आखाती युद्धाचे पडघम वाजू लागल्यापासून मला येणाऱ्या ‘ईमेल्स’मध्ये एक समान धागा दिसतो आहे. तो आहे घबराटीचा. प्रत्येकाची कहाणी वेगळी असली तरी प्रतिक्रिया एकसारख्याच आहेत.

  • “सर, आता प्रत्यक्ष रणांगणावरील हालचाली सुरू होणार आहेत! मी आजच माझा संपूर्ण पोर्टफोलिओ विकून टाकू का?”
  • “युद्ध संपेपर्यंत सगळा पैसा काढून सोनं किंवा बिटकॉईनमध्ये लावणं शहाणपणाचं ठरेल का?”
  • “मी माझे मिडकॅप फंड विकले आहेत. नुकसान सोसण्यापेक्षा वेळीच बाहेर पडलेलं बरं, नाही का?”

ही भीतीच्या बागुलबुवाची करामत आहे. केवळ काही दिवसांत दीर्घकालीन नियोजनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. जे गुंतवणूकदार अवघ्या एका महिन्यापूर्वी १० वर्षांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाबद्दल सुज्ञ प्रश्न विचारत होते, तेच आता अचानक एखाद्या वादळात सापडलेल्या ‘डे-ट्रेडर्स’प्रमाणे वागू लागले आहेत आणि आपल्या गुंतवणुकीच्या मूळ ‘स्वभावधर्माला’च तिलांजली देत आहेत आणि ज्या मालमत्ता त्यांना नीट समजतही नाहीत, अशा मालमत्तांच्या मागे धावत सुटले आहेत.

अशा भरकटलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या ‘स्वधर्मा’ची आठवण कशी करून द्यावी, याचा विचार करत असताना मला पीटर लिंच यांनी १९९५ मध्ये ‘वर्थ’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीतील शब्द मनात उमटले. असे शब्द, जे अगदी याच क्षणासाठी लिहिले असावेत असे वाटते:

‘बाजारातील घसरणींमुळे गुंतवणूकदारांचे जितके नुकसान झाले नाही, त्यापेक्षा बरेच जास्त नुकसान त्या घसरणींची भीती बाळगून केलेल्या (चुकीच्या) उपाययोजनांमुळे झाले आहे.’ आणि एवढे कळकळीने वारंवार सांगूनही गुंतवणूकदार सहनशीलता का दाखवत नाहीत याचा विचार करताना ग. दि. माडगूळकर यांच्या ‘हाती नाही बळ’ या गाण्यातील रोखठोक इशारा आठवला, ज्याचा वापर या लेखाचे शीर्षक म्हणून करण्यात आला आहे.

प्रतिक्रियांचा सापळा

लिंच यांचे निरीक्षण खूप मार्मिक आहे, बाजारातील घसरणीच्या भीतीने गुंतवणूकदार चुकीची पावले उचलतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात, यावर ते प्रखर प्रकाशझोत टाकतात. जेव्हा गुंतवणूकदार दीर्घकाळासाठीच्या इक्विटी गुंतवणुकीतून तडकाफडकी बाहेर पडतात, तेव्हा ते केवळ आभासी तोटा पक्का करून घेतात आणि आपल्या पैशासाठी शांतपणे अविरत काम करणारी चक्रवाढही खंडित करतात.

येथे आणखी मोठा धोका आहे, तो म्हणजे ‘पुनरागमन वेळेची अनिश्चितता’. बाजार कधीही आपल्याला निमंत्रण देऊन वर जात नाही. परिस्थिती पूर्णपणे निवळल्याची घोषणा होण्यापूर्वीच बाजाराची सावरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. जे गुंतवणूकदार पूर्ण खात्री होईपर्यंत सुरक्षित पर्यायांत (उदाहरणार्थ कर्जरोखे/ सोने) बसून राहतात, ते सहसा बाजारात मोठी तेजी येऊन गेल्यावर पुन्हा प्रवेश करतात. पीटर लिंचनी सांगितल्याप्रमाणे, घसरणीत होणाऱ्या तात्पुरत्या तोट्यापेक्षा घसरणीच्या भीतीने बाहेर पडल्यामुळे होणारे कायमस्वरूपी नुकसान नेहमीच जास्त असल्याचे आढळते.

सद्य:स्थिती: ‘पॅनिक टॅक्स’ (घाबरल्यामुळे द्यावा लागणारा भुर्दंड)

गुंतवणूकदार आपले ‘स्वत्व’ इतक्या सहजासहजी का विसरतात? कारण ते दोन बाळबोध मानसिक पूर्वग्रहांचा प्रभाव टाळू शकत नाहीत. अलीकडच्या घटनांचा अति प्रभाव (रिसेन्सी बायस) आणि तोटा टाळण्याची तीव्र प्रवृत्ती (लॉस ॲव्हर्जन) ही या पूर्वग्रहांची मानसशास्त्रीय नावे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, आज बातम्या नकारात्मक आहेत, म्हणून भविष्यही तसेच असेल असे गृहीत धरणे आणि त्यातून होणारे (काल्पनिक) नुकसान कमी करण्याचा अटीतटीने प्रयत्न करणे.

पण वस्तुस्थिती पाहा:

१. मूलभूत सामर्थ्य: भारताची संरचनात्मक घडण अबाधित आहे. ‘जीसीसी’चा विस्तार, ‘चायना प्लस वन’ पुरवठा साखळीतील बदल, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, देशांतर्गत उपभोग आणि मागणी यापैकी काहीही होर्मुझ सामुद्रधुनीजवळील तणावामुळे बदललेले नाही. कंपन्यांची ताळेबंद पत्रके सक्षम आहेत. रिझर्व्ह बँकेकडे धोरणात्मक हस्तक्षेपाची क्षमता आहे. रुपयातील चढ-उतार अस्वस्थ करणारे असले तरी नियंत्रणाबाहेर नाहीत.
२. गुंतवणुकीच्या गमावलेल्या संधी: गुंतवणूकदार वाट पाहात बाजूला बसले असताना, दर्जेदार लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांचे शेअर सवलतीत उपलब्ध आहेत. आज जे भीतीपोटी विक्री करत आहेत, त्यांना सहा महिन्यांनंतरच त्याचा पश्चात्ताप होण्याची शक्यता जास्त आहे.

तर मग गुंतवणूकदारांनी काय करावे?

  • तुमच्या नैसर्गिक उर्मीवर नियंत्रण ठेवा: जर तुम्ही दीर्घकालीन इक्विटी गुंतवणूकदार असाल, तर युद्धाच्या बातमीमुळे कर्ज किंवा ‘क्रिप्टो’मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे मॅरेथॉन शर्यतीत धावताना मध्यात ढग दिसल्यामुळे कपडे बदलण्यासाठी थांबण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्हाला शर्यत जिंकणे कठीण होऊन बसते.
  • बाजारातील चढ-उतार हे ‘टोल’ शुल्क आहे, दंड नाही: बाजारातील घसरणींकडे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी द्यावे लागणारे ‘प्रवेश शुल्क’ म्हणून पाहा, तुमच्या चुकीची शिक्षा म्हणून नाही.
  • संपत्ती हस्तांतरणाची वाट पाहा: वॉरन बफे यांनी सांगितल्याप्रमाणे, शेअर बाजार हे ‘अधिर’ लोकांकडून ‘धिरोदात्त’ लोकांकडे संपत्ती हस्तांतरित करण्याचे साधन आहे. याचा कधीही विसर पडू देऊ नका.

निष्कर्ष

वरीलपैकी कशाचाही अर्थ असा नाही की, गुंतवणूकदारांनी जोखीमकडे दुर्लक्ष करावे किंवा सर्व परिस्थितीत निष्क्रिय राहावे. मला एवढेच म्हणायचे आहे की, अनिश्चिततेमुळे निर्माण झालेली भीती आपल्या दीर्घकालीन नियोजनाशी सुसंगत असली पाहिजे.

मालमत्ता वाटप, गुंतवणुकीतील वैविध्य आणि नियतकालिक पुनर्संतुलन या प्रक्रिया नेमके असेच टप्पे हाताळण्यासाठी तयार केलेल्या आहेत. संकटाच्या वेळी त्यांनाच सोडून देणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे.

या कठीण काळातून जे गुंतवणूकदार तावून सुलाखून बाहेर पडतील, तेच त्यानंतर येणाऱ्या तेजीचा पूर्ण फायदा घेतील. त्यासाठी आपला संयम राखणे, शांतपणे आपल्या मालमत्ता वाटपाचा आढावा घेणे, आपल्या एसआयपी सुरू ठेवणे आणि जर आपल्याकडे अतिरिक्त निधी असेल तर या घसरणीचा उपयोग योग्य दरात दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करणे हे व्रत घ्यावे लागेल.

भीती ही एक भावना आहे.
शिस्त हा एक निर्णय आहे.
निर्णयाची निवड करा.