टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेड (बीएसई कोड ५४२१४१)
संकेतस्थळ : http://www.techno.co.in
प्रवर्तक: पदम प्रकाश गुप्ता
बाजारभाव: रु. १२८९
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: अभियांत्रिकी/ईपीसी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २३.२६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५६.९३

परदेशी गुंतवणूकदार ८.६५
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २२.७२

इतर/ जनता ११.७०
पुस्तकी मूल्य: रु. ३३५

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: ४५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ४०.३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.८

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.५

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३५.५

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १६.५
बीटा : १.३

बाजार भांडवल: रु. १४,९२४ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १६५५/८७०
गुंतवणूक कालावधी: ३६ महिने

टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेड (टीईईसीएल) ही कंपनी ऊर्जा पायाभूत सुविधा उद्योगामध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी), मालमत्ता मालकी तसेच संचालन आणि देखभाल सेवा पुरवण्याचे कार्य करते. कंपनीला चार दशकांचा अनुभव असून ती भारतातील सर्वात अग्रगण्य ऊर्जा-पायाभूत सुविधा कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने वीज निर्मिती, ट्रान्समिशन आणि वितरण या तीन प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी साध्य केली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये भारत आणि परदेशांत ४५० हून अधिक प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेचा समावेश आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने शक्तीनगर येथे उभारलेल्या पहिल्या वीज केंद्राच्या स्थापनेत कंपनीचा सहभाग होता; तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या मालकीची ५० टक्क्यांहून अधिक उपकेंद्रे उभारण्यात टीईईसीएलने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

ईपीसी व्यवसाय: प्रमुख व्यवसाय

टीईईसीएल ट्रान्समिशन, स्मार्ट मीटरिंग आणि इतर प्रकल्पांच्या क्षेत्रात ईपीसी सोल्यूशन्स देते; सध्या संपूर्ण भारतात १७ ठिकाणी विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करत आहे.

वीज निर्मिती: ही कंपनी ‘कॅप्टिव्ह पॉवर प्लांट’ (स्वनिर्मिती वीज प्रकल्प) आणि बाह्य कामांसाठी ‘टर्नकी’ उपाय पुरवते. तसेच, एफजीडी आणि ‘बॅलन्स-ऑफ-प्लांट’ उपायांमध्येही कंपनीचे विशेष नैपुण्य आहे; या प्रकल्पांचा वाटा कंपनीच्या एकूण कार्यादेशामध्ये ९.९ टक्के इतका आहे.

ट्रान्समिशन आणि वितरण: कंपनी ट्रान्समिशन आणि वितरणाशी संबंधित सर्वसमावेशक उपाय पुरवते. यामध्ये ईएचव्ही उपकेंद्रे (७६५ किलो वॅटपर्यंत), वितरण व्यवस्थापन प्रणाली आणि स्मार्ट मीटरिंग उपायांचा समावेश होतो.

स्मार्ट मीटर्स: ही कंपनी अनेक राज्यांमध्ये ‘अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर’ आधारित स्मार्ट मीटरिंग प्रकल्पांची अंमलबजावणी करते. यामध्ये प्रकल्पांचे सर्वसमावेशक संचालन आणि देखभाल करण्याचे कामही कंपनी करते. स्मार्ट मीटरिंगसह इतर वितरण प्रकल्पांचा वाटा एकूण कार्यादेशात (ऑर्डर बुक) सुमारे २० टक्के आहे. कंपनी सध्या देशातील पाच राज्यांचे कंत्राट राबवत आहे.
विदा केंद्र (डेटा सेंटर) : कंपनी ‘हायपरस्केल’ आणि ‘एज डेटा सेंटर’ विकसित करत आहे. सध्या चेन्नई (२४ मेगावॉट) आणि कोलकाता (१६ मेगावॉट) येथे एकूण ४० मेगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटरचे बांधकाम सुरू आहे; तसेच रेलटेल कंपनीसाठी १०२ ‘एज सेंटर्स’ उभारण्याचे कंत्राटही कंपनीकडे आहे. या क्षेत्रात कंपनी ईवाय, हिताची, शिंड्लर इलेक्ट्रिक, सीमेन्स, सॅमसंग आणि इतर अशा आघाडीच्या सल्लागार व भागीदार संस्थांसोबत काम करते.

ग्राहक वर्ग

कंपनीच्या ग्राहक वर्गात पॉवर ग्रिड, एनटीपीसी, अदानी आणि स्टरलाइट पॉवर यांसारख्या कंपन्यांचा समावेश असून आघाडीच्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, राज्य वीज वितरण कंपन्या आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारी करते; तसेच विविध आंतरराष्ट्रीय वीज कंपन्यांसोबतही कंपनीचे व्यावसायिक संबंध आहेत.

कार्यादेश (रु.)

डिसेंबर २०२५ पर्यंत, कंपनीकडे ९,५८१ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीला जानेवारी २०२६ पर्यंत २,१०० कोटी रुपयांच्या नवीन कार्यादेश प्राप्त झाले आहेत. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३,००० कोटी रुपयांच्या नवीन कार्यादेश मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे.
सद्य:स्थितीतील प्रकल्प

आर्थिक वर्ष २०२५ दरम्यान, कंपनीने अफगाणिस्तान, टोगो, गोवा, लखनौ आणि आसाम येथे महत्त्वाचे ट्रान्समिशन आणि उपकेंद्र प्रकल्प पूर्ण केले आहेत; या प्रकल्पांचे एकूण मूल्य १,५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. १,००० मेगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे एफजीडी (Flue Gas Desulfurization) प्रकल्प, ४०० किलोवॉटपर्यंतची अनेक उपकेंद्रे आणि ५ लाखांहून अधिक मीटरचा समावेश असलेल्या ‘स्मार्ट मीटरिंग’ प्रकल्पांमध्ये कंपनीने लक्षणीय प्रगती साधली आहे. ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.’, ‘अदानी एनर्जी सोल्युशन्स लि.’ आणि ‘राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगम लि.’ यांसारख्या ग्राहकांकडून, स्पर्धात्मक बोली प्रक्रिया अंतर्गत ३,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे नवीन कार्यादेश कंपनीला प्राप्त झाले आहेत.

कंपनी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर ऑपरेशन्समध्ये मोठ्या गुंतवणुकीचे नियोजन करत आहे. यामध्ये चेन्नई (२४ मेगावॉट) आणि कोलकाता (१५ मेगावॉट) येथील सुविधांचा, तसेच ‘रेलटेल’सोबतच्या एका प्रकल्पांतर्गत विविध राज्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या ‘एज डेटा सेंटर’चा समावेश आहे. पुढील ५ वर्षांच्या कालावधीत, २५० मेगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर उभारून त्यांची मालकी स्वतःकडे ठेवण्याची कंपनीची योजना आहे.

डिसेंबर २०२५ साठी सरलेल्या तिमाहीत कंपनीने गतवर्षीच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली आहे. या तिसऱ्या तिमाहीत उलाढालीत ३७ टक्के वाढ होऊन ती ८७२ कोटी रुपयांवर गेली आहे, तर नक्त नफ्यात २४ टक्के वाढ होऊन तो ११९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर नऊमाहीसाठी कंपनीने २२,४१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३,३४२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या नऊमाहीच्या तुलनेत तो ३७ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. मात्र उत्तम व्यवस्थापन, मोठे कार्यादेश आणि कुठलेही कर्ज नसलेली टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनीअरिंग गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
-अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com

हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.