प्रतिशब्द : Claim Settelment Ratio – दावे निकाली टक्केवारी
कोणत्याही प्रकारच्या विम्यातील सर्वात मोठी नड ही क्लेम सेटलमेंट (Claim Settelment) अर्थात दाव्यांचे निवारण हीच आहे. ‘मेडिक्लेम’ म्हणजेच आरोग्य विम्याबाबत ही अडचण अधिक मोठी आहे. विमा क्षेत्राची नियामक ‘इर्डा’च्या २०२३-२४ च्या वार्षिक अहवालानुसार, आरोग्य विम्यामध्ये एकूण दावा केलेल्या रकमेपैकी फक्त ७१ टक्केच विमा कंपन्यांकडून देण्यात आलेत. क्लेम सेटलमेंट रेशो किंवा सीएसआर म्हणजे दिलेल्या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या एकूण दाव्यांपैकी विमा कंपनीने निकाली काढलेल्या एकूण दाव्यांची टक्केवारी. जी आरोग्य विम्यामध्ये ७१.३ टक्के (२०२३-२४) आहे, तर आयुर्विम्यामध्ये हेच प्रमाण ९६.८२ टक्के आहे. म्हणजेच याचा अर्थ आयुर्विमा कंपन्यांनी प्रस्तुत झालेल्या प्रत्येक शंभरातील केवळ तीन दावे ना-मंजूर झाले किंवा ३० दिवसांच्या आत ते निकाली काढले गेले नाहीत. दोन टक्केवारीतील तफावत पाहता, आरोग्य विम्याच्या निवडीबाबत अधिक दक्षता आणि चिकित्सा का आवश्यक आहे, ते लक्षात येईल.
हा पॉलिसीधारकांवर केंद्रित अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कारण विमा कंपनी दाव्यांची पूर्तता करत नसेल तर विमा खरेदी करणे व्यर्थच ठरते. विशेषतः तो व्यर्थ ठरल्याचे अडल्या प्रसंगी लक्षात येणे हे दुहेरी आघात करणारे असते. तथापि विमा कंपनी ही तुम्ही केलेल्या दाव्यांवर पैसे देईल की नाही हे तुम्ही कसे शोधू शकता? याच्याशी संलग्न आपण मागील लेखांत पाच मुद्द्यांचा परामर्श घेतला, ते म्हणजे – सब-लिमिट, रूम-रेंट कॅपिंग, न मिळणारे खर्च (प्रपोर्शनेट डि़डक्शन्स), को-पेमेंट आणि पुनर्संचयित लाभ (रेस्टोरेशन बेनिफिट). पॉलिसी दस्तऐवज यापैकी पहिल्या चार अटी नसणाऱ्या विमा कंपनीलाच प्राधान्य दिले जाणे सर्वोत्तम. आता लक्षात घ्यावयाचे आणखी पाच मुद्दे पाहू.

१. प्रतीक्षा काळ (Waiting Period): आरोग्य विमा हे संभाव्य आजारपणाच्या स्थितीत आवश्यक वैद्यकीय उपचारांची काळजी घेणारा उपाय आणि सुरक्षा कवच आहे. तब्येतीने सुदृढ असतानाच हे सुरक्षा कवच मिळविले जावे, आजार जडल्यानंतर नव्हे हे अगदी स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. जर पॉलिसी खरेदी करण्याआधीच काही आजार असतील, तर तशा आजारांसाठी उपचार घेण्यासाठी एक विशिष्ट प्रतीक्षा कालावधी विमा कंपन्यांकडून लागू केला जातो. कैकप्रसंगी तो एक ते ३६ महिन्यांपर्यंत असू शकतो. कोणताही आजार नसलेल्या पॉलिसीधारकालाही पॉलिसीच्या खरेदीनंतर पहिल्या ३० ते ९० दिवसांपर्यंत कोणतेही लाभ मिळविता येत नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा घटक तपासून घेतला जावा.

२. डे-केअर ट्रीटमेंटः आरोग्य विम्यामध्ये ‘डे-केअर’ उपचार म्हणजे २४ तासांपेक्षा कमी वेळ रुग्णालयात दाखल राहून मिळणारा उपचार होय. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलिसीस यासारख्या उपचारांसाठी रुग्णालयात २४ तासांपेक्षा कमी वेळ राहिले तरी चालते. यासह निदान चाचण्या आणि बाह्यरुग्ण उपचारांसाठी लागणारा खर्च तुमच्या पॉलिसीत समाविष्ट आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे.

३. क्षेत्र-आधारित रचनाः विशिष्ट स्थानासाठी वैद्यक सेवांवरील खर्च आणि जोखीम घटक लक्षात घेऊन, विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसीची रचना करतात. मुख्यतः शहरांची क्षेत्रवार (झोन) विभागणी यासाठी केलली असते. जसे मुंबई, दिल्लीसारखी खर्चीक महानगरे ही वरिष्ठ झोनमध्ये, तर वैद्यक खर्च माफक असलेली छोटी शहरे ही निम्न झोनमध्ये असतात. याच क्षेत्ररचनेनुसार प्रीमियमचे दरही जास्त व कमी असतात. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली पॉलिसी कोणत्या झोनमध्ये आहे आणि आपद्प्रसंग ओढवल्यास तु्म्ही उपचार कोणत्या शहरांत अर्थात झोनमधून मिळविला आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे. त्या संबंधाने पॉलिसी दस्तऐवजात कोणतीही मर्यादा अथवा बंधन नाही, हे ध्यानात घेतले जावे.

४. नो-क्लेम बोनसः आरोग्य विम्यामध्ये ‘नो-क्लेम बोनस’ म्हणजे, तुम्ही विम्यावर कोणताही दावा न करता वर्ष पूर्ण केले तर तुम्हाला मिळणारा विशेष लाभ आहे. हा लाभ विमा कवचाच्या रकमेत दरसाल पाच ते २० टक्के वाढ असा साधारण असतो. यातील दुसरा प्रकार अधिक लाभदायी आहे, तो म्हणजे प्रीमियम रकमेवर मिळणारी सूट होय. अर्थात विमा कवचाची रक्कम सारखीच राहते आणि मात्र दावेरहित वर्षात पॉलिसीच्या नूतनीकरणासमयी प्रीमियमवर पाच ते १० टक्के सवलत मिळविता येते.

५. टॉप-अप, रायडर्सः कोणताही आरोग्य विमा खरेदी करताना, योजनेच्या वैशिष्ट्यांची प्रीमियमशी तुलना केली पाहिजे. ॲड-ऑन आणि रायडर्ससह येणाऱ्या योजना थोड्या महाग असतील, परंतु त्या गरज आणि दूरदृष्टीचे नियोजन म्हणून नक्कीच खरेदी कराव्यात. टॉप-अप (Top-Up) हे आणखी एक अतिरिक्त सुरक्षा कवच आहे, जे तुमच्या विद्यमान आरोग्य विमा पॉलिसीला जोडलेले असते. ज्यातून मोठ्या आजारपणांत, मोठ्या खर्चासाठी आर्थिक संरक्षण हे तुलनेने कमी खर्चात मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाता जाता, पुन्हा एकदा ठोस आकडेवारी तपासू. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये सर्वाधिक दावे निकाली गुणोत्तर असून, ते २०२३-२४ मध्ये तब्बल १०३ टक्के होते. अर्थात त्यांच्या वैयक्तिक पॉलिसी दाव्यांचे प्रमाण ९५.७ टक्केच होते, परंतु सरकारी विमा योजना आणि विविध कर्मचारी वर्गासाठी सवलतीतील गट आरोग्य योजनाही त्याच राबवत असतात. परिणामी गोळा केलेल्या प्रीमियमपेक्षा आणि निकाली दावे अधिक अशी त्यांची तोट्याची स्थिती आहे. या उलट खासगी विमा कंपन्यांमध्ये एकूण निकाली दाव्यांचे प्रमाण ८८.७ टक्के, तर सरकारी व्यवसाय पूर्णपणे टाळणाऱ्या स्वतंत्र (स्टँडअलोन) आरोग्य विमा कंपन्यांमध्ये हे प्रमाण २०२३-२४ मध्ये सर्वात कमी ६४.७ टक्के होते.