डॉ. आशीष थत्ते गेल्या काही लेखात आपण गुंतवणुकीचे विविध अपारंपरिक किंवा फारसे परिचित नसलेले मार्ग बघितले, त्या लेखमालिकेत हा अखेरचा लेख आहे. बरेच मार्ग आपण बघितले पण तरीही अजून काही असे मार्ग आहेत ज्यांचा आपण नक्की विचार करावा. यात आणखी एक पर्याय म्हणजे जुन्या बंदुका आणि लष्करी वस्तू. आपल्या देशामध्ये बंदुका किंवा लष्करी वस्तू जवळ बाळगण्यासाठी बंधने आहेत. त्याला विशिष्ट परवाना घ्यावा लागतो आणि त्याची ठराविक कालावधीने माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी लागते. मग तुम्ही बंदूक स्वसंरक्षणासाठी घेतली आहे किंवा गुंतवणूक म्हणून घेतली आहे? यात अजून पुरातन विविध प्रकारच्या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या तलवारींमध्ये गुंतवणूक करू शकतो. पण यासाठी कायद्याचा चौकटीत रीतसर परवानगी घावी लागतेच. आणखी वाचा-Money Mantra: बचतीचा बेस काही हौशी लोकांकडे आज देखील जुन्या काळातील तलवारी त्यांच्या म्यानी आणि इतर जुनी लष्करी साधने आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे जी लंडनच्या एका संग्रहालयात आहेत ती महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहेत. अर्थात ती सरकारी संपत्ती असल्यामुळे त्याचे काही मूल्यांकन करू शकत नाही. पण अशा जुन्या लष्करी वस्तूंचे मूल्यांकन नेहमीच जास्त असते. खूप वर्षांपूर्वीच्या अक्षयकुमारच्या एका चित्रपटामध्ये अशाच जुन्या बंदुकांचा व्यापार करणारे एक पात्र दाखवण्यात आले होते. ते काही फारसे काल्पनिक होते असे नाही, पण सत्यातसुद्धा असे काही व्यापारी आहेत. बाजारातील मूळ बंदुकींप्रमाणे त्यांची छोटी प्रतिकृती देखील मिळते. ज्यांना आवड असेल किंवा मूळचे लष्करी उपकरण न घेता त्याची प्रतिकृती विकत घेता येऊ शकते. जुन्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करताना भातुकली, नावाजलेल्या व्यक्तींच्या सह्या, अवजारे, खेळाच्या स्मरणिका, टी शर्ट्स, बॅजेस, कार्ड यातसुद्धा गुंतवणूक करू शकतो. भारतात जुन्या पुस्तकांची मोठी बाजारपेठ आहे. त्याला बिब्लिओफिले म्हणजे पुस्तकप्रेमी किंवा पुस्तकांची आवड बाळगणारे असे म्हटले जाते. जुन्या पुस्तकांचे लिलाव देशात बऱ्याच ठिकाणी होतात. जुन्या पुस्तकात गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जसे की, ज्या विषयाचे समजते तेच पुस्तक निवडा, तुमच्या आवडीच्या लेखकाचे पुस्तक गोळा करा, एखाद्या भौगोलिक क्षेत्राची माहिती असणारी पुस्तके संग्रहात ठेवू शकता. आणखी वाचा-Money Mantra: कोणत्या आयुर्विमा पॉलिसीवरील कर्ज मिळतं? किती मिळतं? अपारंपरिक गुंतवणुकीमध्ये कमी काळात निश्चित फायदा मिळेलच असे नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांनी अपारंपरिक आणि अपरिचित गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. प्राप्तिकरामध्ये देखील काहीही सूट मिळत नाही त्यामुळे त्याचा विचारकरुनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यापासून पुन्हा वित्तीय क्षेत्रातील काही रंजक गोष्टींची माहिती घेऊया. ashishpthatte@gmail.com