-संदीप वाळुंज
शीर्षकासाठी घेतलेल्या उक्तीचे प्रथम स्पष्टीकरण देतो. तुकोबा म्हणतात, (शेतीची मशागत करून) योग्य प्रकारे आळे करून पाणी दिल्यावर मगच फळ ‘लाभते’.
मुळातून वाचण्यासारखा हा अभंग आठवायचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांची परताव्यापाठी चाललेली अविरत धडपड. कुठल्याही गुंतवणूकसंबंधी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये डोकावून पहा, लोकांची गुंतवणुकीची व्याख्या तुम्हाला अगदी पटकन समजेल. कोणत्या स्मॉल-कॅप पीएमएसने तीस टक्के परतावा दिला, कोणी एखादा समभाग तो दुप्पट होण्यापूर्वी खरेदी केला होता, कुठल्या बाँडवर १२.५ टक्के मिळतात. चर्चा केवळ परताव्यांचीच असते. जणू गुंतवणूकदाराचे काम विजेत्यांना शोधणे आणि जास्तीत जास्त फायदा मिळवणे हे आहे. ज्याचा परतावा सर्वाधिक, तो गुंतवणूकदार सर्वांत हुशार.
बेंजामिन ग्रॅहम यांच्या विचारांवर आधारित आजची उक्ती या गृहीतकाचे पारडे पार उलटे करून टाकते. गुंतवणूकदाराचे काम परताव्याची तजवीज करणे नसून जोखमींचे व्यवस्थापन करणे हे आहे, असे ते म्हणतात. हे वाचायला थोडे विरोधाभासी वाटते. पण प्रथमदर्शनी काहीसा अवाजवी वाटणारा हा विचार असे ठामपणे सुचवतो की, गुंतवणूकदाराच्या कामाची प्रचलित व्याख्याच चुकीची आहे.
ज्यावर तुमचे नियंत्रण नाही, त्याचे तुम्ही व्यवस्थापन करू शकत नाही
एक अगदी साधी गोष्ट आपण सहज विसरतो. आपल्याला किती परतावा मिळेल, हे आपण ठरवू शकत नाही. वर्षाला पंधरा टक्के मिळावेत अशी अपेक्षा ठेवता येते, ते ध्येय धरून आर्थिक नियोजन करता येते, स्प्रेडशीटमध्ये तसा आकडाही टाकता येतो; पण तो परतावा मिळेलच, याची तजवीज तुम्ही करू शकत नाही. तो तुमच्या नियंत्रणाबाहेरील अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की, व्याजदर, भू-राजकारण, भांडवलाचा ओघ, बाजाराचा मूड, तरलता आणि नशीब.
परताव्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हवामानाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. हवामानाचा अंदाज पाहून छत्री घेऊन बाहेर पडता येते; पाऊस पाडता किंवा थांबवता येत नाही.
तुम्ही ज्याचे व्यवस्थापन करू शकता, जे अगदी तुमच्या स्वतःच्या हातात असते. ते म्हणजे जोखीम (रिस्क). एका शेअरमध्ये किती पैसे गुंतवायचे, संपूर्ण संपत्ती एकाच प्रकारच्या मालमत्तेत गुंतवायची की विविधीकरण करायचे, कर्ज घेऊन गुंतवणूक करायची की नाही, एखादा अंदाज चुकल्यास किती नुकसान सहन करण्याची आपली क्षमता आहे. हे आपण नक्कीच ठरवू शकतो. एखादे वाईट वर्ष आपल्या प्रवासातील अडथळा ठरेल की, संपूर्ण आर्थिक नियोजन उद्ध्वस्त करणारा धक्का, हेही आपल्या आधीच्या निर्णयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. परतावा हा बाजाराने दिलेला परिणाम आहे; जोखीम किती घ्यायची हा आपला निर्णय आहे. गंमत अशी की, गुंतवणुकीच्या चर्चेत आपण पहिल्या गोष्टीवर प्रचंड वेळ खर्च करतो आणि दुसरीकडे तुलनेने कमी लक्ष देतो.
गुंतवणूकदाराचे मुख्य काम
जोखीम सांभाळणे हेच गुंतवणूकदाराचे मुख्य काम मानले, तर विचारण्याचे प्रश्नच बदलतात. परताव्याच्या मागे धावणारा गुंतवणूकदार विचारतो की, काय वाढेल? जोखीम सांभाळणारा विचारतो,माझा अंदाज चुकला तर काय होईल? पहिल्या प्रश्नाचे खात्रीशीर उत्तर कोणाकडेच नसते. दुसऱ्या प्रश्नाचा मात्र विचार करता येतो. पहिला विचारतो, यातून जास्तीत जास्त किती कमावता येईल? दुसरा विचारतो. माझी एक चूक माझे मोठे नुकसान करणार नाही, याची व्यवस्था कशी करता येईल?
मग एखाद्या शेअरमध्ये किती गुंतवायचे, विविधीकरण किती ठेवायचे, कर्जाचा वापर किती करायचा, खरेदी करताना सुरक्षिततेची पुरेशी जागा ठेवली आहे का आणि कायमस्वरूपी भांडवल गमावण्याची शक्यता किती आहे. हे दुय्यम प्रश्न राहत नाहीत. ‘चांगले शेअर्स शोधणे’ हे मुख्य काम आणि बाकी सगळे बिनमहत्त्वाचे बचावात्मक उपाय; हा दृष्टिकोनच बदलतो.
यावरून हे देखील स्पष्ट होते की जोखीम (रिस्क) आणि किमतीतला चढ-उतार (व्होलाटिलिटी) ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एक नाहीत. किंमतीत चढ-उतार होतात म्हणजे गुंतवणूक धोकादायक आणि किंमत स्थिर राहते म्हणजे सुरक्षित, असे सरळ समीकरण नाही. एका चांगल्या वैविध्यपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओचे मूल्य वाईट वर्षात वेगाने घसरू शकते, तरीही ज्या गुंतवणूकदाराला पुढील पंधरा वर्षे पैशांची गरज नाही त्याच्यासाठी तो फारसा धोका निर्माण करत नाही.
याउलट, वरवर स्थिर वाटणाऱ्या एखाद्या गुंतवणुकीमागे निकृष्ट पतगुणवत्ता (क्रेडिट क्वालिटी), मोठे कर्ज, पैशांची अपुरी तरलता (लिक्विडिटी) किंवा भांडवल कायमचे बुडण्याचा धोका असेल, तर तिची किंमत रोज हलत नसली तरी खरी जोखीम कितीतरी मोठी असू शकते. म्हणूनच प्रश्न फक्त किंमत किती खाली जाऊ शकते हा नसतो. प्रश्न हा असतो की, प्रतिकूल निकाल आल्यामुळे तुमचे पैसे ज्या उद्देशासाठी गुंतवले होते तो उद्देश गाठण्याची आपकी क्षमता
कायमस्वरूपी धोक्यात येऊ शकते का?
जोखीम सांभाळण्याच्या या कामात एक मोठी अडचण मात्र आहे. यात फुशारक्या मारण्याजोगे काहीही नसते. कोणीही ग्रुप चॅटवर येऊन सांगत नाही की, मी आज माझ्या पोझिशनचा आकार अतिशय समजूतदारपणे कमी केला, किंवा धोक्याची शक्यता खूप जास्त असल्यामुळे मी एका आकर्षक पैजेला नकार दिला, किंवा सद्यस्थितीत काहीही करण्याची गरज नव्हती म्हणून या तिमाहीत मी काहीही केले नाही. जोखीम व्यवस्थापन यशस्वी ठरते तेव्हा अनेकदा त्याचे यश दिसतच नाही. कारण त्याचे फलित म्हणजे न झालेले नुकसान, न ओढवलेले आर्थिक संकट आणि न उडालेली रात्रीची झोप.
जोखीम कमी केली म्हणजे परतावा वाढतो का?
इथे एक गैरसमज होऊ नये. जोखीम चांगली सांभाळली म्हणजे जास्त परतावा मिळेलच असे नाही. उलट तेजीच्या बाजारात बेमुर्वत जोखीम घेणारा गुंतवणूकदार अनेक वर्षे अधिक हुशार वाटू शकतो. त्याचा परतावा कितीतरी जास्त असू शकतो आणि सावध गुंतवणूकदार मागे पडल्यासारखा वाटू शकतो. जोखीम व्यवस्थापनाचा उद्देश प्रत्येक वर्षी सर्वाधिक परतावा मिळवणे हा नाही. त्याचा उद्देश अधिक मूलभूत आहे, खेळात टिकून राहणे.
चक्रवाढीला वेळ लागतो आणि वेळेचा फायदा घ्यायचा असेल, तर आधी भांडवल टिकले पाहिजे. पन्नास टक्के नुकसान झाले, तर केवळ पूर्वीच्या पातळीवर परतण्यासाठी शंभर टक्के परतावा कमवावा लागतो. काही नुकसान तर त्याहून गंभीर असते. कर्ज घेऊन गुंतवणूक केली असेल, तर बाजारातील घसरण तुम्हाला नेमक्या चुकीच्या वेळी विकायला भाग पाडू शकते. एखाद्या एकाच कंपनीत फार मोठी रक्कम गुंतवली असेल आणि त्या व्यवसायाचे कायमस्वरूपी नुकसान झाले, तर बाजार पुन्हा वर आला तरी तुमचे भांडवल परत येईलच असे नाही. आणि दोन वर्षांनी लागणारे पैसे शेअर बाजारात गुंतवले असतील, तर बाजारातील तात्पुरती घसरण तुमच्यासाठी कायमस्वरूपी नुकसान ठरू शकते. म्हणून नेत्रदीपक पोर्टफोलिओ आणि यशस्वी पोर्टफोलिओ यांत फरक असतो. पहिला एखाद्या वर्षी सर्वांच्या डोळ्यात भरेल असा परतावा देऊ शकतो. दुसऱ्याची रचना अनेक वर्षे टिकून राहण्यासाठी केलेली असते. चक्रवाढ केवळ शिल्लक राहिलेल्या भांडवलावरच काम करते. त्यामुळे मोठे नुकसान टाळणे म्हणजे केवळ बचावात्मक खेळ नव्हे; दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्यासाठी ती आवश्यक अट आहे.
जोखीम व्यक्तीनुरूप बदलते
एकाच गुंतवणुकीची जोखीम प्रत्येकासाठी सारखी नसते. निवृत्तीला अजून तीस वर्षे असलेल्या तरुण गुंतवणूकदारासाठी बाजारातील मोठी घसरण अस्वस्थ करणारी असली, तरी त्याच्याकडे ती भरून निघण्यासाठी भरपूर वेळ असतो. पण निवृत्तीनंतरच्या संचितातून दर महिन्याचा खर्च भागवणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच घसरणीचा परिणाम असहनीय असू शकतो. दोन वर्षांनी मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे आणि वीस वर्षे ज्यांना हात लावायचा नाही असे पैसे एकाच पद्धतीने गुंतवता येत नाहीत.
म्हणून जोखीम ही केवळ गुंतवणुकीमध्ये नसते; ती गुंतवणूक आणि गुंतवणूकदार यांच्या नात्यात असते. पैसे कशासाठी आहेत, ते कधी लागणार आहेत, मध्येच त्यांची गरज पडण्याची शक्यता किती आहे आणि आपला अंदाज चुकला तर त्याचे परिणाम किती गंभीर असतील. या सगळ्यांवर खरी जोखीम ठरते. त्यामुळे ‘ही गुंतवणूक किती जोखमीची आहे?’ या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा दुसरा प्रश्न आहे. ‘माझ्यासाठी, या पैशांसाठी आणि आयुष्याच्या या टप्प्यावर ही जोखीम योग्य आहे का?’
कर्म आपल्या हाती; फळ नाही
आधुनिक गुंतवणूकशास्त्रातील हा विचार आपल्याला चांगल्याच परिचित असलेल्या अध्यात्मिक तत्त्वाजवळ घेऊन जातो, कर्म आणि फळ. आपल्या हातात कर्म आहे; फळावर आपली सत्ता नाही. याचा अर्थ फळाची अपेक्षाच ठेवू नये असा नाही. शेतकरी भरघोस पीक यावे यासाठीच शेत कसतो. पण किती पीक येणार यावर त्याचे नियंत्रण नसते. त्याच्या हातात असते ते म्हणजे जमीन नीट तयार करणे, योग्य वेळी पेरणी करणे, वेळेवर पाणी देणे, पिकाची निगा राखणे आणि शक्य तितक्या संकटांपासून त्याचे रक्षण करणे.
गुंतवणूकदाराची परिस्थिती फार वेगळी नाही. परतावा मिळावा म्हणूनच तो गुंतवणूक करतो; पण किती परतावा मिळणार हे त्याच्या हातात नाही. त्याच्या हातात आहे योग्य गुंतवणूक निवडणे, अनावश्यक जोखीम टाळणे, एखादी चूक संपूर्ण आर्थिक प्रवास उद्ध्वस्त करणार नाही याची काळजी घेणे आणि मग पुरेसा वेळ देणे.
बाजार तुम्हाला नेहमीच या भ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करेल की, तुमचे काम फळाचा पाठलाग करणे हे आहे. परंतु, कठोर, अस्वस्थ करणारे पण तरीही शेवटी सर्वात जास्त समाधान देणारे सत्य हे आहे की, तुमचे काम शेताची नीट मशागत करणे एवढेच आहे.
गुंतवणूक व्यवस्थापनाचे मर्म जोखीम व्यवस्थापनात आहे, परताव्याच्या पाठी धावण्यात नाही. बेंजामिन ग्रॅहम (वॅारेन बफे यांचे गुरू) यांच्या विचारांवर आधारित.
(लेखक ‘इक्विरस’ समूहाचे मुख्य व्यवसायवृद्धी अधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत. sandeep.walunj@zohomail.in)
