वर्ष १९६६ मध्ये स्थापन झालेली सुंदरम फास्टनर्स लिमिटेड सुप्रसिद्ध टीव्हीएस समूहाचा एक भाग असून, कंपनी वाहन, पायाभूत सुविधा, पवनचक्की आणि विमानचालन (एव्हिएशन) यांसारख्या क्षेत्रांसाठी फास्टनर्स, पॉवरट्रेन घटक, फोर्जिंग्स, पंप्ससारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च अचूकता असलेल्या घटकांचे उत्पादन करण्यात कार्यरत आहे.
उत्पादन श्रेणी
– उच्च ताणशक्ती असलेले फास्टनर्स (High Tensile Fasteners): पवन ऊर्जा क्षेत्रातील फास्टनर्स, वाहन क्षेत्रातील फास्टनर्स, इंजिन फास्टनर्स, एरोस्पेस आणि विमान क्षेत्रातील फास्टनर्स इत्यादी.
– कोल्ड एक्स्ट्रूडेड पार्ट्स: गियर ब्लँक्स, ट्रान्समिशन शाफ्ट्स, कॅम्स इत्यादी.
– हॉट फोर्ज्ड पार्ट्स: बेव्हल गियर आणि पिनियन संच, हब, जेन ३ बेअरिंग, हब रिंग्स इत्यादी.
– पॉवरट्रेन घटक: टर्बाइन आणि आउटपुट शाफ्ट्स, क्लच हब, सन गियर शाफ्ट्स इत्यादी.
– पंप आणि असेंब्लीज: पाण्याचे पंप, तेलाचे पंप, मेकॅनिकल फूएल फीड पंप.
– रेडिएटर कॅप्स: धातूच्या कॅप्स, नायलॉनच्या कॅप्स.
– पावडर धातूशास्त्र (Powder metallurgy): रोटर्स आणि गिअर्स, सिंक्रोनायझर हब्स, बुशेस, संरचनात्मक भाग इत्यादी.
– लोह पावडर : प्रेस आणि सिंटर ॲप्लिकेशन्ससाठीच्या पावडर, साधी लोह पावडर, डिफ्यूजन बॉन्डेड पावडर इत्यादी.
महसूल आणि भौगोलिक वितरण: वाहन क्षेत्र: ६२ टक्के इतर : ३८ टक्के
निर्यात : २५ टक्के
देशांतर्गत: ६२ टक्के
विक्रीपश्चात: १३ टक्के
निर्यातीपैकी :
अमेरिका – निर्बंधानंतर ६२ टक्के
यूरोप – २५ टक्के
चीन आणि इतर: १३ टक्के
ग्राहक
कंपनीच्या प्रमुख ग्राहकात जनरल मोटर्स, जॉन डियर, न्यू हॉलंड, डेमलर क्रिसलर, कमिन्स इत्यादींसह अनेक आंतरराष्ट्रीय मूळ उपकरण उत्पादक (ओईएम) कंपन्यांना पुरवठा करते. कंपनी वाहन, पवन ऊर्जा, एरोस्पेस, संरक्षण, शेतीची उपकरणे इत्यादींसारख्या औद्योगिक क्षेत्रांना सेवा पुरवते. व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहने उत्पादक कंपन्यांना केल्या जाणाऱ्या पुरवठ्यातून कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ६५-७० टक्के वाटा येतो; तर उर्वरित विक्री ट्रॅक्टर, दुचाकी आणि पवन ऊर्जा उपकरणांच्या उत्पादकांकडून येते.
उत्पादन क्षमता
कंपनीचे भारतात १३ उत्पादन प्रकल्प असून ते तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये स्थित आहेत. तर भारताबाहेर, कंपनीचे उत्पादन प्रकल्प चीन आणि इंग्लंड येथे आहेत.
भांडवली खर्च (कॅपेक्स)
कंपनीकडून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, आपल्या सध्याच्या व्यवसायाच्या विस्ताराचा आणि नवीन प्रकल्पांचा एक भाग म्हणून, भांडवली खर्चापोटी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, यापैकी सुमारे २१७ कोटी रुपये पहिल्या नऊ माहीत वापरले आहेत. या गुंतवणुकीमुळे विविध क्षेत्रांमधील उदा. आयसीई वाहने (अंतर्गत ज्वलन इंजिन असलेली वाहने), प्लग-इन हायब्रिड वाहन, विद्युत वाहने (ईव्ही) इत्यादी ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याची कंपनीची क्षमता वाढेल. कंपनीने आपला संपूर्ण भांडवली खर्च कार्यक्रम स्वतःच्या अंतर्गत जमा निधीतून वित्तपुरवठा करून पूर्ण केला आहे. आर्थिक वर्ष २०२७ साठी कंपनीने सुमारे २५० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचे नियोजन केले आहे.
कंपनीचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे निकाल अपेक्षेप्रमाणे आहेत. मार्च २०२६ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १,६९३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १६१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत ११ टक्के वाढ साध्य केली असून निव्वळ नफा ३० टक्क्यांनी वाढला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षांत कंपनीने ६ टक्के वाढीसह ६,२८९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५९३ कोटी रुपयांचा (९ टक्के वाढ) नक्त नफा कमावला आहे. कंपनीने ४.२५ प्रतिसमभाग अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. उत्तम अनुभवी प्रवर्तक, जागतिक दर्जाचे उत्पादन असलेली आणि अल्प बिटा असलेली सुंदरम फास्टनर्स सध्याच्या अनिश्चित काळातील एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
सुंदरम फास्टनर्स लिमिटेड (बीएसई कोड ५००४०३)
वेबसाइट: www.sundram.com
प्रवर्तक: टीव्हीएस समूह
बाजारभाव: रु. ८४७/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ऑटो अन्सिलरी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २१.०१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४६.९४
परदेशी गुंतवणूकदार ११.२५
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २२.३९
इतर/ जनता १९.४२
पुस्तकी मूल्य: रु. २०३.४५
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: ७२०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २८.१३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९.६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१५
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: २२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): १७.५%
बीटा: ०.६
बाजार भांडवल: रु. १७७९५ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १०७७/७३२
गुंतवणूक कालावधी : २४ महिने
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
