-डॉ. आशीष थत्ते
Raid Movie Income Tax Act rules and Section 132: रेड हा चित्रपट जेव्हा मी बऱ्याच वर्षांपूर्वी बघितला, तेव्हा तुकाराम मुंढे तितकेसे चर्चेत नव्हते. आता जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांची आठवण होत, त्यांचाच चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. कारण चित्रपटात सुरुवातीलाच लखनौ येथील कार्यालयात गेल्यावर नायक आपल्या हाताखालील अधिकाऱ्याला तो सांगतो की, गेल्या ७ वर्षात त्याची ४९ वेळेला बदली झाली आहे आणि पन्नासाव्या बदलीची तो वाट बघतोय.
चित्रपटात अजय देवगणने प्राप्तिकर अधिकारी अमय पटनायक म्हणून चांगली छाप सोडली आहे आणि चित्रपटाचे नाव आहे ‘रेड’. जो वर्ष २०१८ मध्ये आला होता आणि यानंतर त्याचा पुढील भाग सुद्धा आला होता. चित्रपट १९८१ च्या एका प्राप्तिकर विभागाच्या एका खऱ्याखुऱ्या धाडीवर आधारित होता. त्यावेळचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार सरदार इंदर सिंग यांच्या घरावर जेव्हा अलोक कुमार यांनी धाड टाकली, जी ४५ तास चालली आणि सुमारे १ कोटी ८० लाख रुपये मूल्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. देव करो आणि आपल्या कुणावर सुद्धा धाड पडण्याची वेळ ना येवो, पण पडल्यास जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या १३२ व्या कलमाची म्हणजेच नवीन प्राप्तिकर कायद्याच्या २४७व्या कलमाची आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती आपण घेउया.
चित्रपटाचा खलनायक असतो रामेश्वर सिंग किंवा ताऊजी म्हणजे सौरभ शुक्ला जो लखनौ येथील एक व्यापारी आणि राजकीय नेता दाखवला आहे. प्राप्तिकर अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर अजय देवगणला निनावी फोन येतो, ज्यात रामेश्वर सिंग याची माहिती घेण्याची विनंती केली जाते. माहिती घेतल्यावर अजय देवगण शंकेला कुठलाही वाव नसल्याची खात्री झाल्यावरच दिल्लीला जाऊन आपल्या वरिष्ठांची सही घेऊन धाड टाकायचे ठरवतो, जे कायद्यात कलम १३२ उपकलम १ मध्ये दिले आहे. ही धाड त्यावेळेच्या कायद्याच्या कलम १३२ प्रमाणे आणि झडती आणि जप्तीच्या नियमानुसार असते. अर्थातच चित्रपटात कुठेच कायदा किंवा त्याच्या अंतर्गत येणारे नियम सांगितले जात नाहीत. पण माझ्या सारख्या वित्तीय व्यावसायिकाला ते चित्रपट बघताना पदोपदी जाणवतात.
जेव्हा धाड सुरू होते तेव्हा अजय देवगण रामेश्वर सिंग यांना त्यांच्या परिसरातील २ प्रतिष्ठित नागरिकांना साक्षीदार म्हणून बोलवण्याची विनंती करतो, जी अर्थातच चित्रपटात कुठलाही कायद्याचा संदर्भ न देता सांगितले आहे. पण प्राप्तिकर कायद्याच्या अंतर्गत बनवलेल्या नियमांमध्ये याचा संदर्भ आढळतो. नियम क्रमांक ११२ आणि त्याचे इतर नियम याची माहिती देतात. नियम ११२ उपनियम ७ मध्ये साक्षीदार बोलावण्याची तरतूद आहे.
जेव्हा धाडीला सुरुवात होते तेव्हाच घरातील महिलांना शोधण्यासाठी आणि सांगण्यासाठी महिला प्राप्तिकर अधिकारी जातात, जे नियम क्रमांक ११२ (५) मध्ये लिहिले आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा अजय देवगण रामेश्वर सिंगच्या घरच्या दरवाज्यावर पहारेकऱ्याला सांगतो की, माझ्याबरोबर पोलीस सुद्धा आले आहेत. कारण नियम ११२ (४) प्रमाणे तो पोलिसांची मदत घेऊ शकतो.
रामेश्वर सिंगच्या आईच्या खोलीत एक पेटी मिळाल्यावर अमय चावी न मिळाल्यास पेटी तोडण्यास सांगतो जे कायद्याच्या कलम १३२ (१) (बी)(ii) मध्ये लिहिले आहे. बऱ्याच शोध कार्यानंतर जेव्हा सोने नाणे आणि रोख पैसे सापडतात तेव्हा नियम ११२ (१०) नुसार त्यांची यादी सुद्धा बनवण्याचे काम सुरू असल्याचे चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटात एका संवादात जेव्हा रामेश्वर सिंग मद्य पीत असतो तेव्हा अजय देवगण त्याला स्टेटमेंट अजून बाकी असल्याचे सांगतो, जे खरेतर कलम १३२(४) नुसार धाडीच्यावेळेला घ्यायचे असते.
धाडीच्या सुरुवातीला माहिती देताना अजय देवगण घरातील स्त्रियांच्या अंगावरील दागिने बघून ज्या दागिन्यांचा हिशोब नसेल ते जपत करून पावती दिली जाईल, असे सांगतो जे १३२(१)(सी)(iii) मध्ये लिहिले आहे. पहिल्यांदा जेव्हा घरात रोख रक्कम सापडते तेव्हा रामेश्वर सिंग आपल्याच घरच्यांना विचारतो की हे कुणी कुठे लपवले आहे, कलम १३२(४ए)(i) प्रमाणे ज्याच्या घरात पैसे मिळाले अर्थातच त्याच्यावरच ही जबाबदारी असते.
प्राप्तिकर विभागाने या सगळ्या धाडींच्या वेळेला करदात्याला काही कर्तव्ये आणि हक्क देखील जाहीर केले आहेत. यातील एक म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांची दप्तरे तपासून शाळेत जाऊन देणे, जे चित्रपटात जसेच्या तसे वापरले आहे. चित्रपटात कित्येक वेळेला रामेश्वर सिंग आणि त्याचा परिवार जेवताना दाखवला आहे. योग्य वेळेला करदात्याला जेवून देणे हे सुद्धा हक्कांमध्ये समाविष्ट होते. धाड सुरू होते तेव्हा अजय देवगण काही हक्कांची माहिती रामेश्वर सिंगला देतो त्यात ओळखपत्र तपासणे किंवा वॉरंट बघणे याचा समावेश होतो. रामेश्वर सिंग आपल्या घरच्या लोकांची माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांना देतो हे त्याचे खरेतर जाहीर केलेल्या कर्तव्यांमध्ये आहे.
जे विद्यार्थी प्राप्तिकर कायद्याचा अभ्यास करत आहेत, त्यांनी अभ्यास करण्यापूर्वी किंवा अभ्यासातून विश्रांती घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा! एवढे सगळे कायदे वापरले आहेत तरीही मध्ये काही काळ अजय देवगण रामेश्वर सिंगला चक्क दिल्लीला जाऊन देतो. जी मुभा कायद्यात कुठेही दिलेली नाही. तो तिथे जाऊन पंतप्रधानांना भेटून ही धाड थांबवावी, अशी विनंती करतो हा प्रसंग विशेष रंगला आहे. पण तो तुम्ही चित्रपटातच बघा. चित्रपट बघताना पदोपदी प्राप्तिकर कायद्याचीच आठवण होते. तुम्ही देखील चित्रपट नक्की बघा पण वित्तीय नजरेतून!
