मी वर्ष २०२२ पासून म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे. लार्ज कॅप आणि इक्विटी हायब्रिड फंडांमध्ये माझी ‘एसआयपी’ सुरू आहे. मात्र म्हणावा इतका घसघशीत परतावा मला मिळालेला दिसत नाही. माझ्या गुंतवणुकीचे धोरण चुकले आहे काय? – शुभम शेलार
उत्तर – तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमची गुंतवणूक दोन प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आहे. दोन्ही प्रकारच्या फंड योजना इक्विटी आणि हायब्रिड इक्विटी या स्वरूपाच्या आहेत. तुम्ही कोणत्या फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे हे महत्त्वाचे! शिवाय तुम्ही ‘एसआयपी’ या माध्यमाचा उपयोग नेमका कसा करता हे महत्त्वाचे का? हे आपण आज समजून घेऊ.
शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था या दोघांमध्ये एक साम्य म्हणजे दोघांनाही चक्राकार गती असते. तेजी आणि मंदी या घटकांनी बाजार चालत असतात. अर्थव्यवस्थेला मरगळ येणे, महागाई वाढणे, कंपन्यांचा नफा असमाधानकारक असणे, सरकारी पातळीवर एखादा अप्रिय निर्णय घेतला जाणे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे, आंतरराष्ट्रीय बाजारात नकारात्मक घडामोड वगैरेंमुळे शेअर बाजाराला धक्का बसतो आणि तो गडगडू लागतो. याउलट वर उल्लेख केलेल्या कारणांपैकी कोणतेही कारण नसेल, म्हणजेच बाजाराला अनुकूल परिस्थिती असेल तर शेअर बाजार तेजीच्या दिशेने मार्गक्रमण करतो.
परदेशी गुंतवणूकदार आणि शेअर बाजार
शेअर बाजार वरच्या दिशेने जाण्यामध्ये आणखी एक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे परदेशी गुंतवणूकदार. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारामध्ये जोरदार खरेदी केली तर बाजार आपोआपच वरच्या दिशेला घोडदौड करू लागतात. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर २०२४ या निवडणूक वर्षाच्या अनुषंगाने बाजाराला परदेशी गुंतवणूकदारांची साथ पुरेशी लाभली नाही. वर्ष २०१४ ते २०२४ या दहा वर्षांचा विचार केल्यास शेअर बाजार कायमच वरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. असे असले तरीही नियमित अंतराने होणारी नफावसुली (प्रॉफिट बुकिंग) आणि आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारातील चढ-उतारामुळे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना घसघशीत परतावा मिळाला आहे.
‘एसआयपी’च्या माध्यमातून पैसे गुंतवणे कायमच श्रेयस्कर म्हटले जात असले तरीही त्यातून मोठा परतावा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. शेअर बाजारात घसरण झाली आणि फंड योजनेची एनएव्ही खाली आली की आपल्याला जास्त युनिट मिळतात म्हणजेच व्यापार चक्रातील घसरणीचा काळ असेल तो ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बेगमीचा काळ असतो. या वेळेला अधिक पैसे गुंतवून जास्तीत जास्त युनिट जमा करायचे असतात. कमी किमतीत युनिट घेऊन ठेवले की त्याचा फायदा बाजार वर गेल्यावर होतो. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, २०२२ या वर्षानंतर आजच्या तारखेपर्यंत अशी स्थिती आलेली जाणवत नाही. किंबहुना बाजार पडतील, झडतील असे वाटत असतानाच अचानकपणे ते सावरतात आणि वरच्या दिशेला जातात. त्यामुळे तुम्हाला समाधानकारक परतावे मिळाले नसावेत.
तुमची गुंतवणूक संपूर्ण इक्विटी फंडात नसून काही अग्रेसिव्ह हायब्रिड फंडामध्ये सुद्धा आहे. ज्यामध्ये मुळातच शुद्ध इक्विटी फंडांपेक्षा परतावा कमी मिळतो. तुमचा पोर्टफोलिओ मध्यम ते दीर्घकाळपर्यंत पैसे गुंतवत राहून त्यानंतर मिळणारे परतावे अनुभवण्याचा अशा पद्धतीचा आखलेला असेल तर अवघ्या तीन वर्षांत परतावा मिळत नाही अशी तक्रार करणे हेच मुळी योग्य आहे असे मला वाटत नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणुका संपत्ती निर्मितीसाठी करायच्या असतील तर त्यासाठी संपत्ती संचय होईल एवढा कालावधीसुद्धा मिळायला हवा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एकही मिडकॅप फंड नसल्याने मागच्या तीन वर्षांत मिडकॅपमध्ये आलेल्या तेजीमध्ये तुमची गुंतवणूकच नव्हती. याचाही तुमच्या पोर्टफोलिओवर थोडासा परिणाम नक्कीच झालेला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात जी अभूतपूर्व अस्थिरता सुरू आहे आणि अशाश्वत वातावरण आहे त्याचा विचार करता बाजारांनी दिलेले परतावे हे समाधानकारक आहेत, असे म्हणावे लागेल. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध, रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष, भारत- पाकिस्तान यांच्यातील ताणले गेलेले संबंध एवढे घडूनसुद्धा बाजार ८५,००० च्या दिशेने वाटचाल करत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स वाढत आहेत म्हणजेच सगळा बाजार वाढतो आहे असेही नाही. यामुळे तुम्ही फंडातील गुंतवणूक आहे तशीच ठेवून शक्य झाल्यास ‘फ्लेक्झीकॅप’ प्रकाराच्या फंडात गुंतवणूक सुरू करावी. अर्थातच त्यावेळेला तुमच्या अन्य फंडांना हात न लावता गुंतवणूक सुरू ठेवावी.
आणखी पाच वर्षे थांबल्यास मध्ये एखादी घसरणीची वेळ आली तर तुमच्या ‘एसआयपी’तून मिळणारे परतावे निश्चितच चांगले असतील. मात्र अशी घसरण आली नाही आणि बाजार दर वार्षिक दहा ते बारा टक्के दराने वाढले तरीही तुमच्या ‘एसआयपी’चे परतावे चांगलेच असणार आहेत. तुम्ही विचारलेल्या प्रश्नातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी एक मोलाचा मंत्र मिळालेला आहे तो म्हणजे – दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’चा वापर केल्यास त्याची फळे मिळण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे थांबण्याची तयारी असायला हवी!