scorecardresearch

‘इंडेक्स फंडा’द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा श्रीगणेशा

गुंतवणूक दीर्घकालीन स्वरूपाची करायची नसते आणि केलेल्या गुंतवणुकीचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ज्यांना जमत नसते, अशांना निष्क्रिय गुंतवणूकदार म्हणता येईल. या मंडळींना ‘इंडेक्स फंडा’तील गुंतवणुकीपासून सुरुवात करता येऊ शकेल.

Mutual Funds, Index Funds, investment
‘इंडेक्स फंडा’द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा श्रीगणेशा ( Image Source – Financial Express )

सुधाकर कुलकर्णी

आर्थिक साक्षरता हा एक कळीचा विषय आणि त्या अंगाने संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. परिणामत: बँक ठेवी, पोस्टाच्या योजना, विमा पॉलिसी यांसारख्या सुरक्षित व पारंपरिक पर्यायांव्यतिरिक्त थोडी जोखीम घेऊन शेअर्स, म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. त्यातही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे लोकांना सोपे वाटते. करोनाकाळाच्या आधीपासूनच म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू झाली व आजही ती सातत्याने वाढतच आहे.

म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने डेट, हायब्रिड व इक्विटी असे तीन प्रकार आहेत, यातील डेट अर्थात रोखेसंलग्न गुंतवणूक तुलनेने जास्त सुरक्षित असते. मात्र तीमधून मिळणारा परतावासुद्धा ८ ते ९ टक्के इतकाच असतो. तर हायब्रिड फंडातील गुंतवणूक डेटपेक्षा कमी, परंतु इक्विटीपेक्षा जास्त सुरक्षित असते आणि यातून सुमारे १० ते ११ टक्के इतका परतावा मिळू शकतो. याउलट इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडातील गुंतवणूक जास्त जोखमीची असते, पण परतावाही तुलनेने जास्त असतो. इक्विटी फंडाचे स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, लार्ज कॅप आणि इंडेक्स असे जोखीम कमी कमी होत जाणारे प्रमुख प्रकार आहेत आणि त्यानुसार १८ टक्के ते किमान १२-१३ टक्के इतका परतावा मिळू शकतो.

आपली गुंतवणूक करताना नेमका कोणता फंड निवडावा याबाबत सामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसा संभ्रम असतो. गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाचे सक्रिय (ॲक्टिव्ह) आणि निष्क्रिय (पॅसिव्ह) असे दोन प्रकार असतात. काही गुंतवणूकदारांना शेअर बाजारात असलेली जोखीम (रिस्क) माहीत असली तरी जास्त प्रमाणात घेणे परवडणारे नसते; तसेच गुंतवणूक दीर्घकालीन स्वरूपाची करायची नसते आणि केलेल्या गुंतवणुकीचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ज्यांना जमत नसते, अशांना निष्क्रिय गुंतवणूकदार म्हणता येईल. या मंडळींना ‘इंडेक्स फंडा’तील गुंतवणुकीपासून सुरुवात करता येऊ शकेल.

इंडेक्स फंडाचे स्वरूपही निष्क्रिय (पॅसिव्ह) व्यवस्थापित म्युच्युअल फंडाचे आहे. यातील गुंतवणूक शेअर बाजारातील एका ठरावीक इंडेक्स अर्थात निर्देशांकामधील शेअर्समध्येच केलेली असते आणि ती संबंधित शेअरचे त्या इंडेक्समधील भारांकानुसारच (वेटेज) केली जाते. उदाहरणार्थ, निफ्टी-५० निर्देशांकामध्ये रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस व एल अँड टी या कंपन्यांचे अनुक्रमे १०.४१, ९.०६, ७.२०, ४.४१ व ३.३४ टक्के इतके वेटेज आहे, तर एसबीआय निफ्टी-५० इंडेक्स फंडातील गुंतवणूक या कंपन्यांमध्ये त्यांच्या निफ्टी-५० निर्देशांकामधील वेटेजनुसार अनुक्रमे १०.४१, ९.०६, ७.२०, ४.४१ व ३.३४ टक्के या प्रमाणातच असेल. निफ्टी-५० मधील उर्वरित ४५ कंपन्यांमधील गुंतवणूकही या फंडातून संबंधित कंपनीच्या निफ्टी-५० मधील वेटेजइतकीच असेल. थोडक्यात, कोणत्या शेअर्समध्ये किती गुंतवणूक करावयाची हे फंड मॅनेजर ठरवत नसतो.

यामुळे इंडेक्स फंडातील चढ-उतार निवडलेल्या इंडेक्समधील चढ-उताराच्या जवळपासच असते आणि इंडेक्स फंडाचा परतावादेखील इंडेक्सच्या परताव्याच्या जवळपास असतो. थोडक्यात, इंडेक्स फंडाच्या पोर्टफोलिओत इंडेक्स प्रतिबिंबित झालेला असतो आणि फंड मॅनेजरला फक्त त्या इंडेक्सचा पाठपुरावा करावा लागतो. जर इंडेक्समधील एखाद्या शेअरचे वेटेज कमी-अधिक झाले तर त्यानुसार इंडेक्स फंडमधील त्या शेअरचे वेटेज कमी-अधिक करण्यासाठी संबंधित शेअरची खरेदी अथवा विक्री केली जाते. असे करताना कधी कधी नेमके वेटेज ठेवले जाऊ शकत नाही याला ‘ट्रॅकिंग एरर’ असे म्हणतात. असे ‘ट्रॅकिंग एरर’ कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो. जितके ‘ट्रॅकिंग एरर’ कमी असेल तितके इंडेक्स फंडाचा परतावा व संबंधित इंडेक्सचा परतावा यातील तफावत कमी असते.

इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे:

 • अन्य सक्रिय व्यवस्थापित फंडाच्या तुलनेने व्यवस्थापनाचा खर्च कमी असल्याने खर्चाचे प्रमाण (एक्स्पेंस रेशो) कमी असते. यामुळे परतावा चांगला मिळू शकतो.
 • गुंतवणूक इंडेक्समध्येच होत असल्याने ती उत्तमरीत्या वैविध्यपूर्ण असते व यामुळे गुंतवणुकीतील जोखीम कमी होते.
 • मिळणारा परतावा संबंधित इंडेक्सच्या परताव्याच्या जवळपास असतो.
 • ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची आहे, पण एखाद्या वैशिष्ट्य शेअर अथवा सेक्टरमधील गुंतवणुकीत असणारी जोखीम नको आहे अशांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
 • गुंतवणुकीचे वरचेवर पुनरावलोकन करण्याची गरज नसते.
 • आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी उपयुक्त (उदा: मुलांच्या उच्च शिक्षणासाठीची तरतूद/ सेवानिवृत्तीसाठीची तरतूद)
 • पूर्वनियोजित गुंतवणूक की ज्यात फंड मॅनेजरचा हस्तक्षेप नसतो.

असे असले तरी इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्याचे काही तोटेही आहेत:

 • यातील गुंतवणूक जोखीमरहित नसते, तर इंडेक्सला असणारी जोखीम या गुंतवणुकीलाही असते.
 • अन्य सक्रिय व्यवस्थापित फंडाच्या तुलनेने कमी परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.
 • फंड मॅनेजरच्या कौशल्याचा उपयोग होत नाही.
 • गुंतवणुकीत लवचीकता नसते.

इंडेक्स फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी?

ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची आहे, पण त्यातले बारकावे माहीत नाहीत. शिवाय ते समजून घेण्याकरिता आवश्यक असलेला वेळही नाही व फारसे ज्ञानही नाही अशांसाठी इंडेक्स फंड हा एक उत्तम पर्याय आहे .

इंडेक्स म्युच्युअल फंडाप्रमाणे, ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) हा पर्यायसुद्धा गुंतवणूकदारास उपलब्ध आहे. दोन्हीची संकल्पना एकच आहे. फक्त इंडेक्स म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एखाद्या म्युच्युअल फंडामार्फत करता येते व युनिटची खरेदी व विक्रीसंबंधित फंडाच्या बाजारातील ‘एनएव्ही’नुसार होत असते. याउलट इंडेक्स ईटीएफ हा शेअर बाजारात सूचीबद्ध असल्याने त्याची खरेदी-विक्री बाजारात दलालामार्फत बाजारभावाने होत असते. त्यामुळे इंडेक्स ईटीएफ हे इंडेक्स फंडापेक्षा जास्त तरल असतात.

आता आपण काही प्रमुख इंडेक्स फंडांची कामगिरी पाहू या.

(संदर्भ निर्देशांकाचा कंसात उल्लेख केला आहे.)

इंडेक्स फंडाचे नाव एयूएम कोटी रु.५ वर्षांचा सरासरी परतावाखर्चाचे प्रमाण
निप्पॉन इंडिया इंडेक्स फंड (सेन्सेक्स) ३६७ १३.६% ०.१५%
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडेक्स फंड (सेन्सेक्स) ६६४ १३.४१% ०.१६%
डीएसपी इंडेक्स फंड (निफ्टी ५०) ५०३ १०.९३% ०.४०%
आयडीएफसी इंडेक्स फंड (निफ्टी ५०) ६३५ १२.७०% ०.१०%
यूटीआय इंडेक्स फंड (निफ्टी ५०) ९,३७६ १२.५७% ०.२१%
एचडीएफसी इंडेक्स फंड (सेन्सेक्स) ४,१४१ १२.७२% ०.४०%
निप्पॉन इंडिया निफ्टी फार्मा इंडेक्स फंड ४,४२१ १३.८४% ०.१७%

वरील सात इंडेक्स फंडांचा पाच वर्षांचा सरासरी परतावा १२.८४% इतका येतो, तर सरासरी खर्चाचे प्रमाण (एक्स्पेंस रेशो) केवळ ०.२३ टक्के इतका येतो. इंडेक्स फंडातील गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची असते, शिवाय मिळणारा परतावासुद्धा १२ ते १३ टक्क्यांदरम्यान असू शकतो आणि हा परतावा बँक, पोस्ट, पीपीएफ, एनपीएस, विमा पॉलिसी यांसारख्या गुंतवणुकांच्या तुलनेत सुमारे ४ ते ५ टक्के अधिक असू शकतो आणि म्हणूनच इंडेक्स फंडात गुंतवणूक करणे सामान्य गुंतवणूकदारासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकते.

(लेखक पुणेस्थित सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 15:22 IST

संबंधित बातम्या