Premium

Money Mantra : टाटा टेक्नॉलॉजीच्या लिस्टिंगमुळे उत्साहाचे वारे

बहुप्रतिक्षित ‘टाटा टेक’ या कंपनीचा लिस्टिंगचा दिवस ऐतिहासिक ठरला. बाजारात उतरल्यावर पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर १६८ टक्क्यांनी वाढला. पब्लिक इश्यूमध्ये ५०० रुपयाला दिलेला शेअर बाजार सुरू होताच १४० % वाढून १३३४ पर्यंत जाऊन पोहोचला.

Tata Technology listing
Money Mantra : टाटा टेक्नॉलॉजीच्या लिस्टिंगमुळे उत्साहाचे वारे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कालच बाजारांनी आपला खरेदीचा उत्साह कायम ठेवत पुन्हा एकदा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सत्रात निफ्टीने पुन्हा एकदा वीस हजारांची पातळी गाठली. तर आज बाजार बंद होताना निफ्टी-फिफ्टी २०१३३ वर स्थिरावला. अपेक्षेप्रमाणे मिडकॅप आणि स्मॉल कॅपमधील घोडदौड कायम टिकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाटा टेक’ ची भरारी

बहुप्रतिक्षित ‘टाटा टेक’ या कंपनीचा लिस्टिंगचा दिवस ऐतिहासिक ठरला. बाजारात उतरल्यावर पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर १६८ टक्क्यांनी वाढला. पब्लिक इश्यूमध्ये ५०० रुपयाला दिलेला शेअर बाजार सुरू होताच १४० % वाढून १३३४ पर्यंत जाऊन पोहोचला. आयपीओनंतर लिस्टिंगच्याच दिवशी गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळवून देणाऱ्या आघाडीच्या सहा कंपन्यांमध्ये ‘टाटा टेक’ चा समावेश झाला आहे. गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या आयपीओला ६९ पट अधिक बोली लागली होती हे लक्षात घ्यावे.

हेही वाचा – Money Mantra: मिनीकॉर्न, हेक्टाकॉर्न, डेकाकॉर्न म्हणजे काय आणि या तिन्हीमध्ये नेमका फरक काय?

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील रेकॉर्ड ब्रेक वाढीचा आढावा घ्यायचा झाल्यास या वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत निफ्टी स्मॉल कॅप्स २५० इंडेक्स ३८ %, निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स ३३ % वाढला आहे, तर निफ्टी फिफ्टीमध्ये फक्त दहा टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. निफ्टीच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये घसघशीत वाढ होते हे गेल्या दोन वर्षांत लक्षात आल्याने अनेक गुंतवणूकदारांनी या धाटणीच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे याचा परिणामसुद्धा या रॅलीमध्ये दिसून येत आहे.

बाजारात पुन्हा एकदा तज्ञांनी मिड आणि स्मॉल कॅपमधून लार्जकॅपमध्ये आपली गुंतवणूक वळवण्याविषयी सूतोवाच केले आहे. काही मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वार्षिक वाढ झालेली दिसते आहे व या पुढील काळात या वाढीला मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध पवित्रा म्हणून पुन्हा एकदा लार्ज कॅपकडे वळायला लागेल असे दिसत आहे.

कोचिंग शिपयार्ड आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये तेजी

भारत सरकारच्या संरक्षण विभागाने देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये भर घालण्याच्या दृष्टीने आघाडीचे पाऊल म्हणून ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ला तेजस विमानाच्या ताफ्याची ऑर्डर दिली आहे आणि देशाअंतर्गत लढाऊ जहाजाच्या निर्मितीवरही भर देण्यात येणार आहे. एका खाजगी वृत्त संस्थेच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध होताच या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले. ‘तेजस’ही हलकी विमाने आणि ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर अशी मेगा ऑर्डर ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर लढाऊ विमाने आणि राफेल विमाने वाहून नेण्याची क्षमता असलेली विमानवाहू युद्धनौका बनवण्याचे काम पुन्हा एकदा कोचिन शिपयार्डला दिले जाण्याची शक्यता आहे. २०३५ पर्यंत १०० पेक्षा जास्त लढाऊ युद्धनौका बांधण्याचा भारताचा इरादा असल्याने या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स येत्या काळात चढे राहण्याची शक्यता आहे. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’चा शेअर बाजार बंद होताना २३७१ वर स्थिरावला तर ‘कोचीन शिपयार्ड’या शेअरमध्ये जवळपास साडेतीन टक्क्यांची वाढ दिसून आली व हा शेअर १२०४ रुपयांवर स्थिरावला.

हेही वाचा – Money Mantra : गरज आणि हौसेचे गणित कसं साधावं?

भारतातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ‘जीआयसी’ या कंपनीचा शेअर सलग वाढ दर्शवत असून वर्षभरात जवळपास ७० टक्के वाढलेला दिसत आहे. कंपनीच्या क्रेडिट रेटिंगमध्ये झालेली सुधारणा आणि बाजारपेठेतील कायम राहिलेला हिस्सा यामुळे ही वाढ झाली असल्याचे दिसते. वर्षभरापूर्वी १२५ ते १५० रुपयापर्यंत उपलब्ध असलेल्या या शेअरचा भाव ३२० रुपये एवढा झाला आहे.

गंधार ऑइल हा पब्लिक इश्यूसुद्धा लिस्टिंगच्याच म्हणजे पहिल्याच दिवशी ७५ % ने वाढून गुंतवणूकदारांना दिलासा देणारा ठरला. प्रामुख्याने क्रूड ऑइल शुद्धीकरण आणि क्रूड ऑइलपासून विविध उत्पादने तयार करणे या व्यवसायात असलेल्या कंपनीचा शेअर दिवस अखेरीस ७८ टक्क्यांनी वाढून ३०१ रुपयांवर स्थिरावला. दरम्यान न्यूयॉर्कमधील एका परिषदेमध्ये जे पी मॉर्गन या आघाडीच्या वित्तसंस्थेचे सीईओ जॅमी डिमन यांनी येत्या काळात अमेरिकेतल्या बाजारामध्ये मंदी येईल अशी शंका वर्तवली आहे. महागाई नियंत्रणात ठेवता न आल्यामुळे व व्याजदर अधिक वाढल्यामुळे मंदीचे सावट अधिक तीव्र होईल असे त्यांनी आपल्या अमेरिकन बाजारावरील चर्चेदरम्यान म्हटले.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata technology listing sparks excitement company stock rose by 168 percent on its first day of listing mmc ssb

First published on: 30-11-2023 at 20:05 IST
Next Story
Money Mantra : गरज आणि हौसेचे गणित कसं साधावं?