समीर कुलकर्णी
आपल्याकडे काही वाक्प्रचार प्रचलित आहेत. कर्जमुक्त जीवन म्हणजेच श्रीमंत जीवन. किंवा ऋण काढून सण साजरे करायचे नाहीत वगैरे. हे अगदी लहानपणापासून मनावर बिंबवल्यामुळे बहुतेक लोकांचा भर हा लवकरात लवकर कर्ज फेडण्यावर असतो. एका अर्थी ते बरोबर देखील आहे. आपल्याकडे लोकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठे कर्ज हे गृहकर्ज असते. निवृतीकडे वाटचाल करताना आपल्या डोक्यावरचे हे मोठे कर्ज फेडून आपले घर पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात काही वावगे नाही. मे २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास कुठलाही दंड आकारायला मनाई केल्यापासून तर जेव्हा केव्हा थोडे पैसे साठतील तेव्हा तेव्हा गृहकर्जाचे जास्त हप्ते भरुन लवकरात लवकर ते फेडून टाकायचा निर्णय अगदी योग्य समजला जाऊ लागला. मुदतीपूर्वी हे कर्ज फेडल्यावर लोक देखील अभिमानाने त्याचा उल्लेख चारचौघात करु लागले आणि यालाच आपले आर्थिक यश समजू लागले. 

साठलेल्या पैशांचा असा उपयोग करून पूर्ण कर्ज फेडण्याची ही कामगिरी निश्चितच प्रशंसनीय मानली जाऊ लागली. पण जर गृहकर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर आणि उपलब्ध असलेले विविध गुंतवणुकीचे पर्याय आणि त्यातून मिळणार नफा यांची तुलना केली तर मात्र मुदतीपूर्वी गृहकर्ज फेडण्याचा निर्णय खरंच योग्य आहे का असा प्रश्न पडेल. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, आजच्या घडीला गृहकर्जाएवढे स्वस्त दुसरे कुठलेच कर्ज आपल्याला मिळत नाही. आज १५ ते २० वर्षांचे गृहकर्ज फक्त साधारण ७.२५ टक्के व्याजाने (रिझर्व्ह बँक रेपो दर + २ टक्के) मिळते. त्यामुळे एवढ्या स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या पैशांची परतफेड करायच्या आधी ते गुंतवायचे काय पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा कसा करून घेता येईल ते पडताळून पाहायलाच हवे. म्हणजेच कर्जाला एक बोजा न समजता त्याच्याकडे भांडवल या दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे.

यासाठी, आपण एक उदाहरण घेऊ. समजा किरणने १ कोटी रुपयांचे गृहकर्ज १५ वर्षासाठी ७.२५ टक्के व्याजाने घेतले. यावर मासिक हप्ता (ईएमआय) साधारण ९० हजार रुपयांचा पडेल. पुढे जर किरणने काटकसर करून वाचवलेले पैसे आणि दर वर्षी मिळालेली पगारवाढ, बोनस वगैरे वापरून ८ वर्षात हे कर्ज पूर्णपणे फेडून टाकले तर ती एक कौतुकास्पद कामगिरी ठरेल. किरण दरमहा भरत असलेल्या हप्त्यापैकी सुरुवातीच्या काळात जास्त भाग हा व्याजासाठी वापरला जातो आणि थोडा भाग मुद्दल परतफेड करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जेव्हा कर्जाचा अर्धा कालावधी संपतो तेव्हा केवळ एक तृतीयांश मुद्दलच कमी झालेले असते. त्यामुळे ८ वर्षात पूर्ण मुद्दल फेडण्यासाठी किरणला अतिरिक्त ६५ लाख रुपयांची (१ कोटी मुद्दलाच्या साधारण दोन तृतीयांश) तरतूद करावी लागेल.

आता समजा किरणने आठ वर्षात वेळोवेळी साठवलेले हे ६५ लाख रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी न वापरता लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवले, तर आठ वर्षांनी किरणच्या खात्यात सरासरी २ ते ३ वर्षापूर्वी गुंतवलेले ६५ लाख रुपये असतील. त्यात २-३ वर्षात थोडी वाढही झाली असेल. पुढील ७ वर्ष ही गुंतवणूक किरणला साधारण १२-१२.५ टक्के वार्षिक उत्पन्न मिळवून देईल. १२-१२.५ टक्के हे लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवल्यास मिळणारे सरासरी उत्पन्न आहे. या पर्यायामध्ये किरण १५ वर्ष मासिक हप्ता भरत राहणार आहे. त्यामु‌ळे या ६५ लाख रुपयांवर किरणसाठी व्याजाचा खर्च ७.२५ टक्के आहे. पण त्यावर मिळणारे उत्पन्न जर १२-१२.५ टक्के असेल तर पुढील सात वर्ष ६५ लाख रुपयांवर किरणचा निव्वळ नफा साधारण ५ टक्के असेल. म्हणजेच पहिल्या ८ वर्षांसाठी किरण १ कोटी रुपयांवर ७.२५ टक्के दराने व्याज भरेल पण नंतरच्या ७ वर्षात ६५ लाख रुपयांवर ५ टक्के उत्पन्न कमावेल. त्यामुळे १ कोटी रुपयांच्या कर्जावर १५ वर्षांसाठीच्या व्याजाचा दर प्रत्यक्षात फक्त २.२५ टक्के एवढाच राहील.

वास्तवात मात्र या आकडेमोडीत काही बदलही होऊ शकतात. १५ वर्षांत रेपोदर बदलू शकतो, त्यामु‌ळे गृहकर्जाचा दरही बदलेल. लार्जकॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये मिळणारे उत्पन्न पण कमी जास्त होऊ शकेल. पण पहिल्या ८ वर्षात गुंतवणुकीवर मिळालेले उत्पन्न विचारात घेतले आणि ६५ लाखांपैकी थोडे पैसे फ्लेक्सिकॅप आणि मल्टिकॅप योजनांमध्ये ७ वर्षासाठी गुंतवले (फ्लेक्सिकॅप आणि मल्टिकॅप योजनांसाठी ७ वर्ष ही योग्य कालमर्यादा आहे) तर उत्पन्न आणखी वाढून १ कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याजाचा प्रत्यक्ष दर २.२५ टक्क्यांपेक्षाही आणखी कमी होऊ शकेल.

ही आकडेमोड करण्यामागचा मुख्य उ‌द्देश हा एक नवीन दृष्टिकोन समजावून सांगण्याचा आहे. सगळ्यात स्वस्त कर्जाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेता येईल, याची चर्चा करण्याचा आहे. या पर्यायात केलेली गुंतवणुक केवळ दोन दिवसांत विकता येते. त्यामुळे जर अपेक्षित फायदा नाही झाला किंवा अचानक काही कठीण प्रसंग आले तर तुम्ही कधीही दोन दिवसांत कर्जमुक्त होऊ शकता. अशी गुंतवणूक करून मिळणारे उत्पन्न अर्थातच शेअर बाजार प्रत्यक्ष किती वधरतो त्यावर ठरेल. जरी शेअर बाजारामध्ये तोटा व्हायची शक्यता असली तरी, भारतासारख्या उच्च विकासदर असलेल्या आणि ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) असलेल्या बाजारामध्ये सात वर्षांच्या कालावधीनंतर गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता कमी असेल. पण तरीही थोडीशी जोखीम पत्करायची तयारी असेल तरच या पर्यायाचा विचार गृहकर्जदारांनी करावा आणि कर्जमुक्तीऐवजी अशा गुंतवणुकीतून आर्थिक समजदारीचा मार्ग निवडावा.

लेखक गुंतवणूक सल्लागार असून आस्क अस इन्वेस्ट्मेन्ट्सचे संस्थापक आहेत.