आजचा लेख प्रामुख्याने थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ष २०२० हे देशांतर्गत भांडवली बाजारासाठी ऐतिहासिक वर्ष ठरले होते. यावर्षी डीमॅट खाती उघडून समभागांमध्ये थेट गुंतवणूक करायची जणू लाटच आली, गेल्या महिन्यात राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’तर्फे प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीत सक्रिय डीमॅट खाती म्हणजे ज्यामध्ये शेअरची खरेदी-विक्री नियमितपणे होत असते, त्याची संख्या झपाट्याने घटत आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेअर बाजारांनी दिलेला अस्थिर परतावा हे आहे.

कोणत्याही कंपनीचा शेअर विकत घेताना त्याची निवड कशी करायची? या प्रश्नाचे उत्तर त्या क्षेत्रातील कंपनीचे आकारमान आणि मग कंपनी असा क्रम आहे. साधारणपणे शेअर बाजाराची पुढील क्षेत्रांमध्ये ढोबळ विभागणी करता येते. धातू आणि अधातू, पेट्रोलियम रसायने, ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) ,वाहननिर्मिती (ऑटो), बँकिंग, वित्तीय सेवा, औषधनिर्मिती (फार्मा), पायाभूत सुविधा (इन्फ्रा), अभियांत्रिकी, वाहतूक यांचा समावेश होतो. आता लहान आणि मध्यम गुंतवणूकदाराकडे असलेला गुंतवणुकीसाठीचा पैसा हा बहुधा कमी असतो, म्हणजे समजा एखाद्याला पाच लाख रुपये शेअर बाजारामध्ये गुंतवायचे आहेत तर दरवर्षी तेवढेच पैसे सलग गुंतवता येतील अशी क्षमता असलेले गुंतवणूकदार कमी असतात. नव्याने गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरलेले गुंतवणूकदार थोडा पैसा वरकड जमला किंवा साठला की गुंतवणूक करू, असा विचार करतात.

यामुळे निवडक एक किंवा दोन शेअरवर लक्ष केंद्रित करून ते खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या नवख्या आणि जुन्या गुंतवणूकदारांमध्ये एक समान दुवा असतो, तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर (क्वांटिटी) शेअर विकत घेऊ या. शंभर, दोनशे, पाचशे अशी शेअरची संख्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे. यामध्ये एक धोका असा निर्माण होतो की, कमी पैसे गुंतवण्याच्या क्षमतेमुळे पोर्टफोलिओचा आकार वाढतो. पण त्या तीन किंवा चारच कंपन्यांचे शेअर असतात.

एक उदाहरण घेऊ या. गेल्या पाच वर्षांपासून वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांव्यतिरिक्त संरक्षणविषयक उत्पादने करणारे कंपन्यांचे क्षेत्र हा नवा पर्याय गुंतवणूकदारांना मिळाला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स या आणि अशा निवडक कंपन्यांचे शेअर कमालीचा आकर्षक परतावा देणार आहेत, अशा वेळी गुंतवणूकदार एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात. इथे निर्माण होतो तो पोर्टफोलिओतील विविधतेचा मुद्दा.

क्षेत्रीय स्थित्यंतराचा अभ्यास

अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढते याचा अंदाज आपल्याला सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’च्या आकडेवारीवरून मिळतो पण दुसरीकडे अर्थव्यवस्था वाढते म्हणजे अर्थव्यवस्थेतील आणि पर्यायाने शेअर बाजारातील सगळ्याच कंपन्या चांगला परतावा देतात असे नाही. जसे अर्थव्यवस्थेचे तेजी- मंदीचे चक्र असते तसेच शेअर बाजारातील कोणते क्षेत्र पुढील काही वर्षांत घसघशीत परतावा देईल, याचा अभ्यास गुंतवणूकदारांनी केला पाहिजे.

एखादे क्षेत्र मागे पडणार आहे किंवा प्रगती नोंदवणार आहे हे कसे कळते? त्यासाठी त्या क्षेत्रातील लार्ज आणि मिडकॅप श्रेणीतील कंपन्यांचा नफ्याचा मागच्या तीन वर्षांचा आढावा घ्यावा. त्यांच्या व्यवसायाचे गणित समजून घ्यावे. कंपनी तिमाही निकालाच्या वेळी किंवा भागधारकांना पत्राद्वारे आपल्या योजना कळवत असतात. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा थेट फायदा कंपन्यांच्या व्यवसायावर आणि नफ्यावर होत असतो. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारतर्फे कोणते महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जात आहे, त्यामुळे कोणत्या कंपन्या थेट लाभार्थी असतील याचा अभ्यास करायला लागेल. मागील दहा वर्षांपासून केंद्र सरकारचा अर्थसंकल्प बघितला तर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सरकारी तिजोरीतून केल्या जाणाऱ्या खर्चाचे प्रमाण सतत कायम राहिले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राने मागच्या दहा वर्षांत सातत्याने निफ्टीपेक्षाही सरस परतावा दिला आहे.

संरक्षणात्मक (डिफेन्सिव्ह) कंपन्या खरोखरच असतात का?

फार्मा आणि एफएमसीजी या कंपन्यांना पोर्टफोलिओसाठी सुरक्षित कंपन्या म्हणून विकत घ्यायचा सल्ला दिला जातो. मागच्या दहा वर्षांचा आढावा घेतल्यास फार्मा क्षेत्राचा सरासरी परतावा निफ्टीपेक्षा कमी आहे आणि एफएमसीजी फारफार तर निफ्टीच्या जवळपास पोहोचला आहे. आयटीसी या कंपनीच्या शेअरबद्दल समाजमाध्यमातून मीम येत आहेत. अर्थात यामुळे कंपनीचे महत्त्व कमी होत नाही. पण पोर्टफोलिओला सुरक्षा देण्याच्या नादात आपण उगाचच ते शेअर कित्येक वर्षं बाळगून (होल्ड) बसलो नाही ना हा विचारसुद्धा व्हायला हवा. खरेदी केलेले शेअर फारसे तोट्यात नसतील किंवा फारसे नफ्यातही नसतील तर हिंमत दाखवून त्यातून बाहेर पाडण्याचे (एक्झिट) मानसिक बळ गुंतवणूकदारांमध्ये येण्याची गरज आहे.

फंड रणनीती कशी असावी ?

तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये जे फंड आहेत, त्यांनी आघाडीच्या कोणत्या १० क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे, यावरून निधी व्यवस्थापकाच्या निर्णयाचा अभ्यास करता येतो. एखादा उत्तम चाललेला फंड अचानकपणे दोन-तीन तिमाहीमध्ये अन्य फंडांच्या तुलनेत कमी परतावा देत असेल तर त्याच्या पोर्टफोलिओत फसलेले शेअर आहेत का? हे तपासून पाहायला हवे. अशा फंडातील गुंतवणूक ताबडतोब विकण्याची गरज नाही, ‘एसआयपी’ असल्यास काही महिन्यांची थांबवून फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये काय बदल होत आहेत, याचा आढावा घेऊन परिस्थिती सुरळीत झाली की, पुन्हा गुंतवणूक सुरू करता येईल.

आगामी काळातील कोणती क्षेत्रे महत्त्वाची ?

केंद्र सरकारचे अर्थसंकल्पातील ‘इन्फ्रा’ प्रेम कमी होत नाही तोपर्यंत ते क्षेत्र उत्तम परतावा देणारच आहे. मागील तीन वर्षांचा विचार करता सरकारचे निर्यातविषयक धोरण आता प्रभावी ठरेल असे वाटत आहे, ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ हळूहळू आकारात येत आहे. या क्षेत्रातील कंपन्यांचा अभ्यास गुंतवणूकदारांनी करायला हवा. संरक्षणविषयक उत्पादने निर्यात करणाऱ्या कंपन्या आता अधिक प्रभावीपणे कार्यरत होतील, अशी चिन्हे आहेत. डिजिटल क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञा (एआय) कशी अनिश्चितता निर्माण करेल आणि त्याचे कसे परिणाम होतील, हे येत्या वर्ष दीड वर्षात समजू लागेल आणि आयटी क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनेल.