लोकांकडून वाढती स्वीकृती आणि पर्यायाने वाढते व्यवहार हे ‘यूपीआय’संलग्न देयक प्रणालीच्या लोकप्रियतेचे द्योतक निश्चितच आहे. देयक व्यवहरांना सहज, सुलभ करणाऱ्या या प्रणालीत पाच नवीन सुविधांचा भर पडत आहे. काय आहेत या नवीन सुविधा आणि त्यांचा वापर कसा करता येईल?
आजकाल भीम/ गूगलपे/ फोनपे यांसारख्या पेमेंट ॲपचा वापर सर्वसामान्य लोक मॉलपासून ते अगदी रस्त्यावरील भाजी विक्रेत्याकडे खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी सहजगत्या करीत असल्याचे दिसून येते. हे तिन्ही आणि यासारखे अन्य मोबाइल ॲप यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) प्रणालीचा वापर करत असून याने देयक व्यवस्थेत एक प्रकारची क्रांतीच घडवून आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>Gig Economy : भारतात ९ कोटी रोजगार निर्मितीची क्षमता!

आज भारतात दररोज सुमारे २० ते २२ कोटी एवढे व्यवहार ‘यूपीआय’मार्फत केले जातात, तर दरमहा सुमारे १० ते १२ लाख कोटींच्या उलाढाली यातून होत असल्याचे दिसून येते. शिवाय यात सातत्याने वाढ होत आहे. ‘यूपीआय’चा वाढता वापर लक्षात घेऊन, नुकतेच म्हणजे १९ ते २२ सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या ‘ग्लोबल फिनटेक’ महोत्सवात ‘यूपीआय’द्वारे आणखी पाच नवीन सुविधा देऊ केल्या जात असल्याबाबत जाहीर केले गेले व त्या अशा आहेत –
१) ‘यूपीआय’ लाइट

२) रुपे क्रेडिट कार्डशी ‘यूपीआय’ची संलग्नता

३) ‘यूपीआय’- १२३

४) ‘यूपीआय’ ऑटो पे

५) भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम

या पाच नवीन सुविधा काय आहेत आणि त्यांचा वापर कसा करता येतो हे आपण समजून घेऊ.

हेही वाचा >>>Auto-debit Payment ची सुविधा १ एप्रिलपासून बंद होणार? बँकांच्या चुकीचा ग्राहकांना बसणार भुर्दंड!

‘यूपीआय’ लाइट : सध्या भीम ॲपवर ही सुविधा उपलब्ध असून कोटक बँक, एसबीआय, पीएनबी, युनियन बँक, इंडियन बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा या बँका ही सुविधा देऊ करत आहेत. ही सुविधा ‘वॉलेट’ धाटणीची असून, या ‘वॉलेट’मध्ये एकावेळी जास्ती जास्त २,००० रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करावे लागतात व जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंचे पेमेंट ‘यूपीआय लाइट’चा वापर करून ऑफलाइनसुद्धा ट्रान्सफर करता येतात. वॉलेटमधील रक्कम संपत आल्यावर ‘ऑटो पे’ पद्धतीने पुन्हा २,००० रुपये ट्रान्सफर केले जातात. यामुळे दूधवाला, इस्त्रीवाला, भाजीवाला, रस्त्यावरील भेळवाला / वडापाववाला यांच्याशी करावे लागणारे किरकोळ देयक व्यवहारही सहज करता येतील. अशा किरकोळ व्यवहारांचा समावेश बँक स्टेटमेंटमध्ये होत नाही, मात्र प्रत्येक व्यवहार पूर्ण झाल्याचे ‘एसएमएस’द्वारे कळविले जाते.

रुपे क्रेडिट कार्डशी ‘यूपीआय’ची संलग्नता : सध्या ‘यूपीआय’मार्फत होणारे प्रत्येक व्यवहाराची रक्कम लगेचच ‘यूपीआय’ला संलग्न असलेल्या बँक खात्यातून (डेबिट) जात असते. त्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या क्रेडिट लिमिटचा वापर करता येत नाही. तसेच किरकोळ विक्रेत्यांकडे क्रेडिट कार्ड स्वीकारण्याची सुविधा नसते. मात्र अशा बहुतेक सर्व ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करून देयक व्यवहार पूर्ण करण्याची सुविधा असते. आता रुपे क्रेडिट कार्ड आपल्या मोबाइलवरील ‘यूपीआय’ ॲपशी संलग्न करता येईल. ज्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करून व्यवहार पूर्ण करता येईल आणि रक्कम बँक खात्यातून न जाता क्रेडिट कार्ड वापरून दिली जाईल. यामुळे कार्डचे बिल आल्यावरच आपल्याला प्रत्यक्ष रक्कम चुकती करावी लागेल. सुरुवातीस ही सुविधा फक्त रुपे क्रेडिट कार्डधारकच वापरू शकतील. मात्र लवकरच ही सुविधा मास्टर व व्हिसा क्रेडिट कार्डधारकांसाठीसुद्धा देऊ करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सुखी बाजाराचा ‘सतरा’

‘यूपीआय’-१२३ : आजही देशात सुमारे ३० ते ३५ कोटी लोकांना स्मार्ट फोन वापरणे परवडत नाही. प्रस्तावित नवीन सुविधा प्रामुख्याने ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत (वाय फाय किंवा ३ जी/४जी सुविधा नाही) साधे मोबाइल फोन जे वापरत आहेत अशांसाठी देऊ केली आहे. त्यांना आपल्या सध्याच्या फोनवर ‘यूपीआय’-१२३ या सुविधेचा वापर करून आपले आर्थिक व्यवहार सहजगत्या करता येतील. यासाठी मोबाइल क्रमांक बँक खात्याला संलग्न असावा लागतो आणि याच मोबाइल क्रमांकावरून आयव्हीआर (इन्टरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) क्रमांकावर फोन करावा लागतो. त्यानंतर जे बँक खाते आपल्याला ‘यूपीआय’ १२३ शी संलग्न करायचे आहे त्या खात्याचा तपशील (बँकेचे नाव, कस्टमर आयडी, खाते क्रमांक) द्यावा लागतो व त्यानंतर आपल्याला एक ‘यूपीआय’ पिन (जो बँकेनुसार ४ आकडी किंवा ६ आकडी असतो) तयार करावा लागतो. यासाठी आपल्या डेबिट कार्ड नंबरचे शेवटचे ६ नंबर व कार्डची एक्स्पायरी जी एमएम/वायवाय (महिना व वर्ष) अशी असते ती आपल्या मोबाइलवर आलेला ‘ओटीपी’ टाकून बॅकेनुसार ४ किंवा ६ आकडी ‘यूपीआय’ पीन जनरेट (हा पुढे आपल्याला बदलताही येतो) करता येतो. आता आपल्याला जर देयक व्यवहार करावयाचा असेल तर ज्याला पेमेंट करावयाचे असेल त्याचा मोबाइल क्रमांक टाकल्यावर स्क्रीनवर त्याचे नाव दिसेल. नावाची खात्री पटल्यावर रक्कम आणि नंतर ‘यूपीआय’ पिन टाकल्यावर सबंधित लाभार्थीच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग होते. तसा ‘एसएमएस’ दोघांनाही येतो. याशिवाय ‘यूपीआय १२३’ वापरून आपल्याला विविध देयकांचा भरणा, तसेच मोबाइल रिचार्ज करता येईल.

‘यूपीआय ऑटो पे’: ही सुविधा आपण आपले नेहमीचे कर्जाचे हप्ते, वीज देयक, मोबइल बिल, किंवा अन्य नियमित भरावी लागणारी देयके चुकती करण्यासाठी वापरू शकता. त्यासाठी आपल्याला बिल रजिस्टर करावे लागेल व त्यानंतर जेव्हा बिल देय असेल तेव्हा बँक खात्यातून आनुषंगिक रक्कम (डेबिट) टाकून संबंधित कंपनीला ती स्वयंचलित पद्धतीने अदा केली जाईल. यामुळे वेळेत देयक व्यवहार पूर्ण तर होतोच. शिवाय त्यासाठी ऑनलाइन देयक व्यवहार ‘ओटीपी’ यासारख्या कटकटी असत नाहीत. (अर्थात बिल पेमेंटसाठी आपल्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक असणे आवश्यक असते) ही सुविधा याआधीदेखील उपलब्ध होती. मात्र केवळ ५,००० रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येत असे आता ही मर्यादा १५,००० रुपये इतकी केली आहे.

भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम : ही सुविधा वापरून परदेशी असणारी व्यक्ती भारतात राहणाऱ्या आई-वडील, अन्य स्वकीयांना वीज, फोन आणि अन्य देयके तसेच घराच्या कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी सहजगत्या भरू शकतील. एरव्ही यासाठी त्यांना जो खर्च येतो तो सुमारे एकूण रकमेच्या ५ ते ६ टक्के इतका असतो. या पद्धतीच्या वापरातून देयक व्यवहार केला गेल्यास केवळ १ ते २ टक्के इतकाच अधिकचा खर्च येईल.

थोडक्यात असे म्हणता येईल की, वर उल्लेखिलेल्या ‘यूपीआय’ सुविधा आपण आपल्या गरजेनुसार वापरू शकतो व आपल्या वेळेची व पैशांची बचत करू शकतो.

सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुणेस्थित सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर)

More Stories onmoneyMoney
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upi light addition of upi new features facilitating payment transactions payment app amy
First published on: 08-12-2022 at 12:17 IST