ऑप्शन म्हणजे ‘झिरो-सम गेम’ असतो हे आपण या आधीच्या लेखात बघितले. ऑप्शन्स मार्केटमध्ये प्रत्येक व्यवहारासाठी दोन बाजू असतात – खरेदीदार (बायर) आणि विक्रेता (सेलर/राइटर). बाजारात जर ऑप्शन खरेदीदाराला (बायर) जर १०,००० रुपयांचा नफा झाला, तर त्याचा अर्थ असा की त्या व्यवहारातील विक्रेत्याला (सेलर) नेमका १०,००० रुपयांचाच तोटा झाला आहे. यासाठीच आपण आज बायर आणि सेलरचे विविध विकल्प लाभ बघणार आहोत.
वायदे बाजारात जेव्हा एखादा बायर ‘तेजी’ किंवा ‘मंदी’ विकत घेतो, तेव्हा तो तांत्रिक भाषेत Call ( CE) किंवा Put ( PE) विकत घेत असतो.
आता बायरच्या दृष्टीकोनातून तेजी विकत घेणे म्हणजे, जेव्हा बाजार किंवा एखादा विशिष्ट कंपनीचा शेअर वर जाणार आहे, तेव्हा ‘कॉल ऑप्शन’ विकत घेता. तर मंदी विकत घेणे म्हणजे, बाजार किंवा शेअरची किंमत खाली पडणार आहे असे वाटत असेल, तेव्हा ‘पुट ऑप्शन’ विकत घेतो. आता ऑप्शन सेलरची कार्यपद्धती बायरच्या अगदी उलट असते. सेलर ‘हक्क’ विकत घेत नाही, तर तो ‘जबाबदारी’ स्वीकारतो. त्यामुळे जेव्हा सेलरला बाजारात तेजी किंवा मंदी करायची असते, तेव्हा तो बायरच्या विरुद्ध व्यवहार करतो. सेलर कधीही ऑप्शन ‘विकत’ घेत नाही, तो ऑप्शन ‘शॉर्ट’ किंवा ‘राईट’ करतो. म्हणजेच जेव्हा सेलरला वाटते की, बाजार वर जाईल, तेव्हा तो ‘पुट ऑप्शन’ विकतो म्हणजेच ‘शॉर्ट’ करतो. तसेच बाजार खाली पडेल किंवा किमान वाढणार नाही, असे जेव्हा त्याची खात्री पटते, तेव्हा तो ‘कॉल ऑप्शन’ विकतो.
खरेदीदाराचे विकल्प लाभ
Payoff Profile for Buyer of Call Option : Long Call
कॉल ऑप्शन अंतर्गत केलेल्या करारात खरेदीदाराला शेअर ठरविलेल्या विशिष्ट किंमतीला खरेदी करण्याचा अधिकार मिळतो.
अमर्यादित नफा : खरेदीदाराचा नफा-तोटा हा बाजारातील चालू किंमतीवरून ही आधी करारात ठरविलेल्या विशिष्ट किमतीपेक्षा जास्त असेल तर खरेदीदाराला फायदा होतो. जेवढी बाजारातील शेअरची किंमत करारांतर्गत ठरविलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तेवढा अधिक नफा होतो.
मर्यादित तोटा : करारांतर्गत ठरविलेल्या विशिष्ट किमतीपेक्षा जर बाजारातील किंमत कमी असेल तर खरेदीदार करार पूर्ण करणार नाही. त्यामुळे त्याचे नुकसान मर्यादित राहते. शेअर खरेदीचा करार करण्यासाठी त्याने जे प्रीमियम दिले तेवढेच नुकसान होते.

उदा. ८० रुपयाला खरेदीदाराने करार केला असेल आणि बाजारातील किंमत जर ९० झाली तर १० रुपये नफा होईल. जसजशी बाजारातील किंमत वाढत जाईल तसतसा नफा वाढत जाईल. (हा करार खरेदीदाराच्या दृष्टिकोनातून बघितला जातो.)
Payoff Profile For Writer of Call Option : Short Call
ऑप्शन विक्रेता हा खरेदीदाराकडून प्रिमियम घेत असतो. जेवढा खरेदीदाराचा फायदा होतो, तेवढेच विक्रेत्याचे नुकसान होते. करार संपुष्टाच्या वेळी बाजारातील किंमत ही करारातील ठरविलेल्या किंमतीपेक्षा जास्त असेल तरच खरेदीदार करार पूर्ण करेल.
मर्यादित नफा : जर बाजारात चालू असलेली किंमत करारात ठरविलेल्या किंमतीपेक्षा कमी असेल तर विक्रेत्याला प्रीमियम इतकाच नफा होईल.
अमर्यादित तोटा :– जर बाजारात चालू असलेली किंमत जास्त असेल तर खरेदीदार करार पूर्ण करतो. सध्या बाजारातील किंमत करारात ठरविलेल्या किंमतीपेक्षा जेवढी अधिक असेल तेवढा विक्रेत्याला तोटा सहन करावा लागेल.

विक्रेत्याने जर ऑप्शनची विक्री ८० रुपयांना केली असेल आणि बाजारातील किंमत ९० रुपये झाली तर त्याला १० रुपये तोटा होईल. जेवढी बाजारातील किंमत अधिक असेल, तसतसे नुकसान वाढत जाईल. (हा करार विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून बघितला जातो)
विक्रेत्याचे विकल्प लाभ
Payoff Profile for Buyer of Put Option :- Long Put
अमर्यादित नफा : खरेदीदाराचा तोटा हा बाजारातील चालू किंमतीवरून ठरत असतो. करार संपुष्टात येण्याच्या कालावधीपर्यंत जर बाजारात चालू असलेली किंमत ही करारात ठरविलेल्या विशिष्ट किंमतीपेक्षा
कमी असेल तर खरेदीदाराला फायदा होतो. जेवढी बाजारातील शेअरची किंमत करारांतर्गत ठरविलेल्या किंमतीपेक्षा कमी असेल तेवढा अधिक नफा होतो.
मर्यादित तोटा : जर करारांतर्गत ठरविलेल्या किंमतीपेक्षा जर बाजारातील किंमत जास्त असेल तर खरेदीदार करार पूर्ण करणार नाही. त्यामुळे त्याचे नुकसान मर्यादित राहते. शेअर खरेदीचा करार करण्यासाठी त्याने विक्रेत्याला प्रिमियम दिले तेवढेच नुकसान खरेदीदाराला सोसावे लागते.

उदा. खरेदीदाराने पुट
ऑप्शन करार ८० याला खरेदी केला आहे. बाजारातील किंमत कमी होईल तसतसा खरेदीदाराला फायदा होईल. (हा करार खरेदीदाराच्या दृष्टिकोनातून बघितला जातो.)
Payoff Profile for Writer of Put Option : Short Put
या ऑप्शन विकल्पाबद्दल विक्रेता हा ‘प्रीमियम’ आकारत असतो. ज्या प्रमाणात खरेदीदाराला फायदा होतो त्याप्रमाणात विक्रेत्याला नुकसान होते.
मर्यादित फायदा : जर बाजारातील किंमत करारातील ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त असेल तर खरेदीदार करार पूर्ण करणार नाही. बदल्यात विक्रेत्याला ‘प्रीमियम’ मिळेल. म्हणजेच विक्रेत्याच्या ‘प्रीमियम’ इतकाच मर्यादित नफा होईल.
अमर्यादित तोटा : जर बाजारातील किंमत करारातील ठरलेल्या किंमतीपेक्षा कमी असेल तर खरेदीदार करार पूर्ण करेल. बाजारातील किंमत जसजशी वाढत जाईल तसतसा विक्रेत्याच्या तोटयात भर पडत जाईल.

(येथे १० रुपये प्रीमियम दिल्याचे गृहीत धरूया) उदा. बाजारातील किंमत जसजशी कमी होत जाईल. तसे विक्रेत्याचे नुकसान वाढत जाईल. बाजारात किंमत ७० झाली असताना विक्रेत्याला १० तोटा सहन करावा लागेल. (हा करार विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून बघितला जातो.)
