मागील लेखात आपण करदात्याला विविध प्रसंगांत मिळालेल्या भेटींची करपात्रता बघितली. ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत. परंतु काही भेटी किंवा व्यवहार असे आहेत की, त्यावर उत्पन्नाच्या क्लबिंगसंबंधित तरतुदी लागू होतात. या उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’च्या तरतुदी करदात्याला माहीत नसल्या तर करदात्याला कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. असे व्यवहार जाणीवपूर्वक केले पाहिजेत. जेणेकरून ते विवरणपत्रामध्ये दाखवून त्यावर योग्य तो कर भरून व्याज आणि दंडापासून सुटका करून घेता येते.

उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’ संदर्भातील तरतुदी काय?

प्राप्तिकर कायद्यात जसे उत्पन्न वाढते, तसे त्यावरील कराचा दर वाढतो. त्यामुळे करदाता आपले उत्पन्न आणि त्यापरत्वे करदायित्व कमी करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपली संपत्ती पती/पत्नीला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना, ज्यांचे करपात्र उत्पन्न नाही किंवा कमी आहे, अशांना हस्तांतरित करून आपले उत्पन्न आणि एकूण करदायित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. असे अवैध रीतीने करदायित्व कमी करणाऱ्या पद्धतीवर आळा घालण्यासाठी उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’च्या तरतुदी प्राप्तिकर कायद्यात आणल्या गेल्या आहेत. काही वेळेला अजाणतेपणे असे व्यवहार केले जातात. असे व्यवहार कोणते आणि प्राप्तिकर कायद्यात त्याविषयी काय तरतुदी आहेत हे करदात्याने जाणून घेतले पाहिजे. प्राप्तिकर कायद्यात दुसऱ्याच्या उत्पन्नावर भराव्या लागणाऱ्या करांच्या तरतुदीसाठी एक स्वतंत्र प्रकरण आहे. करदात्याने असे व्यवहार केल्यास त्यावर कोणी कर भरावा याची माहिती यात दिली आहे.

Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
advertisement boards indicators Dombivli railway station local train passengers
डोंबिवली रेल्वे स्थानकात जाहिरात फलकांमुळे इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
Girish Kuber Explanation About Gurdian Minister Post
Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
bjp strategy to capture konkan through allocation of ministerial posts
मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच

आणखी वाचा-बाजारातली माणसं : गुंतवणूकदारांचा रॉबिनहूड -मिचेल प्राइस

१. कलम ६० – मालमत्तेच्या हस्तांतरणाशिवाय उत्पन्नाचे हस्तांतरण : मालमत्तेची मालकी हस्तांतरित केल्याशिवाय उपन्न दुसऱ्याच्या नावाने दाखविल्यास ते उत्पन्न मालमत्तेची मालकी असणाऱ्यालाच करपात्र असते. याचे सामान्यतः आढळणारे उदाहरण म्हणजे घर पतीच्या नावाने आहे, पत्नी गृहिणी आहे आणि हे घर भाड्याने देऊन त्याचा घर भाडे करारनामा पत्नीच्या नावाने करून घरभाडे पत्नीच्या नावाने घेणे. असे करून घर भाड्यावर पत्नीचे उत्पन्न कमाल उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे पत्नीला कर भरावा लागणार नाही आणि एकूणच कराची बचत होईल. अशा अवैध रीतीने कर बुडविण्यावर आळा घालण्यासाठी ही तरतूद आहे. या कलमानुसार या घरभाड्यावर पतीलाच त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागेल.

२. कलम ६१ – मालमत्तेचे रद्द करण्यायोग्य हस्तांतरण : कोणतेही हस्तांतरण ‘रिव्होकेबल ट्रान्सफर’ म्हणजेच, मालमत्ता हस्तांतरित केल्यानंतर त्याचा मालकी हक्क कोणत्याही क्षणी परत मिळवण्याची परवानगी देणारे, असल्यास अशा हस्तांतरित केलेल्या मालमत्तेचे उत्पन्न हे हस्तांतरित करणाऱ्यालाच या कलमानुसार करपात्र असते.

३. कलम ६४ – करदात्याचे, उद्योग-व्यवसाय करणाऱ्या कंपनीत २० टक्क्यांपेक्षा अधिक समभाग असतील किंवा भागीदारी संस्थेत २० टक्क्यांहून अधिक हिस्सा असेल आणि अशा कंपनी किंवा भागीदारी संस्थेतून त्याच्या पती/पत्नीला काही उत्पन्न (व्याज, वेतन, दलाली, वगैरे) मिळाले असेल तर ते करदात्याचे उत्पन्न समजले जाते. जर करदात्याची पत्नी/पती ज्यांना हे उत्पन्न दिले आहे त्यांच्याकडे काही तांत्रिक किंवा व्यावसायिक पात्रता असेल तर ते उत्पन्न करदात्याचे समजले जात नाही. उदा. करदात्याची आणि त्याच्या पत्नीची भागीदारी संस्था आहे आणि दोघेही डॉक्टर आहेत अशा बाबतीत ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत.

आणखी वाचा-बाजार रंग – बाजार सरकारी खर्चाच्या प्रतीक्षेत?

  • पती/पत्नीला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याचे उत्पन्न समजले जाते. उदा. पतीने पत्नीला १० लाख रुपये हस्तांतरित केले आणि पत्नीने ते मुदत ठेवीत गुंतविले, त्या मुदत ठेवीवर मिळालेल्या व्याजावर पतीला कर भरावा लागेल.
  • करदात्याने त्याच्या सुनेला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याचे उत्पन्न समजले जाते. उदा. सासऱ्याने त्याच्या सुनेला १० लाख रुपये हस्तांतरित केले आणि सुनेने ते मुदत ठेवीत गुंतविले, त्या मुदत ठेवीवर मिळालेल्या व्याजावर सासऱ्याला कर भरावा लागेल.
  • कोणत्याही व्यक्तीला किंवा ट्रस्टला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे लाभार्थी म्हणून पती/पत्नीला किंवा सुनेला मिळणार असेल तर ते उत्पन्न संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याचे म्हणून समजले जाते.
  • अल्पवयीन मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे अजाण मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो. याला काही अपवाद आहेत. अल्पवयीन अपंग मुले किंवा अल्पवयीन मुलांनी कौशल्य, प्रतिभा वगैरेंने मिळविलेले उत्पन्न हे पालकांच्या उत्पन्नात गणले जात नाही.

आता प्रश्नोत्ताराकडे वळूया

प्रश्न : मी माझ्या पत्नीला आमच्या लग्नापूर्वी पाच लाख रुपये भेट म्हणून दिले होते. ते तिने मुदत ठेवीत गुंतविले. त्या मुदत ठेवीवर मिळालेले व्याज हे माझ्या उत्पन्नात गणले जाईल का? -प्रकाश जोशी

उत्तर : पतीने पत्नीला हस्तांतरित केलेल्या पैशातून मिळालेल्या उत्पन्नावर पतीला कर भरावा लागतो. परंतु आपण भेट लग्नापूर्वी दिल्यामुळे आपल्या भेटीवर पत्नीला लग्नानंतर मिळालेले मुदत ठेवीवरील व्याज हे पत्नीचेच उत्पन्न असेल हे उत्पन्न आपल्या उत्पन्नात क्लब केले जाणार नाही. परंतु पत्नीला लग्नापूर्वी मिळालेली पाच लाख रुपयांची भेट पत्नीला करपात्र आहे.

प्रश्न : मी माझ्या पत्नीला दरमहा २५,००० रुपये घरखर्चाला मागील १० वर्षांपासून देत आहे. त्या पैशातून घरखर्च केल्यानंतर उरलेले काही पैसे तिने म्युचुअल फंडात गुंतविले. या फंडातील मिळालेल्या लाभांशावर मला कर भरावा लागेल का? -एक वाचक

उत्तर : जर पत्नीने, पतीने दिलेल्या घरखर्चातून पैसे वाचवले आणि ते गुंतवले तर अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत. जर घरखर्चासाठी पैसे दिले गेले आहेत आणि पत्नीने त्यातील काही पैसे हुशारीने वाचवले, तर असे म्हणता येईल की हे मोबदल्याशिवाय हस्तांतरण नसून घरगुती जबाबदाऱ्यांसाठी दिलेले आहेत. त्यामुळे त्यावर पतीला कर भरावा लागणार नाही. प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून विचारणा झाल्यास योग्य पुरावे सादर करावे लागतील.

प्रश्न : मी माझ्या पत्नीला एक घर भेट म्हणून दिले आहे. हे घर तिने भाड्याने दिले आहे आणि तिला दरमहा ५०,००० रुपये घरभाडे मिळते. या घरभाड्यातून मिळालेले पैसे तिने मुदत ठेवीत गुंतविले आहेत. त्यावर तिला व्याज मिळते. हे व्याजाचे उत्पन्नसुद्धा माझ्या उत्पन्नात क्लब होईल का? -प्रणव शिंदे

उत्तर : पत्नीला भेट म्हणून दिलेल्या घराच्या घरभाड्यासाठी क्लबिंगच्या तरतुदी लागू होतील आणि त्यानुसार ते उत्पन्न आपल्या उत्पन्नात दाखवावे लागेल. परंतु, घरभाडे उत्पन्न मुदत ठेवीत गुंतवून मिळालेले व्याजाचे उत्पन्न हे पत्नीलाच करपात्र असेल त्यावर ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होणार नाहीत.

प्रश्न : मी माझ्या वडिलांना भेट म्हणून १० लाख रुपये दिले, त्यांनी ते पैसे शेअरबाजारात गुंतविले. त्यांना त्या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न माझ्या उत्पन्नात गणले जाईल का? -अपर्णा काळे

उत्तर : वडिलांना दिलेल्या भेटीतून मिळालेल्या उत्पन्नासाठी क्लबिंगच्या तरतुदी लागू होत नाहीत. वडिलांना मिळालेली १० लाख रुपयांची भेट करपात्र नाही कारण ते ‘ठरावीक नातेवाईक’ आहेत. या पैशाच्या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न वडिलांनाच करपात्र आहे.

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader