व्हेसुव्हियस इंडिया लिमिटेड ही रिफ्रॅक्टरी वस्तूंचे उत्पादन तसेच मोल्टेन मेटल फ्लो या अभियांत्रिकीच्या व्यवसायातील भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. व्हेसुव्हियस इंडिया ही व्हेसुव्हियस पीएलसी या ब्रिटिश कंपनीची उपकंपनी असून ती विविध औद्योगिक अनुप्रयोगांसाठी रिफ्रॅक्टरी उत्पादने, नियंत्रण प्रणालींचे उत्पादन आणि व्यापार करते. कंपनी कास्टिंग आणि रिफ्रॅक्टरीसंबंधित सेवा देते, ज्यामध्ये कास्टिंग प्रक्रिया आणि रिफ्रॅक्टरी अनुप्रयोगांसाठी स्थापना, देखभाल आणि तांत्रिक सेवा समाविष्ट आहे.
व्हेसुव्हियसचे विविध व्यवसाय विभाग असून ते खालीलप्रमाणे आहेत.
अ) स्टील विभाग: हे स्टील उद्योगासाठी तयार केलेले रिफ्रॅक्टरी उत्पादने, प्रवाह नियंत्रण प्रणाली आणि प्रक्रिया मापन उपाय देते.
ब) फाउंड्री विभाग (सेन्सर आणि प्रोब्स) कंपनीची उत्पादन श्रेणी, ज्यामध्ये तापमान सेन्सर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्रोब्स, सबलान्स प्रोब्स आणि मेटल सॅम्पलिंग सोल्युशन्स इत्यादींचा समावेश आहे. फाउंड्री उत्पादन प्रक्रियांवर नियंत्रण आणि देखरेख वाढविण्यावर लक्ष केंद्रित करते.
कंपनीची उत्पादने आणि सेवा प्रामुख्याने स्टील आणि फाउंड्री विभागासाठी असली तरीही ॲल्युमिनियम, सिमेंट, चुना, खनिज प्रक्रिया, हायड्रोकार्बन प्रक्रिया, रिफायनरीज आणि वीजनिर्मिती, इ. इतर उद्योगांसाठीदेखील ही उत्पादने उपयोगी पडतात. कंपनी १३ देशांमध्ये निर्यात करते.
महसूल विभाजन : रिफ्रॅक्टरी उत्पादनांचे उत्पादन – ५७ टक्के, रिफ्रॅक्टरी सेवांची तरतूद – ४३ टक्के कंपनीचे विशाखापट्टणम आणि कोलकाता येथे दोन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीने अनकापल्ली, विशाखापट्टणम येथे ८८ कोटी गुंतवणुकीसह एक नवीन अल-सी मोनोलिथिक उत्पादन सुविधा स्थापन केली असून या प्रकल्पाची अल-सी मोनोलिथिक उत्पादनांसाठी वार्षिक क्षमता १.२० लाख टन आहे. तर उत्पादंनांची वाढती मागणी लक्षात घेता कोलकाता प्रकल्पाची क्षमता ४० टक्क्यांनी वाढवली आहे.
डिसेंबर २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,८६९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५३ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे, तर मार्च २०२५ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, कंपनीने ४८२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १४ टक्क्यांनी कमी असला तरीही आगामी कलावधीत कंपनीकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा राहील. कंपनीने आपल्या समभागांचे नुकतेच १:१० प्रमाणात विभजन केल्याने सध्या कंपनीचा शेअर ५४० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. कुठलेही कर्ज नसलेली, उत्तम व्यवस्थापन असलेली ही व्हेसुव्हियस इंडिया बहुराष्ट्रीय कंपनी एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुमच्या पोर्टफोलिओला भक्कम आधार ठरू शकेल. शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
व्हेसुव्हियस इंडिया लिमिटेड (बीएसई कोड ५२०११३)
वेबसाइट: http://www.vesuvius.com
प्रवर्तक: व्हेसुव्हियस पीएलसी, यूके
बाजारभाव: रु. ५५७ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: रिफ्रॅक्टरी उत्पादने
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २०.३० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५५.५७
परदेशी गुंतवणूकदार ४.१४
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २०.९६
इतर/ जनता १९.३३
पुस्तकी मूल्य: रु. ७०.५
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: १४५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १२.६
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४४.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४२.४
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २८४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (ROCE): २५.५
बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. ११२७९ कोटी (मिड-कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६४७/२५६
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
अजय वाळिंबे Stocksandwealth@gmail.com वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही. प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.