-आशीष ठाकूर
अमेरिका-इराण युद्ध थांबायचं चिन्ह दिसत नाही. त्यातच अमेरिकेतील नागरिकांची दुखरी नस म्हणजे वाढती महागाईची भर. म्हणजेच अमेरिकेत होणाऱ्या सिनेटच्या निवडणुकांमध्ये ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष यांचा दारूण पराभव करण्यासाठी इराणने युद्धाबरोबरच राजनैतिक डावपेच आखत, तेल वाहतुकीसाठी वापरात असलेला होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक मार्ग बंद केला आहे. त्याचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होऊन खनिज तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात गगनाला भिडले आहेत.
भविष्यात याची परिणती महागाई भडकण्यात होणार. वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त रोकड तरलता शोषून घेण्यासाठी कर्जावरील व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता, यातून गृहकर्ज, दुचाकी, चारचाकी वाहन कर्ज, औद्योगिक कर्ज महाग होणे असे दुष्टचक्र जन्माला येणार. भारताबाबत या सर्व संकटांत दुष्काळाचे सावटही आहेच. अमेरिकेच्या दहा वर्ष मुदतीच्या कर्जरोख्यांचा परतावा दर (बॉण्ड यील्ड) ५.३ टक्क्यांवर झेपावला आहे. याचा परिणाम परदेशी गुंतवणूकदार संस्था भारतीय भांडवली बाजारातून काढता पाय घेत आहेत. त्यांचा स्वाभाविक ओढा मायदेशी गुंतवणुकीकडे वाढत आहे. चलनविनिमय दरात सशक्त डॉलर, कमकुवत रुपया त्यामुळे आयात महाग होत आहे. या प्रतिकूल घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे कोसळणारा भांडवली बाजार होय.
या अनिश्चिततेच्या दिवसात, गुंतवणूकदार परंपरागत सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीच्या गुंतवणुकीकडे वळतात. परंतु आज तिथे देखील घोर निराशाच पदरी पडत आहे. थोडक्यात गुंतवणुकीच्या विविध माध्यमातून दारुण अपेक्षाभंगच होत असल्याने सद्य:स्थितीतील गुंतवणूकदारांच्या आर्थिक, मानसिक स्थितीला कविवर्य सुधीर मोघेंच्या ‘मन मनास उमगत नाही आधार कुठे शोधावा!’या काव्यपंक्ती अतिशय चपखल बसतात.
निफ्टी निर्देशांक जो मंदीच्या गर्तेत चालला आहे त्याला येणाऱ्या दिवसात २२,२०० चा आधार असणार आहे. हा आधार राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २२,५००, २२,८००, २३,०००, २३,२०० ते २३,५०० असेल. ही क्षीण स्वरूपाची सुधारणा ही मंदीच्या गर्तेतील तेजीची झुळूक असेल.
सरकारकडून येणाऱ्या दिवसांत हालचाल दिसावी. भांडवली बाजार सावरण्यासाठी करता येणाऱ्या गोष्टी म्हणजे, दीर्घमुदतीचा भांडवली नफा कर रद्द करणे, समभाग खरेदी-विक्रीवरील कर कपात (‘एसटीटी’मध्ये कपात) आणि उद्योगधंद्यासाठी आकर्षक उपाययोजना जाहीर कराव्या लागतील. तसे झाल्यास, निफ्टी निर्देशांक आपले सर्व भरभक्कम अडथळे दूर करत २४,०००च्या स्तरावर टिकेल.
निफ्टी निर्देशांक सातत्याने २४,०००च्या स्तरावर टिकल्यास त्याचे वरचे लक्ष्य हे २४,६००, २४,९०० ते २५,३०० असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. येणाऱ्या दिवसातील क्षीण स्वरूपातील सुधारणेत निफ्टी निर्देशांक २३,५०० स्तरावर जाण्यास वारंवार अपयशी ठरल्यास, या निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे २२,८००, २२,५००, २१,८०० ते २०,५०० असे असेल.
बँक निफ्टी
१ ऑक्टोबरचा बंद भाव : ५४,४५०.७५
महत्वाचा केंद्रबिंदू स्तर : ५५,०००
बँक निफ्टीने ५५,०००चा स्तर पार करून, तो सातत्याने कायम राखल्यास या निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य ५५,९०० असेल. तर द्वितीय लक्ष्य ५६,९०० असेल. मात्र बँक निफ्टी निर्देशांक ५५,००० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास त्याचे प्रथम खालचे लक्ष्य ५३,५००, तर द्वितीय खालचे लक्ष्य ५२,००० असेल.
सेन्सेक्स
१ ऑक्टोबरचा बंद भाव : ७१,९०९.७०
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ७१,३००
सेन्सेक्सने ७१,३०० चा स्तर सातत्याने राखल्यास, त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ७३,००० आणि द्वितीय लक्ष्य ७५,००० असेल. मात्र सेन्सेक्स ७१,३०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास त्याचे खालचे लक्ष्य ७०,२०० असेल.
सोन्याची वाटचाल
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,४६,००० रुपये
सोन्याच्या किंमतीने ‘एमसीएक्स’वर १,४६,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,५०,००० असेल. तर द्वितीय वरचे लक्ष्य १,५५,००० असेल. मात्र सोन्याच्या किंमतीला १,४६,००० चा स्तर राखण्यास अपयश आल्यास त्याचे खालचे लक्ष्य १,४०,००० असेल.
चांदीची वाटचाल
महत्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,२४,००० रुपये
चांदीच्या किंमतीने ‘एमसीएक्स’वर २,२४,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, तिच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य २,२९,०००तर द्वितीय वरचे लक्ष्य २,३५,०००असेल.एमसीएक्स वरील चांदीच्या किंमतीने २,२४,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, चांदीच्या किमतीचे खालचे लक्ष्य २,१६,००० असेल.
(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत: ashishthakur1966@gmail.com)
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
