Sundar Pichai Education Advice Marathi : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या टॅलेंट आणि पगाराची नेहमीच चर्चा होत असते. त्यांना पाहून अनेक भारतीय पालक आपल्या मुलांनीही परदेशातील नामांकीत शैक्षणिक संस्थांमध्ये शिकावं यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा लोकांना परदेशातील ग्लॅमरस शिक्षण दिसतं, त्यामागे मोजलेली प्रचंड मोठी ‘किंमत’ दिसत नाही. विशेष करुन मध्यमवर्गीय पालकांसाठी आपल्या मुलाला परदेशात शिकायला पाठवणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘आर्थिक’ निर्णय असतो. कित्येक लोक यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई, घरदार गहाण ठेवतात, मोठी शैक्षणिक कर्ज काढतात. याच पार्श्वभूमीवर, ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वतःच्या प्रवासातील एक भावनिक आठवण सांगत पालकांना एक अतिशय व्यावहारिक सल्ला दिला आहे.

एका विमान तिकिटासाठी वडिलांनी वर्षाचा पगार खर्च केला

सुंदर पिचाई यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला, तेव्हाची आठवण सांगताने पिचाई म्हणाले, “माझ्या वडिलांनी त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या पगाराएवढी रक्कम फक्त माझ्या अमेरिकेच्या विमानाच्या तिकिटावर खर्च केली होती. तो माझ्या आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास होता. पण जेव्हा मी कॅलिफोर्नियात उतरलो, मला वाटलं आता सगळं सुरळीत होईळ, पण, मी विचार केला त्याच्या अगदी उलट परिस्थिती होती, कारण, तिथून माझा नवीन संघर्ष सुरू झाला.”

पिचाई यांनी पुढे सांगितले की, अमेरिका अत्यंत महागडी होती. भारतात असणाऱ्या कुटुंबाला फोन करायचा झाल्यास त्या काळी प्रति मिनिट २ डॉलर्सपेक्षा जास्त खर्च यायचा, तर तिथल्या एका साध्या कॉलेज बॅकपॅकची किंमत त्यांच्या वडिलांच्या भारतातील एका महिन्याच्या पगाराएवढी होती. केवळ तंत्रज्ञानावरील अफाट प्रेम, मेहनत आणि नशिबाची साथ यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, असे पिचाई अभिमानाने सांगतात.

मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांना मोलाचा सल्ला

दरवर्षी भारतातून हजारो विद्यार्थी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि सिंगापूर येथे शिक्षणासाठी जातात. यात अनेकजण ऐनवेळी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षी परदेशात जाण्याचा निर्णय घेतात. अशावेळी पालकांवर खूप मोठा आर्थिक भार येऊ शकतो. हे टाळण्यासाठी पिचाई यांनी पूर्वतयारी करण्याचा सल्ला दिला आहे.

केवळ ‘ट्यूशन फी’ नव्हे, इतर खर्चांचेही बजेट आखा

  • बहुतांश पालक केवळ विद्यापीठाच्या शिक्षण शुल्काचा विचार करून आर्थिक नियोजन करतात, ज्यामुळे नंतरच्या काळात मोठी अडचण होऊ शकते.
  • नियमित खर्च : राहण्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, स्थानिक वाहतूक, वैद्यकीय विमा आणि शैक्षणिक साहित्य.
  • सुरुवातीचा खर्च : व्हिसा फी, विमानाचे तिकीट, घरासाठी द्यावी लागणारी अनामत रक्कम आणि प्राथमिक घरगुती वस्तू.
  • पहिल्याच वर्षी किती एकूण खर्च येऊ शकतो, याचे स्पष्ट चित्र पालकांसमोर असायला हवे.

मुलांवर स्वतःची इच्छा लादू नका; त्यांच्या आवडीला प्राधान्य द्या

दीर्घकालीन यश हे नेहमी स्वतःला आवडणाऱ्या क्षेत्रात काम केल्यानेच मिळते, असे पिचाई यांचे ठाम मत आहे. ते म्हणतात, “जगातील अशी गोष्ट शोधा जी तुम्हाला सर्वात जास्त थक्क करते. पालकांना काय वाटते, मित्रांनी काय घेतले किंवा समाजाने काय अपेक्षा ठेवल्या आहेत, यापेक्षा तुमच्या मुलाला कशात रस आहे हे ओळखा.” पालकांनी मार्गदर्शक व्हावे, हुकूमशहा नाही.

विद्यापीठाच्या केवळ ‘रँकिंग’वर जाऊ नका

  • परदेशात प्रवेश घ्यायचं म्हटलं की आपण लगेच गुगल सर्च करुन रँकिंग पाहतो. पिचाई म्हणतात, जागतिक रँकिंग पाहणे नक्कीच गरजेचे आहे, पण त्यापलीकडे जाऊन पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काही प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.
  • तिथले प्राध्यापक आणि त्यांचे संशोधन क्षेत्र काय आहे?
  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळण्याचा दर काय आहे?
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात कोणत्या प्रकारची मदत यंत्रणा उपलब्ध आहे?
  • ते विद्यापीठ ज्या शहरात आहे, तिथला राहण्याचा खर्च आणि वातावरण कसे आहे?

मुलांशी भावनिक संवाद साधा

परदेशात जाणे हा मुलांसाठी मोठा मानसिक बदल असतो. अनेकदा मुले पालकांनी केलेल्या आर्थिक त्यागामुळे आणि कर्जामुळे प्रचंड मानसिक दडपणाखाली असतात. अशा वेळी पालकांनी मुलांशी उघडपणे संवाद साधला पाहिजे. त्यांना हे पटवून देणे गरजेचे आहे की, “आमच्यासाठी कोणत्याही पैशांच्या गुंतवणुकीपेक्षा तुमचे आयुष्य आणि मानसिक आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे.” अपयशाच्या किंवा अडचणीच्या काळात पालकांचा हाच विश्वास मुलांना परक्या देशात आत्मविश्वासाने उभे राहण्यास ताकद देतो.