प्रश्न : म्युच्युअल फंडात शिस्तशीर गुंतवणुकीचा मार्ग असलेल्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून पैसे गुंतवले तर फायदा होतो असे म्हटले जाते. मी गेल्या दीड वर्षापासून एकरकमी आणि दर महिन्याला पैसे गुंतवतो आहे. पण चांगला परतावा मिळत नाहीये, तर माझी गुंतवणूक चुकते आहे का? एसआयपी थांबवू का?

उत्तर – म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या बऱ्याच गुंतवणूकदारांना गेल्या दोन वर्षांपासून आपल्या गुंतवणुकीची चिंता वाटते आहे. २०२० या वर्षात करोना संकटामुळे शेअर बाजार दणकून आपटले, त्या वेळी बऱ्याच गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केली. वर्षभरानंतर जेव्हा शेअर बाजारात तेजी निर्माण झाली, तेव्हा सगळ्यांनाच उत्तम परतावा मिळाला. ज्यांनी दहा वर्षांपासून सलग गुंतवणूक केली आहे, त्यांना तर मधल्या एक-दीड वर्षात आलेल्या पडझडीमुळे स्वस्तात युनिट मिळून ‘एसआयपी’ तंत्राचा फायदा झाला. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचा ओघ वाढला.

म्युच्युअल फंड म्हणजे हमखास पैसे?

फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड म्हणजे हमखास पैसे देणारे साधन आहे, असा विचार करून गुंतवणूक करायला लागले. समाजमाध्यमांवरील व्हिडीओ पाहून गुंतवणुकीचे स्वतःच निर्णय घेणाऱ्यांचा यात मोठ्या प्रमाणावर समावेश होता, असा आमचा अनुभव आहे. मागच्या पाच वर्षांतील फंडांनी दिलेले घसघशीत परतावे पाहून लोकांनी ‘हाच तो माझा फंड’ असा विचार मनात ठेवून पैसे गुंतवायला सुरुवात केली.

मिडकॅप, स्मॉलकॅपची मोहिनी

जेव्हा शेअर बाजार अस्थिर असतात, त्या वेळी कायमच लार्जकॅप म्युच्युअल फंड आणि इक्विटी हायब्रिड फंड योजना गुंतवणुकीसाठी त्यातल्या त्यात महत्त्वाच्या समजल्या जातात. पण गेल्या तीन वर्षांतला मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडातील गुंतवणुकीचा वाढता आकडा पाहिल्यास लोकांना त्यांची भुरळच पडली आहे, हे स्पष्ट दिसते. अनेक नवख्या गुंतवणूकदारांच्या समजा पाच फंडात गुंतवणुकी सुरू असतील, तर त्यातील चार फंड मिड आणि स्मॉलकॅप प्रकारचे आहेत असेही बऱ्याचदा दिसते.

अस्थिरतेच्या वर्षातील परतावे

मागच्या वर्षीपासून जागतिक भू-अर्थकारणात चमत्कारिक घडामोडी घडू लागल्या. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबेल, अशी एक शक्यता निर्माण झालेली असताना ते थांबले तर नाहीच वर आणखी चिघळू लागले. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेभरवशाची धोरणे राबवायला सुरुवात केल्यामुळे जागतिक शेअर बाजारावर त्याचा स्पष्ट परिणाम दिसायला लागला. देशांतर्गत भांडवली बाजारात दर महिन्याला काही हजार कोटी रुपयांचा निधी म्युच्युअल फंडामार्फत गुंतवला जात आहे. मात्र देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीची दारे खुली होण्यासाठी खरी गरज आहे ती परदेशी गुंतवणूकदारांची. गेल्या एक वर्षाचा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच ‘एफआयआय’ गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास, त्यांनी पैसे भारतातून काढून दुसऱ्या ठिकाणी गुंतवले आहेत हे स्पष्ट दिसते.

याचा थेट परिणाम अपरिहार्यपणे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरच्या घसरणीवर झाला. त्यामुळे एकेकाळी ‘चमकते तारे’ असलेले मिड आणि स्मॉलकॅप फंड आता बँकेच्या मुदत ठेवींइतकेही परतावे देत नाहीत, अशी तक्रार गुंतवणूकदारांकडून सुरू झाली.

जोखीम कालावधी आणि गुंतवणूक निर्णय

ज्यांनी लोभी मनोवृत्तीने मागच्या एक दीड वर्षात गुंतवणूक सुरू केली असेल आणि कमी वेळात म्युच्युअल फंडातून जास्त पैसे मिळतील या मानसिकतेने पैसे गुंतवले असतील, त्यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाची किंमत चुकती करावी लागणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी पाच ते सात वर्षांच्या गुंतवणूक ध्येयासह आपली गुंतवणूक गेल्या दोन वर्षांत सुरू केली असेल त्यांनी आपली गुंतवणूक अजिबात थांबवू नये किंवा विकूसुद्धा नये.

‘एसआयपी’मध्ये पडत्या बाजारात किंवा अस्थिर बाजारात गुंतवणूक थांबवणे हा इलाज नसून उपाय जेवढे मिळतील तेवढे युनिट जमा करून पोर्टफोलिओ वाढवणे हा आहे.

रणनीती कशी असावी?

तुम्ही गेल्या वर्ष दीड वर्षाचा अंदाज घेऊन गुंतवणूक करणार असाल, तर ते शहाणपणाचे लक्षण नाही. म्युच्युअल फंडाच्या संकल्पनेमध्येच असे म्हटले आहे की, फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. म्हणजेच भविष्यकालीन दृष्टिकोनातून आपल्या फंडाचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणूक सुरू केली असेल तर त्या रणनीतीमध्ये कुठलाही बदल करायची गरज नाही. मात्र दर दोन वर्षांनी तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक करत आहात त्या फंडाचा आढावा घ्यायला विसरू नका.