सीमेन्स लिमिटेड ही विविध उत्पादनांसाठी आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी एकात्मिक उपाय, प्रक्रिया उद्योगांसाठी ड्राइव्ह, बौद्धिक पायाभूत सुविधा (इंटेलिजेंट इनफ्रास्ट्रक्चर) आणि जीवाश्म इंधन यामध्ये कार्यरत आहे. याबरोबरच तेल आणि वायू अनुप्रयोगांपासून कार्यक्षम आणि स्वच्छ ऊर्जा निर्मिती, रेल्वे वाहनांसह प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी विद्युत ऊर्जेचे प्रसारण आणि वितरण, रेल्वे ऑटोमेशन आणि रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक महत्त्वाच्या व्यवसायात कार्यरत आहे.
कंपनीच्या व्यवसायाचे मुख्य विभाग पुढीलप्रमाणे आहेत: ऊर्जा विभागकंपनी युटिलिटी, स्वतंत्र वीज उत्पादक आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कंपन्यांसारख्या विविध ग्राहकांसाठी तेल आणि वायू उत्पादन, वीज निर्मिती आणि प्रसारणाच्या ऊर्जा मूल्य साखळीत पूर्णपणे एकात्मिक उत्पादने, उपाय आणि सेवा प्रदान करते.
स्मार्ट पायाभूत सुविधा विभाग
कंपनी पॉवर युटिलिटी, औद्योगिक कंपन्या आणि पायाभूत सुविधा विभागांसाठी इलेक्ट्रिकल ऊर्जेच्या प्रसारण आणि वितरणासाठी उत्पादने, प्रणाली, उपाय आणि सेवांचा पुरवठादार आहे. पोर्टफोलिओमध्ये कमी आणि मध्यम व्होल्टेज वितरण, स्मार्ट ग्रिड आणि ऊर्जा ऑटोमेशनसाठी उपाय आणि कमी व्होल्टेज वीज पुरवठा प्रणाली समाविष्ट आहे.
डिजिटल इंडस्ट्रीज श्रेणीकंपनीकडे उत्पादन डिझाइन आणि उत्पादन अंमलबजावणीपासून ते स्वतंत्र आणि प्रक्रिया उद्योगांसाठी सेवांपर्यंत संपूर्ण जीवनचक्र व्यापणारे अग्रगण्य ऑटोमेशन, ड्राइव्ह आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा पोर्टफोलिओ आहे.
मोबिलिटी श्रेणीयामध्ये कार्यक्षम मोबिलिटी सोल्युशन्स आणि फ्रेट ट्रान्सपोर्ट, सिग्नलिंग, विद्युतीकरण आणि रेल्वे पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
इतर व्यवसाय
या अंतर्गत खनिजे, खाणकाम आणि सिमेंट, सिंचन, तेल आणि वायू, धातू, लगदा आणि कागद, सागरी बंदरे, नवीकरणीय ऊर्जा आणि संरक्षण यासारख्या उद्योगांचा समावेश होतो.
सीमेन्स लिमिटेडने ऊर्जा व्यवसायाचे विलगीकरण केले आहे. योजनेनुसार प्रत्येक भागधारकाला सीमेन्स एनर्जीचा एकास एक (१:१) या प्रमाणात समभाग मिळणार आहे. हा शेअर लवकरच भांडवली बाजारात सूचिबद्ध होई. ऊर्जा व्यवसायाचे विलगीकरण केल्यानंतर सीमेन्सचा बाजारभाव अपेक्षेप्रमाणे खाली आला आहे. मात्र सध्याच्या भावात सीमेन्समधील दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
विलगीकरणानंतर गुंतवणुकीचे फायदे
१. केंद्रित व्यवसाय प्रारूप
• विलगीकरणानंतर मूळ कंपनी आता कोर डिजिटल व्यवसाय, स्मार्ट इनफ्रास्ट्रक्चर आणि मोबिलिटी यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ही सर्व क्षेत्र भारतातील आगामी दशकात वेगाने वाढणारे आहेत.• स्मार्ट सिटी प्रकल्प, रेल्वे सुधारणा, इंडस्ट्री सोल्युशन्स यामुळे दीर्घकालीन वाढीची क्षमता.
२. उच्च मार्जिन असलेला व्यवसाय उरेल• एनर्जी डिव्हिजन तुलनेत अधिक कॅपिटल-इंटेन्सिव्ह आणि लो-मार्जिन आहे.
• विलगीकरणानंतर उरलेला व्यवसाय अधिक नफा आणि कमीत कमी भांडवली गुंतवणूक असलेला असेल. त्यामुळे समभाग परतावा क्षमता वाढेल.
३. मूल्यवर्धन
• अशा प्रकारच्या विलगीकरणामुळे कंपन्या अधिक पारदर्शक होतात आणि मूल्यवर्धन होते.
• स्वतंत्रपणे दोन्ही कंपन्या बाजारात जास्त किमतीला व्यवहार करू शकतील.
४. जागतिक तंत्रज्ञानाचा लाभ
• सीमेन्स एजीच्या जागतिक नाममुद्रा व तांत्रिक नवकल्पनांचा फायदा मुख्य कंपनीला पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहे.
गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने २२,२४० कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,५०३ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला होता, तर डिसेंबर २०२४ अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत, कंपनीने ३,५८७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३७२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. अर्थात पुढील अर्ध वर्षाचे निकाल दोन्ही कंपन्यांची वाटचाल दाखवतील. कंपनी व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार नवीन कार्यादेश वाढते राहून हे विलगीकरण कंपनीच्या मूल्यांकनात वाढण्यास मदत करेल. सध्या २,९०० रुपयांवर व्यवहार करणारा हा शेअर एक प्रदीर्घ गुंतवणूक म्हणून पोर्टफोलियोमध्ये असायला हरकत नाही.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
सीमेन्स लिमिटेड (बीएसई कोड ५००५५०)
संकेतस्थळ: www.siemens.co.in
प्रवर्तक: सीमेन्स ए जी
बाजारभाव: २,९२०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इंजिनीयरिंग, पायाभूत सुविधा
भरणा झालेले भाग भांडवल: ७१.२० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७५.००
परदेशी गुंतवणूकदार ८.१९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ७.२८
इतर/ जनता ९.५३
पुस्तकी मूल्य: रु. ४३१
दर्शनी मूल्य: रु.२/-
लाभांश: ६००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ७९.३४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४५.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४७.६
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०२
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ५३.६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): २३.६
बीटा : १.५
बाजार भांडवल: रु. १,०४,००० कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४,६६२/२,४५०
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने Stocksandwealth@gmail.com
• वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.