भूषण पडकील– सुरुवात अनेकदा एका लघुसंदेशाने होते. संदेश असा की, ज्यामुळे व्यक्ती विचार करायला लागतात. ‘तुमच्या सिबिल रिपोर्टवर क्रेडिट चौकशी झाल्या’चे आपल्याला एसएमएसद्वारे कळवले जाते. त्यानंतर ईमेलद्वारेही तीच माहिती मिळते. ज्यांनी नुकतेच कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी ही एक सामान्य प्रक्रिया असते, वाटू शकते. पण इतरांच्या मनात यामुळे लगेच प्रश्न निर्माण होतात. माझा रिपोर्ट कोणी तपासला? तो का तपासला गेला? याचा माझ्या सिबिल स्कोअरवर परिणाम होईल का?

कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिकाधिक डिजिटल आणि सोपी झाल्यामुळे हे प्रश्न आता अधिक महत्त्वाचे ठरतात. आज संकेतस्थळ किंवा ॲपवर फक्त काही ‘क्लिक्स’मध्ये क्रेडिट कार्डचा अर्ज, छोटे वैयक्तिक कर्ज किंवा हप्त्यावर (ईएमआय) खरेदीची प्रक्रिया सुरू करता येते. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि त्वरित वाटते. पण या सोयीच्या मागे, कर्ज देणाऱ्या संस्था कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काही औपचारिक तपासणी करतात. त्यापैकीच एक तपासणी म्हणजे अर्जदाराच्या सिबिल रिपोर्टचे पुनरावलोकन करणे होय आणि याच पुनरावलोकनाची नोंद ‘क्रेडिट चौकशी’ म्हणून केली जाते.

सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था कर्जाच्या नवीन अर्जावर विचार करताना संबंधित व्यक्तीचा सिबिल रिपोर्ट पाहते, तेव्हा त्याला ‘क्रेडिट चौकशी’ असे म्हणतात. हा कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे. कर्ज मंजूर करण्यापूर्वी किंवा कार्ड देण्यापूर्वी, कर्जदात्यांना साहजिकच अर्जदाराचा क्रेडिट इतिहास, सध्याची देणी आणि परतफेडीचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ समजून घ्यायचा असतो. या दृष्टीने पाहिल्यास, ही चौकशी काही असामान्य किंवा घाबरवून टाकणारी गोष्ट नाही. कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा हा फक्त एक भाग आहे.त्याच वेळी, हे समजून घेणे उपयुक्त ठरेल की प्रत्येक चौकशीकडे एकाच दृष्टीने पाहिले जात नाही आणि नेमका इथेच अनेकांचा गोंधळ होतो.


चौकशीचे दोन प्रकार समजून घ्या

ढोबळमानाने, चौकशीचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा सिबिल स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट तपासते. तांत्रिक भाषेत याचा अर्थ असा की, ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट’मध्ये (सीआयआर) कोणतेही ‘फूटप्रिंट’ राहत नाहीत आणि सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘सीआयआर’मध्ये याची कोणतीही नोंद किंवा संदर्भ राहत नाही. हे फक्त वैयक्तिक माहितीसाठी केले जाते आणि याचा स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही. खरे तर, वेळोवेळी स्वतःचा रिपोर्ट तपासणे ही एक चांगली आर्थिक सवय आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्रेडिट प्रोफाइलची माहिती राहते आणि आपला कर्जाचा इतिहास कसा दिसत आहे, हे समजण्यास मदत होते.

दुसरा प्रकार म्हणजे त्रयस्थांकडून होणारी तपासणी. जसे कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा अर्ज केल्यानंतर जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था रिपोर्ट तपासते. तांत्रिक भाषेत सांगायचे तर, याचा अर्थ असा की ‘सीआयआर’मध्ये याचे फूटप्रिंट उमटतात आणि सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘सीआयआर’मध्ये याची नोंद किंवा संदर्भ राहतो. वैयक्तिक कर्जदाराने स्वतः केलेल्या चौकशीच्या उलट, या प्रकारच्या चौकशीचा परिणाम सिबिल स्कोअरवर होऊ शकतो.
हा फरक महत्त्वाचा आहे. कारण अनेक व्यक्ती अजूनही असे मानतात की, स्वतःचा रिपोर्ट तपासण्यासह कोणतीही चौकशी स्कोअर खाली आणू शकते. पण तसे नाही. स्वतःचा सिबिल रिपोर्ट पाहणे हा फक्त माहिती घेण्याचा एक मार्ग आहे. ज्या गोष्टीचा स्कोअरवर परिणाम होऊ शकतो, ती म्हणजे कर्जाच्या नवीन अर्जाशी संबंधित कर्जदात्यांकडून केली गेलेली चौकशी.

याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्जाकडे काळजीने पाहिले पाहिजे. व्यक्ती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि पूर्णपणे वैध कारणांसाठी कर्जासाठी अर्ज करतात. गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हे वेगवेगळ्या वेळी गरजेचे ठरू शकतात. ठरावीक काळानंतर केलेले असे काही अर्ज हे सामान्य आर्थिक जीवनाचा भाग आहेत. जेव्हा कमी कालावधीत अनेक अर्ज केले जातात आणि विविध कर्जदाते एकामागून एक रिपोर्ट तपासू लागतात, तेव्हा त्याचा परिणाम अधिक जाणवतो. अशा परिस्थितीत, वारंवार होणाऱ्या अधिक चौकशीमुळे स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

म्हणून, कर्जाच्या गरजेइतकेच, आपण कर्जासाठी कशा प्रकारे अर्ज करतो हेदेखील महत्त्वाचे आहे. घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा नियोजनबद्ध दृष्टिकोन नेहमीच चांगला ठरतो. एकाच वेळी सर्वत्र अर्ज करून काय प्रतिसाद मिळतो याची वाट पाहण्यापेक्षा, विविध पर्यायांची तुलना करणे, गरजा स्पष्टपणे समजून घेणे आणि त्यानंतरच निवडक ठिकाणी अर्ज करणे श्रेयस्कर ठरते. पैशाच्या बाबतीत, थोडा संयम सहसा आपल्या हिताचा ठरतो.

चौकशी विभागाकडे लक्ष देणे का गरजेचे आहे?

व्यक्ती ‘क्रेडिट हेल्थ’चा विचार करतात, तेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त स्कोअरवर असते. पण सिबिल रिपोर्टमधील चौकशी विभागाचे स्वतःचे महत्त्व आहे आणि तो बारकाईने पाहणे आवश्यक आहे. हा विभाग कोणत्या कर्जदात्याने कधी रिपोर्ट पाहिला हे दर्शवतो. ही माहिती किरकोळ वाटू शकते, पण आश्चर्यकारकपणे उपयुक्त ठरू शकते. यामुळे अलीकडील अर्ज आणि त्यानंतर झालेली चौकशी यांचा संबंध जोडण्यास मदत होते आणि कर्ज घेण्याची प्रक्रिया कशी नोंदवली जात आहे, याची स्पष्ट जाणीव होते. या अर्थाने, रिपोर्ट हा फक्त कर्जदात्यांनी वापरलेला दस्तऐवज नाही. तो एक उपयुक्त वैयक्तिक ‘रेकॉर्ड’देखील आहे, जो एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वतःचा क्रेडिट प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो.

कधीकधी, एखादी चौकशी अशा नावाखाली दिसू शकते जी चटकन ओळखीची वाटत नाही. आजच्या काळात जेव्हा बहुतेक कर्ज व्यवहार डिजिटल माध्यमांतून होतात, तेव्हा हे गोंधळात टाकणारे ठरू शकते. एखाद्या व्यक्तीने वस्तूंची खरेदी, झटपट कर्ज देणारे ‘लेंडिंग ॲप’ किंवा संकेतस्थळावरून कर्जासाठी अर्ज केल्याचे त्याला आठवत असेल, पण सिबिल रिपोर्टमध्ये दिसणारे नाव त्या भागीदार बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे असू शकते ज्यांनी प्रत्यक्षात त्या अर्जावर प्रक्रिया केली आहे. ‘बाय नाऊ, पे लॅटर’ उत्पादने आणि तत्सम डिजिटल क्रेडिट सेवांच्या बाबतीतही असेच घडू शकते, जिथे ग्राहकाला दिसणारा ‘ब्रँड’ आणि नियमन केलेली कर्ज देणारी संस्था नेहमीच एकसारखी नसते.


त्यामुळे, जर एखादी चौकशी अनोळखी नावाखाली दिसली, तर याचा अर्थ काहीतरी चुकीचे आहे, असा होत नाही. अनेकदा, हे फक्त पडद्यामागील कर्ज व्यवस्थेची रचना दर्शवते. म्हणूनच आपण अर्ज कुठे केला होता आणि कोणत्या मंचावरून किंवा सेवेद्वारे केला होता, हे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरते. थोडा संदर्भ माहीत असल्यास रिपोर्ट वाचणे आणि समजून घेणे सोपे जाते.

चौकशी ओळखीची वाटत नसेल तर काय करावे?

अनोळखी वाटणाऱ्या चौकशीकडे दुर्लक्ष करू नये, पण त्यामुळे घाबरून जाण्याचेही कारण नाही. पहिली पायरी म्हणजे रिपोर्ट काळजीपूर्वक तपासणे आणि त्या चौकशीचा संदर्भ समजून घेणे. चौकशीच्या तारखेमुळे आठवणीला उजाळा मिळण्यास मदत होऊ शकते. ती अलीकडील कर्ज अर्ज, क्रेडिट कार्डची विनंती, हप्त्यावरील खरेदी किंवा एखाद्या मंचाद्वारे केलेल्या डिजिटल क्रेडिट व्यवहाराशी संबंधित असू शकते, ज्यामध्ये एखादी भागीदार संस्था समाविष्ट असेल.

ही नोंद अद्यापही अलीकडील कोणत्याही क्रेडिट हालचालीशी संबंधित वाटत नसेल, तर पुढची पायरी म्हणजे संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून स्पष्टीकरण मागवावे. तरीही माहिती चुकीची वाटल्यास, सिबिलच्या संकेतस्थळावर (www.cibil.com) किंवा ‘मायसिबिल पोर्टल’द्वारे तक्रार/विवाद नोंदवला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, हा विवाद सोडवणे ही एक विनामूल्य सेवा आहे, त्यामुळे त्रुटी सुधारण्यासाठी किंवा क्रेडिट माहिती अपडेट करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

ही प्रक्रिया कालबद्धदेखील आहे. विहित आराखड्यानुसार, तक्रार प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत तिचे निराकरण करणे आवश्यक असते, ज्यामध्ये बँका किंवा वित्तीय संस्थांना २१ दिवस आणि सिबिलला ९ दिवस मिळतात. त्याच वेळी, हे लक्षात ठेवणे उपयुक्त आहे की संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेच्या पुष्टीशिवाय क्रेडिट रेकॉर्डमध्ये कोणतीही दुरुस्ती, वगळणे किंवा भर घालता येत नाही.

योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास, क्रेडिट चौकशी ही आपल्या एकूण क्रेडिट प्रवासातील केवळ एक नोंद असते. नवीन अर्जाच्या संदर्भात रिपोर्ट कधी पाहिला गेला, याची माहिती ती देते आणि अलीकडील कर्जविषयक हालचाली कालांतराने कशा नोंदवल्या जात आहेत, हे समजून घेण्यास मदत करते.थोडक्यात सांगायचे तर, स्वतःचा सिबिल रिपोर्ट तपासल्याने स्कोअर कमी होत नाही. नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्जांसाठी कर्जदात्यांनी केलेल्या वारंवार चौकशीचा परिणाम होऊ शकतो, विशेषतः जेव्हा असे अनेक अर्ज कमी कालावधीत केले जातात. हा फरक जाणून घेतल्यास कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत अधिक आत्मविश्वास आणि आवश्यक स्पष्टता येते. ज्या आर्थिक वातावरणात कर्ज मिळवणे पूर्वीपेक्षा सोपे आणि जलद झाले आहे, तिथे जागरूकता हेच सर्वात उपयुक्त संरक्षणात्मक साधन ठरते. कधीकधी, ही जागरूकता फोनवर आलेल्या साध्या ‘मेसेज’चा मूळ अर्थ समजून घेण्यापासूनच सुरू होते.