सेवानिवृत्तीच्या वयातील म्हणजे वयवर्षे ५५ ते ६० मधील पिढी अजूनही पूर्वीच्या पाऊलखुणा जपून आहेत. नवीन पिढीशी जुळवून घेणारी आणि वेळप्रसंगी अनुभवांचा अभिषेक करणारी ही पिढी. या पिढीने मेहनतीने नाती टिकवली आणि वाढवली. आज लौकिकार्थाने निवृत्तीकडे वळताना बऱ्यापैकी पैसा गाठीशी असणारी ही पिढी आहे. या सर्व मंडळींशी बोलताना एक मात्र लक्षात येते की, वैयक्तिक अर्थकारणाच्या पलीकडचे असे खूप काही त्यांच्या मनात दडलेले आहे, त्यांना ते सांगायचे आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांवर समोरचा ‘माणूस’ समजून घेण्याची मोठी जबाबदारी आहे. काही अनुभव मांडतो.
कामतांच्या मुलाने आयुष्यात फार काही केले नाही. तिशीत आहे, जेमतेम पगार आहे. एकुलता एक आहे. बाबांच्या निवृत्तीच्या पैशांमधून (स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन) नवीन धंदा करण्याचा विचार करतोय. राणे सर हे निवृत्त प्राध्यापक आहेत. मुलगी लग्नानंतर परदेशात आहे. घरात अचानक पडले. मात्र त्यासाठी आरोग्य विमा अत्यंत तुटपुंजा होता. इस्पितळात दाखल करण्याआधी ‘एफडी’ मोडावी लागली. बेंद्रे यांच्या आजारपणात लहान मुलाने त्यांची सुयोग्य काळजी घेतली, याचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून बेंद्रे यांचे राहते घर परस्पर लहान मुलाच्या नावावर करून बेंद्रे मोकळे झाले.
हेही वाचा…तांदूळ, साखर, मका; पुढे इथेनॉलचा धोका
वरील तिन्ही उदाहरणांत अर्थकारण आहे. जर असे मानले की, आपण वयवर्षे ऐंशीपर्यंत जगणार आहोत, तर जी व्यक्ती आज ५५-६० या वयोगटात आहे त्याला अजून मोठी वाट चालायची आहे. मग, आपल्याकडे असलेला निवृत्ती निधी आपण कसा वापरायचा? कुठे गुंतवायचा? तो कोणाला आणि किती द्यायचा? याची घरात चर्चा झाली पाहिजे. शिवाय मृत्युपत्र कसे करायचे? राहते घर तुम्ही हयात असताना मुलांना द्यावे का? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मार्गदर्शकासोबत शोधावी लागतील.
त्याचबरोबरीने जर तुम्ही आर्थिक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असाल तर तुम्हाला चार पावले अधिक चालावे लागेल. गुंतवणूक हा फक्त पैशांचा व्यवहार नाही. तुम्हाला तो व्यवहार करणारा माणूस आणि त्याचे कुटुंब समजून घ्यावे लागेल, तरच तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. ज्येष्ठ मंडळींच्या आर्थिक नियोजनाचे विविध भावनिक पैलू तांत्रिक पैलूंएवढेच महत्त्वाचे आहेत, त्यावर खूप जास्त भर दिला गेला पाहिजे. याबाबत काही मुद्दे मांडतो.
हेही वाचा…बँक बुडवणारा कर्मचारी भाग २ – डॉ. आशीष थत्ते
मनःशांती
आर्थिक नियोजनाने वरिष्ठांना सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास दिला गेला आहे का याचा प्रथम विचार व्हावा. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत असतानाच भविष्याबद्दलची त्यांची चिंता कमी होईल.
आर्थिक स्वातंत्र्य
वडीलधाऱ्यांना त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यास तुम्ही मदत केल्यास त्यांचा आत्मसन्मान खूप वाढेल. ज्यामुळे आपले इतरांना ओझे वाटत नाही, अशी आश्वासक भावना त्यांच्यात निर्माण होईल.
हेही वाचा…गुंतवणूकगुरूंचे चाललंय काय?- वॉरेन बफे
मोकळे संभाषण:
कुटुंबातील सर्व मंडळींच्या आकांक्षा भविष्यातील येऊ घातलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर तोलायला हव्यात. उदा. निवृत्तीच्या वेळी ‘क्ष’ व्यक्तीला ५० लाख रुपये मिळाले असतील आणि महागाई १० टक्के या दराने वाढत गेली तर दर महिन्याचा खर्च वगळून ५० लाख रुपये गुंतवणूक आणि त्यातील परतावा हा त्या व्यक्तीला पुढील २० वर्षे पुरेल का? ही चर्चा घरात घडवून आणावी लागेल. माहितीवर आधारित निर्णयप्रक्रिया इथे महत्त्वाची ठरेल.
वारसा आणि कौटुंबिक मूल्ये
ज्येष्ठ मंडळी त्यांची मूल्ये, कौटुंबिक परंपरा जपू इच्छितात. त्यांना जे वाटते ते करू दिल्याने त्यांना मानसिक समाधान मिळते. मुलांच्या आर्थिक परिमाणांपेक्षा ती मूल्ये वेगळी असू शकतात. आपण लक्षात ठेवले पाहिजे की, वयोवृद्ध माणसांची आयुष्याची ही ‘गिफ्टिंग स्टेज’ आहे.
हेही वाचा…Money Mantra : युनिफाईड पेन्शन स्कीमची रक्कम कशी ठरवली जाते?
बदलासाठी मानसिक तयारी
सेवानिवृत्तीमुळे जीवनशैलीत लक्षणीय बदल होतो. आर्थिक नियोजनाची चर्चा करताना ज्येष्ठांना या संक्रमणासाठी मानसिकदृष्ट्या तयार करणे आणि ते त्यांचा वेळ कसा घालवतील, यावर आवर्जून चर्चा झाली पाहिजे.
हेही वाचा…निर्ढावलेले आणि हेतुपुरस्सर कर्जबुडवे
‘उतार’वयाचा सामना
उतारवयात हळूहळू तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. यामुळे आरोग्य विमा घेतला असल्यास त्याचा वेळेवर हप्ता जातो आहे ना यावर नजर ठेवणे किंवा मिळालेला आरोग्य विमा अपुरा वाटत असेल तर आपत्कालीन निधी जमवून ठेवावा लागेल. जर आपली मुले परदेशात असतील तर जवळच्याच नातेवाईकाकडे अथवा आर्थिक मार्गदर्शकाकडे तुम्ही हक्काने मदत मागितली पाहिजे. तुमची मते कदाचित वेगळी असतील याची मला कल्पना आहे. पण मावळतीचे रंग वेचताना, प्रत्येक खिडकीतून दिसणारे आकाश हे वेगळे असू शकते!
© The Indian Express (P) Ltd