T-30 / B-30 – टॉप ३० / बियॉण्ड ३०

महानगर ते गाव शिवार ही मोठाले अंतर असलेली दोन ध्रुव. पण दोहोंतील दरी बऱ्यापैकी भरून निघत असल्याचे अलिकडे अनेक उदाहरणे सांगता येतील. जत्रा – मेळावे – नृत्य, मनोरंजनावर दौलतजादा उधळण करणारी गावेही आहेत. परंतु फड ते फंड हे अंतर महानगरांपेक्षा, गाव शिवारांतून वेगाने भरूनही निघू लागले आहे. वित्तीय शहाणपण, समंजस गुंतवणूक निर्णय हा मक्ता केवळ शहरांचा राहिलेला नाही, याचा परिचय म्युच्युअल फंडातील सातत्यपूर्ण आणि वाढता ओघही करून देतो.

सर्वार्थाने स्वागतार्ह ठरावी अशी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडासारख्या आजवर शहरांपुरत्या सीमित राहिलेल्या संपत्ती निर्माणाच्या साधनाशी गावांचे पक्के नाते जुळू लागले आहे. गावांत पैसा आहे, पण पैशाने पैसा वाढवत नेता यायला हवा. म्हणजेच पैशाला कामाला जुंपून धननिर्माण करता येते, याची महती गावालाही पटू लागल्याचे अधिकृत आकडेवारीच सांगते.भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी)’ या नावाने कार्यरत आहे. ती या व्यवसायाचे नियमन, देखरेख करण्यासह, वाढीचा लेखाजोखाही ठेवते. देशात सर्वत्र वाढ संतुलित राहावी या जाणीवेतून, ‘ॲम्फी’ने म्युच्युअल फंडात येणाऱ्या पैशांना टी-३० (टॉप ३०) आणि बी-३० (बियॉण्ड ३०) अशा दोन भौगोलिक गटांमध्ये विभागण्याची पद्धत रूढ केली आहे. यातील टी-३० म्हणजे देशातील अव्वल ३० शहरे/महानगरांचे क्षेत्र, तर बी-३० म्हणजे या अव्वल ३० व्यतिरिक्त अन्य छोटी नगरे/गावांचे क्षेत्र आहे. त्यामुळे ‘ॲम्फी’च्या नकाशावर महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, अमरावती, सोलापूर, मीरा रोड ही नावेही आता मिरवू लागली आहेत. किंबहुना नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरनंतर टी-३० मध्ये स्थान मिळविणारे चौथे आणि पाचवे शहर आहे. मार्च २०१२ मध्ये पुणे (६), नागपूर (२०), नाशिक (२४) अशी असलेली क्रमवारी, मार्च २०२५ मध्ये पुणे (४), नागपूर (१३), नाशिक (१६) अशी कैक पायऱ्या वर चढली आहे. टी-३० यादीत मुंबई शीर्षस्थानी, तर छत्रपती संभाजीनगर ३० व्या स्थानी असा महाराष्ट्राचाच वरचष्मा आहे, अशी ‘जिओजित इनसाइट’मधील मार्च २०२५ पर्यंतची संकलित माहिती दर्शविते.

मुंबई महानगरीचे उपजतच येथे राहणाऱ्यांवर काही संपत्ती संस्कार आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या एकूण गंगाजळीत एकट्या मुंबईचा वाटा ३३.४४ टक्क्यांचा असणेही तसे नवलाचे नाही. पण मुंबईसह महाराष्ट्राचा वाटा तब्बल सात टक्क्यांहून अधिक भर घालणारा म्हणजे ४०.६ टक्क्यांवर जाणारा आहे. सांगलीमधून वार्षिक ४३.८ टक्के अशा दमदार दराने म्युच्यु्अल फंडात मार्च २०२५ पर्यंत ४,५७६ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत, अमरावतीतील वार्षिक वाढीचा दर ४१.८ टक्के आणि एकूण गुंतवणूक ४,५३० कोटी रुपये, मीरा रोडमधून वार्षिक ३७.७ टक्के वाढीसह ५,८७७ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत. ‘जिओजित इनसाइट’च्या अहवालात मीरा रोड, सांगली, पनवेल, खारघर, कल्याण ही अशी नगरे आहेत, ज्यांनी गत तीन-चार वर्षात फंडातील गुंतवणुकीत जवळपास चार पटीने वाढीची म्हणजे प्रत्येक वर्षागणिक दुप्पट गुंतवणूक आकर्षिण्याची किमया साधली आहे. गेल्या दोन वर्षात धुळ्यातून १०९ टक्के आणि साताऱ्यातून १०८.५ टक्क्यांची दमदार वाढ दिसली आहे.

देशातील सध्याच्या ४३ म्युच्युअल फंड घराण्यांपैकी २२ फंड घराणी अशी आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या एकूण मालमत्तेत बी-३० क्षेत्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे ग्रो, सॅम्को, नावी, आयटीआय, महिंद्र मनुलाइफ, क्वांट या नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाधारीत फंड घराण्यांच्या बाबतीत तर त्यांच्याकडे येणारा प्रत्येक चौथा गुंतवणूकदार हा ग्रामीण, निमशहरी भागातील आहे. महानगरांतील प्रस्थापितांच्या स्पर्धेत गुरफटून जाण्यापेक्षा दुर्लक्षित व अवांछित राहिलेली क्षेत्रे काबीज करण्याचे धोरण त्यांना फळल्याचे दिसून येते. मार्च २०१२ पर्यंत बी-३० क्षेत्राचा एकूण म्युच्युअल फंड गंगाजळीतील वाटा अवघा ९.२ टक्के होता, तो मार्च २०२५ अखेर २७ टक्क्यांच्या घरात गेल्याचे ‘ॲम्फी’चे आकडे सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसा कमावणे आणि त्यासाठी कष्ट उपसणे हे प्रत्येकासाठी अपरिहार्यच. मात्र घाम गाळून मिळविलेला पैसा दरमहा थोडाथोडका बचत करून, तो म्युच्युअल फंडाच्या तज्ज्ञ आणि व्यावसायिक निधी व्यवस्थापकाच्या हाती सोपविण्याचा ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’च्या योजनेला गावांमधून मिळत असलेला प्रतिसादही उत्साहदायी आहे. नागरीकरण, विकास झाल्याचा कोणी, कितीही कंठशोष करो, आजही भारत / इंडिया ही विभागणी खूप मोठी आहे. खरा भारत आजही खेड्यांनी बनलेला आहे हेच वास्तव आहे. ते एकदा मान्य केले तर, कारण मग हलाखी, हताशा, पोटासाठी वणवण, स्थलांतरण आणि शेतकरी आत्महत्या यांना नाकारणेही मग अवघड जाते. उपजिविकेची साधने मर्यादित असूनही संपन्न आणि समाधानी कृषक-श्रमिक समाज सर्वांनाच हवा आहे. म्हणूनच ग्रामीण हृदय आणि जाणीवांची गुंतवणुकीशी सलगी आणि बंध जुळून येणे हे आश्वासक आणि दिलासा देणारे आहे.