एप्रिलअखेर ते मे महिन्याच्या पूर्वार्धात भारतावर ‘युद्धाचे काळे ढग’ जमायला सुरुवात झाल्याने, गुंतवणूकदारांच्या आर्थिक, मानसिक तयारीसाठी निफ्टी निर्देशांकावर २४,००० चा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ विकसित केलेला होता. या युद्धकालीन परिस्थितीत निफ्टी निर्देशांकावर २४,००० चा स्तर राखला गेल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,३००, २४,६००, २४,९०० ते २५,५०० असे असेल… अशा तेजीच्या तोफा सुटतील, असे सूतोवाच गेल्या आठवड्यातील लेखात केलेले.
११ मेला भारताच्या अटींवर शस्त्रबंदी झाली, तर आर्थिक आघाडीवर महागाई दरात किरकोळ महागाई दर ३.१६ टक्के जो सहा वर्षांच्या नीचांकी स्तरावर, तर घाऊक महागाई दर हा १३ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर घसरला. त्यात अमेरिकेशी आयात करासंबंधाने बोलणीही अतिशय सकारात्मक पद्धतीने होत असल्याचे वृत्त आले, अशा विविध तेजीरूपी बातम्यांच्या दारूगोळ्यांनी भरलेल्या तोफांनी, मिसाइल्सनी २५,०००च्या तेजीचे वरचे लक्ष्य अचूकपणे टिपले गेले. चिंतायुक्त, मरगळलेल्या, उकाड्याने त्रस्त झालेल्या वातावरणात प्रसन्न, आलेल्या या आल्हादायक तेजीच्या झुळुकीने बाजारातील वातावरण प्रसन्न करून टाकले.
बाजारावरील मंदीचे मळभ दूर झाल्याने, आता निफ्टी निर्देशांकाची दीर्घकालीन वाटचाल कशी असू शकेल याचा आढावा घेऊ या.
हा आढावा घेताना निफ्टी निर्देशांकावर तेजीचे उत्तुंग शिखर सर केले जात असताना, मध्येच १,००० ते १,५०० अंशांची घसरण गृहीत धरूनच आपली भविष्यकालीन वाटचाल रेखाटली पाहिजे.
पावसाचे आगमन झाल्यावर साधारणतः पीकपाणी उत्तम झाल्यावर ऑक्टोबरला दिवाळीच्या सुमारास निफ्टी निर्देशांक २६,२७७ चा अगोदरचा उच्चांक पार करत, २७,००० चा नवीन उच्चांक गाठेल. २०२६ मधील ‘लाखाची गोष्ट’ही सेन्सेक्सवर घडेल. सेन्सेक्स १,००,००० तर, निफ्टी निर्देशांक प्रथम २८,००० आणि नंतर ३०,००० ते ३२,००० वर झेपावेल.
निकालपूर्व विश्लेषण
१) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)
१६ मेचा बंद भाव: ३६३.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, १९ मे
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३५५ रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ३५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ३५५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३३० रुपयांपर्यंत घसरण
२) डीएलएफ लिमिटेड
१६ मेचा बंद भाव: ७१५.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, १९ मे
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७१० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ७१० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७५०रुपये, द्वितीय लक्ष्य ७७०रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ७१० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६७० रुपयांपर्यंत घसरण
३) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
१६ मेचा बंद भाव: ६५७.५५ रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २० मे
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ६५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: समभागाकडून ६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ७०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६२५ रुपयांपर्यंत घसरण
४) कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड
१६ मेचा बंद भाव: २,६८९.७० रु.
तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, २१ मे
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,६०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: समभागाकडून २,६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,२५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,३५० रुपयांपर्यंत घसरण
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.