मागील आठवड्यातील लेखात, ‘निफ्टी निर्देशांकाला २६,१००च्या स्तरावर भरभक्कम अडथळा असून, २५,८०० ते २६,१०० या परिघामध्ये पायाभरणी केल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य साध्य होईल,’ असे म्हटले होते. सरलेल्या सप्ताहाचा आढावा घेतल्यास, गुरुवारी निफ्टी निर्देशांकाने २६,२४६ चा उच्चांक मारला. पण तो स्तर टिकवून ठेवण्यास अपयशी ठरल्याने, त्यात पुन्हा हलक्याफुलक्या घसरणीला सुरुवात झाली. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाला प्रथम २५,८०० आणि त्यानंतर २५,५०० हा भरभक्कम आधार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत निफ्टी निर्देशांकाने हा भरभक्कम आधार राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २६,३००,२६,५०० आणि त्यापुढे २६,८०० चा नवीन उच्चांकही दृष्टिपथात येईल.
चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील (पीएसयू) सर्वोच्च मान म्हणजे ‘महारत्न’ हा दर्जा आहे. महारत्न श्रेणीतील ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (भेल)’ आणि ‘कोल इंडिया’ या दोन कंपन्यांचे निकालपूर्व विश्लेषण करण्याची संधी या स्तंभातील २७ ऑक्टोबरच्या लेखात मिळाली.
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडची तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही २९ ऑक्टोबर होती. २४ ऑक्टोबरचा बंद भाव २३१ रुपये होता आणि निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २२७ रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर २२७ रुपयांचा स्तर राखत, २६५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केलेले होते. प्रत्यक्ष निकालाच्या अगोदर दोन दिवसांचा कालावधी हा गुंतवणूकदरांना चिंतन-मनन करण्यासाठी उपलब्ध होता. प्रत्यक्ष निकालानंतर समभागांनी २२७ रुपयांचा स्तर राखत १२ नोव्हेंबरला २९० रुपयांचा उच्चांक नोंदवला आणि आपण लेखात नमूद केलेले २६५ रुपयांचे वरचे लक्ष्यही पार केले. अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना यामुळे १४ टक्क्यांचा परतावा मिळविता आला. दीर्घ मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी २२७ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत असल्याने त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीचा समभाग निश्चिंतपणे राखून नक्कीच ठेवला असेल. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड समभागाचा २१ नोव्हेंबरचा बंद भाव २८२ रुपये आहे.
दुसरी महारत्न कंपनी कोल इंडिया. तिच्या तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख २९ ऑक्टोबर होती. २४ ऑक्टोबरचा बंद भाव ३९४ रुपये होता आणि निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ३८५ रुपये होता. प्रत्यक्ष वित्तीय निकालानंतर समभागाने ३८५ रुपयांचा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, तिमाही वित्तीय निकाल निराशादायक असून कोल इंडियाचा समभाग ३७५ रुपयांपर्यंत घसरू शकतो असे नमूद केलेले. जाहीर झालेला वित्तीय निकाल निराशादायक आहे. तुलनात्मक आर्थिक निकष, सप्टेंबर २०२४ आणि सप्टेंबर २०२५चे वाचन करता, या काळात कोल इंडियाची निव्वळ विक्री ही सप्टेंबर २०२४ मध्ये ३०,६७२ कोटी रुपये होती आणि ती सप्टेंबर २०२५ मध्ये २६,९०९ कोटी रुपये झाली. (विक्रीत घट नोंदवली गेली) करपूर्व नफा ८,०१६ कोटींवरून ५,९०५ कोटी रुपयांवर घसरला, तर निव्वळ नफा ६,१३७ कोटींवरून ४,०५३ कोटी रुपयांवर घसरला. असे दारुण अपेक्षाभंग करणारे तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यावर कोल इंडियाचा समभाग येणाऱ्या दिवसांत १० ते १५ टक्के कोसळण्याची शक्यता व्यक्त केलेली होती. निकालपूर्व विश्लेषणात नमूद केलेले, ३७५ रुपयांचे खालचे लक्ष्य कोल इंडियाच्या समभागांनी ७ नोव्हेंबरला दिवसांतर्गच ३७१.५० रुपयांचा नीचांक नोंदवत दाखविले. त्या दिवशीचा त्याचा बंद भाव ३७६ रुपये राहिला. या निराशाजनक वातावरणातील किमतींच्या उलाथापालथीत कोल इंडिया ३७५ ते ४०० रुपयांच्या परिघातच आजतागायत फिरत आहे. जसे की ३७५ रुपयांवरून १७ नोव्हेंबरला ३८९ रुपयांपर्यंतची क्षीण स्वरूपाची सुधारणा झाली. परंतु २१ नोव्हेंबरचा त्याचा बंद भाव ३७८ रुपये आहे. घडतंय ते नवलच म्हणायचं!
(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ई-मेल: ashishthakur1966@gmail.com)
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
