच सूचिबद्ध असणे खरोखर आवश्यक आहे का?
संकटाच्या काळातील वर्तन: गतकाळातील दृष्टीकोन
टाटा फायनान्स जेव्हा प्रतिष्ठा महत्त्वाची होती: १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धातील एनबीएफसी संकटामुळे मोठ्या संख्येने छोट्या ठेवीदारांना नुकसानाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, टाटा फायनान्स अडचणीत आली, तेव्हा टाटा ग्रुपने (Tata group) पुढे येत सुमारे ६०० कोटी रुपयांची रोकड/रोख समकक्ष रक्कम उपलब्ध केली आणि सर्व छोट्या ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे चुकते केले. कोणत्याही ठेवीदाराचे पैसे बुडाले नाहीत. अनेक दशकांत कमावलेल्या प्रतिष्ठेचे मोल काय असते, हे यातून सिद्ध झाले.
टाटा टेलिग्रुपने पेललेला नुकसानीचा भार
व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर त्यातून पळ न काढता कर्ज फेडण्यासाठी टाटा सन्सने टाटा टेलिमध्ये सुमारे ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. हे नुकसान बँकांवर ढकलण्याऐवजी ग्रुपने स्वतः सहन केले. याचा अर्थ असूचिबद्ध असण्यामुळे ही क्षमता निर्माण झाली असा नाही; तर ग्रुपची आर्थिक ताकद आणि त्याची मालकी रचना यामुळे हे शक्य झाले.
एअर इंडिया: दीर्घकालीन प्रवास
विमान कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणे ही दोन किंवा तीन वर्षांची प्रक्रिया नाही. विमानांचा ताफा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, सेवा मानक, हवाई मार्ग आणि ग्राहकांचा अनुभव या सर्वांसाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि मालकीच्या पाठबळाची आवश्यकता असते.
परतावा मिळण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, तेव्हा एकाग्र व दीर्घकालीन मालकाकडे त्या मार्गावर टिकून राहण्याची अधिक लवचिकता असू शकते. याचा अर्थ असा नाही की, सूचिबद्ध कंपनी तसे करू शकत नाही. प्रश्न हा आहे की, त्या मार्गावर ठाम राहण्यासाठी मालकीची रचना किती लवचिकता प्रदान करते.
अल्पसंख्याक भागधारक आणि टाटा ट्रस्ट्स
शापूरजी पालोनजी ग्रुप आणि इतर अल्पसंख्याक भागधारकांचा टाटा सन्समध्ये हिस्सा आहे. असूचिबद्ध राहिल्याने या भागधारकांसाठी तरलता आणि योग्य बाजारभाव शोधण्यावर मर्यादा येतात. सूचिबद्धतेमुळे त्यांना बाजारमूल्य मिळून आणि हिस्सा विकून रोकड मिळवण्याचा सोपा मार्ग उपलब्ध होऊन या समस्येचे निराकरण होऊ शकते.
अधिक मोठा प्रश्न
भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, जिथे अनेक मोठे व्यावसायिक समूह आहेत, ज्यांची भांडवली गरज मोठी आहे आणि त्यांचे व्यवसाय वेगवेगळ्या आर्थिक चक्रांमधून काम करत असतात. प्रत्यक्ष कामकाज करणाऱ्या ऑपरेटिंग कंपन्यांची सूचिबद्धता करण्यासाठी चांगली कारणे आहेत, पण प्रत्येक मोठ्या व्यवसाय समूहाला त्याच्या सर्वोच्च होल्डिंग कंपनीची सूचिबद्धता करणे खरोखर आवश्यक आहे का, असा विचार करणे योग्य ठरेल.
अधिक मोठा प्रश्न असा आहे की, भारताच्या नियामक चौकटीने इतर प्रगल्भ नियामक देशांप्रमाणे हे मान्य केले पाहिजे का, की विविध व्यवसाय समूह आणि मालकी संरचनांच्या वेगवेगळ्या ताकदी आणि जोखीम प्रोफाइल असू शकतात. जिथे एखादी सर्वोच्च होल्डिंग कंपनी पुरेशी भांडवल पर्याप्तता, व्यावसायिक प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थेवर जोखीम न ढकलता आव्हानात्मक काळातही आपल्या व्यवसायांना आधार देण्याचा पूर्वेतिहास दाखवून देते, तिथे या वैशिष्ट्यांचा नियामकांच्या मूल्यांकनात भाग म्हणून समावेश केला गेला पाहिजे.
प्रश्न हा नाही की, सूचिबद्धतेचे काही फायदे आहेत की नाही? ते नक्कीच आहेत. प्रश्न हा आहे की, प्रत्येक मोठ्या सर्वोच्च होल्डिंग कंपनीसाठी सूचिबद्धता हीच एकमेव रचना असावी का? टाटा सन्सच्या बाबतीत, केवळ सूचिबद्धतेला अंतिम साध्य मानण्याऐवजी व्यवस्थात्मक जोखीम, प्रशासन, भांडवली ताकद आणि दीर्घकालीन संस्थात्मक मूल्याच्या आधारे या प्रकरणाची छाननी होणे योग्य ठरेल.
(लेखक स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी एमडी आहेत.)
