अजित जोशी
अपेक्षेप्रमाणे गेल्या पंधरवड्यात बिटकॉइन हळूहळू वर चढायला सुरुवात झालेली आहे. २८ एप्रिलपासून ८ मेपर्यंत जवळपास सहा साडेसहा टक्क्यांची वाढ बिटकॉइनमध्ये दिसत आहे.

इथेरियम किंवा इतर करन्सी जरी तेवढ्या प्रमाणात वाढत नसल्या तरी या स्तंभात वारंवार म्हटल्याप्रमाणे, बिटकॉइनमध्ये होणारी गुंतवणूक ही आता संस्थागत व्हायला लागलेली आहे. त्यामुळे सर्वात आधी तिचे भाव वाढायला सुरू होतात. पण त्याचबरोबर त्या एकदम खूप चढतील असेही नाही. याउलट जर आणि जेव्हा गुंतवणूकदार परतायला लागतील तेव्हा इथेरियम जोरात उसळी मारेल यात शंका नाही.

थोडक्यात जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये जायचं असेल आणि तुलनेत कमी धोका, कमी परतावा चालणार असेल तर बिटकॉइन, अन्यथा अधिक जोखीम पत्करून अधिक परताव्याची अपेक्षा बाळगायची असेल तर इथेरियमकडे पाहायला हरकत नाही. पण याच पंधरवड्यात आणखी दोन चलनांनी मोठी संस्थागत गुंतवणूक नसली तरी सात टक्क्यांच्या आसपास उसळी मारली आणि ती म्हणजे ट्रॉन आणि चेनलिंक. अमेरिकन सरकारच्या धोरणांमुळे या दोन्ही चलनांमध्ये तेजी आलेली आहे आणि पुढच्या काळातही येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे या चलनांची वेगळी कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान.

समजा तुम्ही एखाद्या सोसायटीच्या फन-फेअरला गेलेले आहात. अनेकदा तिथल्या वस्तू विकत घेण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ वगैरे खरेदी करण्यासाठी कुपन्स वापरावी लागतात. मग तुमच्या जवळचे रुपये तुम्ही आयोजकांना देऊन त्याबदल्यात कुपन्स विकत घेता आणि त्यामध्ये व्यवहार करता. समजा हीच प्रक्रिया जर डिजिटल माध्यमातून झाली तर? समजा तुमच्याकडचे डॉलर्स देऊन त्या मोबदल्यात तुम्ही एक डिजिटल चलन विकत घेतलं तर? या चलनाचे सगळे व्यवहार देवाण-घेवाण ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने नोंदवली गेली तर? यामध्ये तुम्ही मिळवत असलेल्या चलनाला तंत्रज्ञानामुळे सोय, जलदता, सुरक्षितता, असे अनेक फायदे उपलब्ध होतात. याच प्रक्रियेला म्हणतात ‘टोकनायझेशन!’

डॉलर्सच्या बदल्यात जे असं टोकन बाजारात आलं आहे, ते म्हणजे स्टेबलकॉइन. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील आणि पैसा बाजारातल्या अनेक व्यवहार आता स्टेबल कॉइनच्या माध्यमातून व्हायला लागलेले आहेत. व्हिसासारख्या नामांकित कंपनीने गेल्याच महिन्याअखेरीस असे घोषित केलं ‘स्टेबलकॉइन’च्या माध्यमातून होणारे व्यवहार सात अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेले आहेत, जी या तिमाहीत गेल्या तिमाहीपेक्षा झालेली ५० टक्के वाढ आहे. एकूण स्टेबलकॉइन बाजारमूल्यसुद्धा ३२५ अब्ज डॉलरच्या आसपास पोहोचलेले आहे. जाता जाता हेही लक्षात घ्यायला हवं की डॉलर विकत घेण्याऐवजी स्टेबलकॉइन विकत घेणं हाही गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. खास करून ज्यांना दीर्घकाळ क्रिप्टोचलनांमध्ये व्यवहार करायचा आहे त्यांना सध्याची करप्रणाली टाळण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग असू शकतो.

मात्र मूळ विषय ट्रॉन किंवा चेनलिंक यांचा होता. मगाशी म्हटल्याप्रमाणे या स्टेबलकॉइनमध्ये व्यवहार करायचा तर त्याच्या देवाण-घेवाणीचं एक माध्यम, एक प्रकारचा मार्ग आवश्यक आहे. हा मार्ग म्हणजे ट्रॉन ही प्रणाली. एका अर्थाने ट्रॉन हे मूलतः स्टेबलकॉइनची देवाण-घेवाण करणारे माध्यम आहे, स्वतंत्र चलन नव्हे. पण या प्रणालीतून किती देवाण-घेवाण होते त्या आधारावर त्या प्रणालीची मागणी, पुरवठा आणि किंमत ठरते. मग क्रिप्टो बाजारात ते एक वेगळं चलन म्हणून ओळखलं जातं.

गेल्या काही काळात ९० टक्क्यांहून अधिक स्टेबलकॉइनचे व्यवहार ट्रॉनवरून होत आहेत. बाजारात स्टेबलकॉइन मूल्य ८९ अब्ज डॉलरहून अधिक आहे आणि ते गेल्या सात दिवसांत ३.४ टक्क्यांनी वाढलेलं आहे यावरून त्याची उपयुक्तता लक्षात येईल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकनायझेशन हे जसं डॉलर्सचं होतं, तसं सोने, तेल (क्रूड ऑइल) किंवा इतर कोणत्याही मौल्यवान गोष्टीचा होऊ शकतं (किंबहुना टोकनायझेशनमागची कल्पना डिबेंचर्स आणि बाँडप्रमाणेच आहे. फक्त फरक एवढाच, की इथे तंत्रज्ञान असल्यामुळे इतर अनेक मध्यस्थ अनावश्यक ठरतात). त्यामुळे, स्टेबलकॉइनसारख्याच इतर अनेक टोकनचे व्यवहार ट्रॉनवर होऊ शकतात आणि होतातही.

मग इथे या प्रणालीतला तिसरा खेळाडू येतो. वेगवेगळ्या वस्तूंच्या आधारावर काढलेल्या टोकनचे जर व्यवहार होणार असतील, तर त्याबद्दलची सविस्तर माहिती व्यवहार करणाऱ्यांना असणे आवश्यक आहे. ही माहिती देणारे अनेक स्रोत आहेत. त्या सगळीकडून ती मिळवणं आणि तिच्यातून एक सुसंग साखळी निर्माण करणं हे काम करणारी तिसरी प्रणाली म्हणजे चेनलिंक. ती माहिती चेनलिंक पुरवते ते टोकन्स वापरणाऱ्या वित्तीय संस्था, विमा संस्था किंवा स्टेबलकॉइनचे प्लॅटफॉर्म वगैरे यांना. ज्या बदल्यात चेनलिंकला फी मिळते. आणि त्यातून तिचं मूल्य ठरतं. चेनलिंकच्या किमतीमध्ये गेल्या पंधरा दिवसांत आठ-नऊ टक्क्यांची उसळी आलेली आहे. आणि तरीही त्या किमती पाच वर्षाच्या सर्वोत्तम किमतींपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमतीत उसळी येत असताना व्यवहारांची संख्या किंवा व्हॉल्यूमही वाढतो आहे. तशाच जवळपास ४६ टक्के चलन हे मोठमोठ्या धारकांकडे आहे. थोडक्यात बिटकॉइनप्रमाणे स्थैर्य असणाऱ्या चलनाच्या दिशेने चेनलिंकचाही प्रवास सुरू आहे.

या सगळ्याला मोठी चालना मिळाली ती अमेरिकन सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे. एकीकडे जीनियस ॲक्ट, त्यानुसार अमेरिकेतील स्टेबलकॉइन व्यवहारांना कायद्याच्या वेगवेगळ्या चौकटी निर्माण करण्यात आल्या. एसईसी / सीएफटीसी या तिथल्या नियामक यंत्रणांनी स्टेबलकॉइन्स आणि त्या संदर्भातल्या प्रणालींची वर्गवारी कशी करावी ते सांगितलं. यामुळे या चलनांची आणि या चलनांमध्ये व्यवहार करणाऱ्या ट्रॉन किंवा चेनलिंकसारख्या प्रणालीची विश्वासार्हता वाढते. या सगळ्याचाही या दोन चलनांच्या किमतीमध्ये उसळी यायला हातभार लागला.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावं? अर्थात याचे उत्तर तुम्ही किती जोखीम घ्यायला तयार आहात त्यावर अवलंबून आहे, हे वेगळं सांगायला नकोच. कारण त्याशिवाय अधिकाधिक फायदा होणारच नाही. तो बाजाराचा मूलभूत नियम आहे. मुळात क्रिप्टोचलनात जाणं, यातही जोखीम आहे. त्याहून अधिक जर घ्यायची नसेल तर आता बिटकॉइन सर्वात उत्तम पर्याय आहे असं म्हणता येईल.

एकूणच ‘टोकनायझेशन’च्या तंत्रज्ञानात गेल्या काही काळात झपाट्याने झालेली वाढ पाहिली आणि भविष्यातही जर त्यावर विश्वास असेल, तर एकूण गुंतवणुकीचा काही हिस्सा ट्रॉनमध्ये टाकायला हरकत नाही. तुलनेत चेनलिंकमध्ये पैसा ठेवण्यात जोखीम अजून वाढते. कारण त्यात निव्वळ क्रिप्टोचलन किंवा टोकन यावरचाच भरोसा नव्हे, तर माहिती गोळा करून सुसूत्रपणे पुरवणाऱ्या यंत्रणेवरही विश्वास ठेवायला हवा. अगदी मध्यम जोखमीसाठीसुद्धा शंभरापैकी पन्नास रुपये बिटकॉइन, १० रुपये इथेरियम, २५ रुपये ट्रॉन आणि १५ रुपये चेनलिंक अशी विभागणी करता येईल. मात्र हे शंभर रुपये तुमच्या एकूण गुंतवणुकीतील मोठा हिस्सा असता कामा नये.

मुळात आपण बिटकॉइनपासून सुरू केलेलं असलं तरी गेल्या काही काळात इथेरियम, सोलाना, ट्रॉन किंवा स्टेबल अशी या परिवारातली इतर कर्तृत्ववान भावंडसुद्धा पाहिली. येत्या काळात परिवार म्हणजेच पोर्टफोलिओ म्हणून याकडे कसं पहावं ते समजण्याचा प्रयत्न करू.