ऑप्शन्स मार्केटमध्ये प्रत्येक व्यवहारासाठी दोन बाजू असतात – खरेदीदार (बायर) आणि विक्रेता (सेलर/राइटर) हे यापूर्वी या स्तंभातील लेखांमध्ये आपण पाहिले. शेअर बाजारात जसे, जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतो आणि कंपनी प्रगती करते, तेव्हा कंपनीचे मूल्य वाढते. अशा वेळी आपण आणि इतर सर्व शेअरधारक हे एकाच वेळी फायद्यात असू शकतात. याला ‘पॉझिटिव्ह-सम गेम’ म्हणतात. ऑप्शन मार्केटमध्ये म्हणजेच वैकल्पिक बाजारात असे होत नसते. ऑप्शन खरेदीदाराला (बायर) जर १०,००० रुपयांचा नफा झाला, तर त्याचा अर्थ असा की त्या व्यवहारातील विक्रेत्याला (सेलर) नेमका १०,००० रुपयांचाच तोटा झाला आहे. दोन्ही बाजूंच्या नफा-तोट्याची बेरीज केली तर ती शून्य येते. म्हणूनच याला ‘झिरो-सम गेम’ (Zero-sum Game) म्हणतात. म्हणजेच त्यात एकाला फायदा तर दुसर्‍याला तोटा होतो. हा गेम कसा, ते आता समजून घेऊ.

विविध विकल्प लाभ : (Option Payoffs)

विकल्प (ऑप्शन) खरेदी करणारा म्हणजेच बायर हा अधिमूल्य देऊन करार करत असतो. त्यामुळे खरेदीदाराचा तोटा झाल्यास तो फक्त अधिमूल्य म्हणजेच प्रीमियम इतका असतो. परंतु, ऑप्शन करार अनुकूल झाल्यास नफा होण्याची शक्यता अमर्यादित असते. तर उलट परिस्थिती ही ऑप्शन विकणार्‍याची असते. तो खरेदीदाराकडून अधिमूल्य घेऊन करार करतो. अशा परिस्थितीत विकल्प विकणार्‍याला म्हणजेच ज्याला राइटर असे म्हणतात. त्याचा फायदा हा मर्यादित असतो. जेवढे अधिमूल्य तो घेतो तेवढाच त्याला महत्तम लाभ होण्याची शक्यता असते. परंतु नुकसान म्हणजेच तोटा किती होईल हे सांगता येत नाही. तो अमर्यादितदेखील असू शकतो. सोबतच्या आलेखांद्वारे हे  स्पष्ट होईल.

बायर आणि राइटरसाठींच्या विकल्पाचा आपण विचार करू या.

१) खरेदीदारासाठी विकल्प लाभ :  Payoff Profile of Buyer of Asset :  Long Asset

‘अ’ या व्यक्तीने इन्फोसिस कंपनीचा एक लॉट ऑप्शन कराराअंतर्गत खरेदी केला. इन्फोसिसच्या शेअरची किंमत भविष्यात वाढेल या आशेने ‘अ’ या व्यक्तीने लॉट रु.१२०० या स्ट्राइक प्राइसला (भविष्यातील किमतीला) खरेदी केला आहे.

वरील आकृतीवरून स्पष्ट होते की, जर शेअरची किंमत रु.१२२० च्या वर गेल्यास ‘अ’ याला नफा होईल किंवा किंमत ११८० झाल्यास २० रुपये नुकसान होईल. यात प्रीमियम आणि एसटीटीची गणलेले नाहीत.

२) विकणार्‍याचे विकल्प लाभ :  Payoff Profile for seller of Asset :  Short Asset

व्यक्तीने इन्फोसिस कंपनीचा एक लॉट ऑप्शन विक्री केला. इन्फोसिस कंपनीच्या शेअरची किंमत भविष्यात कमी होईल या आशेने ‘अ’ या व्यक्तीने लॉट १२८० या स्ट्राइक प्राइस किंवा करारातील किमतीला विक्री केला आहे.

आकृतीत ‘x’ अक्षावर इन्फोसिसच्या शेअरची किंमत दर्शवली आहे. तर उभ्या ‘y’ अक्षावर नफा-तोटा दाखविले आहे.

वरील आकृतीवरून स्पष्ट होते की, शेअरची किंमत रु. ११८० झाल्यास ‘अ’ या व्यक्तीस फायदा होईल आणि किंमत जर रु. १२२० झाल्यास प्रतिशेअर रु.२० इतके नुकसान होईल.

(वरील दोन्ही उदाहरणांत प्रीमियम आणि लागू कर विचारात घेतलेला नाही.)

अलीकडेच ‘सेबी’ने अभ्यासाअंती तयार केलेल्या अहवालात म्हटले होते की, १० पैकी नऊ वैयक्तिक ट्रेडर्सना ऑप्शन्समध्ये तोटा होतो. याचे मुख्य कारण हाच ‘झिरो-सम गेम’ आहे आणि या खेळात मोठे ‘अल्गोरिदम’ आणि मोठी संसाधने असणारे संस्थात्मक गुंतवणूकदार सामान्य ट्रेडर्सचा पैसा जिंकून नेतात.

ऑप्शन मार्केटमधील काही स्ट्रॅटेजी शिकण्यापूर्वी काही संकल्पनांचा ढोबळमानाने अभ्यास करू या.

लाँग (Long) आणि शॉर्ट (Short) या दोन संकल्पना अभ्यासू. ऑप्शन मार्केटमध्ये फ्यूचर मार्केटप्रमाणेच शेअर्स खरेदी-विक्रीचे करार केले जातात.

 आपण पुढील भागात विविध विकल्प लाभ बघू या.  (क्रमश:) 

* लाँग : ऑप्शन मार्केटमध्ये म्हणजेच वैकल्पिक बाजारात, शेअर्स खरेदीचा करार केला जातो. तर खरेदी करणे यालाच ‘लाँग’ असे म्हटले जाते.

* शॉर्ट : वैकल्पिक बाजारात शेअर्स विक्रीचा करार केला जातो. शेअर्स विक्री करणे याला ‘शॉर्ट’ असे म्हटले जाते.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, लॉंग म्हणजे कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी करणे (होल्ड करणे), तर शॉर्ट म्हणजे ऑप्शन विकणे. लॉन्ग ऑप्शनअंतर्गत मर्यादित जोखीमसह प्रीमियम द्यावा लागतो, तर शॉर्ट ऑप्शनअंतर्गत

प्रीमियम मिळतो, मात्र यात जोखीम जास्त असते.

gaurav.muthe@expressindia.com