जाऊ द्या हो! मनाला फार लावून घेऊ नका. तुम्ही एकटेच नाही. अगदी भल्याभल्यांचे शेअर बाजारात पैसे जातात. आधी कमी किमतीत शेअर घेतले, जरा भाव वाढल्यावर तुम्ही विकून टाकले. पैसे मिळवले. पण तेव्हा तुमच्या मित्रांनी विकले नव्हते. भाव वाढतच राहिला. मनाला रुखरुख लागली, उगाच लवकर विकले. मित्रांकडून त्याच्या नफ्याचे आकडे ऐकत होता. आता अस्वस्थ वाटू लागले. आपण त्या बोटीत नाही याचे जास्तच वैषम्य वाटू लागले. Fear of Missing Out (FOMO) ची लागण झाली. मग वाढलेल्या भावात पुन्हा दुप्पट समभाग घेतले. भाव वाढत राहिला. बरे वाटायला लागले आणि काय झाले कोणास ठाऊक, अचानक भाव झपाझप उतरायला लागले. कंपनीविषयी उलट-सुलट बातम्या येऊ लागल्या. भाव खरेदीच्या खाली आला. आता हा बॉटम, इथून पुढे वाढतच जाईल या अपेक्षेने थांबला. पण, शेअरच्या आलेखाचे दक्षिणायन काही थांबायला तयार नाही. आता भाव खूपच खाली आला. कंपनीच्या भवितव्याविषयी शंका निर्माण झाली. सहा महिन्यांपूर्वी घ्या म्हणणारे सल्लागार, बाहेर पडलेले बरे म्हणू लागले. म्हणून येईल त्या किमतीला सगळे शेअर विकून टाकले. सगळा व्यवहार आतबट्यात आला.
असंच घडलं ना? आपल्याला कळलं नाही म्हणून खजील झालात? अहो त्यात काय एवढं? ‘न्यूटनचं’ सुद्धा असंच झालं होतं. होय, मी थोर गणिततज्ज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, खगोल शास्त्रज्ञ, रसायन शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दलच बोलतोय. या सगळ्या शास्त्रातील त्यांचे शोध कार्य बघितले तर त्यांना एकेरी संबोधणे बरोबर नाही. पण एक गुंतवणूकदार म्हणून तो काही फारसा वेगळा नव्हता. कारण न्यूटननेच एके ठिकाणी म्हटले की. I can calculate the motion of heavenly bodies but not the madness of the people. आता काय घडले ते सांगतो.
न्यूटन श्रीमंत होता
वर्ष १६९६ मध्ये न्यूटनने केंब्रिजमधील शैक्षणिक पद सोडले. वर्ष १६९९ ते १७२७ पर्यंत न्यूटनने टांकसाळीचा व्यवस्थापक (Warden of Mint) म्हणून काम पाहिले. गंमत म्हणजे केंब्रिजमधील पगाराच्या अनेकपट पगार त्याला वॉर्डन म्हणून मिळत असे. १७२० च्या दरम्यान त्याचे सर्व स्त्रोतापासून वार्षिक उत्पन्न ३,००० पौंडापेक्षा जास्त होते, त्यामुळे तो ब्रिटनच्या तत्कालीन आघाडीच्या १ टक्के लोकात गणला जात असे. घोडागाडी आणि नोकरचाकर पदरी बाळगणारा एक उच्चभ्रू म्हणून न्यूटन ओळखला जात असे. साऊथ सी बबलपूर्वी न्यूटनची एकूण प्रॉपर्टी साधारण ३०,००० पौंडापेक्षा जास्त होती. (आत्ताचे अंदाजे १,०००/१,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणता येतील). न्यूटनला स्थावर मिळकतीमधे फारसा रस नव्हता. त्याची बरीचशी गुंतवणूक रोखे, समभागांमध्ये होती. सांगायचा हेतू असा की, त्या काळात झालेल्या आर्थिक क्रांतीतून आलेल्या नवीन वित्तीय गुंतवणुकीच्या (फायनान्शियल इ नस्ट्रूमेंट्स) पर्यायांबाबत तो अनभिज्ञ होता, असेही नाही. साऊथ सी कंपनीशिवाय त्याची ‘बॅंक ऑफ इंग्लंड’च्या शेअरमध्येही गुंतवणूक होती.
साऊथ सी कंपनी
खरे म्हणजे एका सरकारी आर्थिक विवंचनेतून सोडवणूक करून घेण्यासाठी वर्ष १७११ मध्ये ‘साऊथ सी कंपनीची’ स्थापना झाली. स्पॅनिश वारसा प्रकरणातील युद्धात ब्रिटनचा मोठा सहभाग होता. त्या युद्धकाळात ब्रिटिश सैन्याला मालाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांचे खूप देणे होऊन बसले. ब्रिटिश सरकारला सगळे पैसे देणे काही शक्य नव्हते. मग त्यावर उपाय म्हणून पैशाऐवजी कंत्राटदारांना साऊथ सी कंपनीचे शेअर देण्यात आले. हे शेअर घेण्यासाठी कंत्राटदार तयार व्हावेत म्हणून दोन गोष्टी करण्यात आल्या. एक म्हणजे हे शेअर लिक्विड इनस्ट्रूमेंट स्वरूपाचे म्हणजे ट्रेडेबल (मुक्त हस्तांतरणीय) करण्यात आले. दुसरे म्हणजे हे शेअर गुंतवणूक म्हणून आकर्षक होण्यासाठी कंपनीला व्यापाराची हमी व नफ्याची शक्यता निर्माण करून देणे आवश्यक होते. त्यासाठी साऊथ सी कंपनीला अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा येथे ब्रिटिश व्यापाराचे एकाधिकार (मोनॉपॉली) हक्क देण्यात आले. वर्ष १७२० सालाच्या सुरुवातीला साऊथ सी कंपनीच्या शेअरचा भाव १०० ते १२५ पौंड एवढा होता. जुलैमध्ये तो ९०० ते ९५० पौंड एवढा झाला आणि सप्टेंबरला तो २०० पौंडावर आला. यालाच ‘साऊथ सी बबल’ म्हणून ओळखले जाते. हा खूप मोठा विषय आहे त्यामध्ये शिरायला नको.
‘साऊथ सी’मधील न्यूटनची कमाई
वर्ष १७२० मध्ये हे तीनशे वर्षांपूर्वीचे आर्थिक घातवर्ष (Fatal Year) म्हणून ओळखले जाते. इंग्लंडमध्ये साऊथ सी कंपनी बरोबर तिकडे फ्रान्समध्ये मिसिसिपी योजनेचा सुद्धा बोऱ्या वाजला होता. तर या घातवर्षाच्या सुरुवातीला साऊथ सी कंपनीच्या शेअरचा भाव १३० पौंडाच्या दरम्यान होता. न्यूटनचे बरेचसे शेअर साधारण १०० ते १५० पौंड दराने घेतलेले. न्यूटनची जवळजवळ निम्मी गुंतवणूक साऊथ सीच्या शेअरमध्ये तर बाकीची ब्रिटिश सरकारचे रोखे आणि बॅंक ऑफ इंग्लंडचे शेअरमध्ये होती. वर्ष १७२० च्या मार्चमधे ब्रिटनचे सर्व राष्ट्रीय कर्ज साऊथ सी कंपनीने अधिग्रहण करण्याच्या योजनेला मान्यता मिळाली आणि साऊथ सी कंपनीला वेगळीच भरारी मिळाली. ९ एप्रिलला ‘फ्लाइंग पोस्ट’ नावाच्या एका प्रकाशनात साऊथ सी कंपनीची भलावण करणारा एक लेख छापून आला आणि भाव वाढू लागले. पण २१ एप्रिलला त्या लेखामधील दावे पोकळ असल्याचा एक लेख दुसऱ्या प्रकाशनात छापून आला. त्या काळात लंडनमधील उच्चभ्रू वर्गाच्या शेअरमधील गुंतवणुकीच्या चर्चेच्या बैठकी एखाद्या कॉफी हाउसमध्ये होत असत. २२ एप्रिलला अशीच एक बैठक झाली आणि न्यूटनने २३ एप्रिलला आपले बरेचसे शेअर विकायचा निर्णय घेतला. टप्याटप्याने हे शेअर न्यूटनने ३५० ते ४०० पौंडाच्या दराने विकले आणि त्यामधे बक्कळ नफा कमावला.
दक्षिण समुद्रात न्यूटन कसा बुडाला
एवढ्यावर थांबला तर तो ‘गुंतवणूकदार’ कसला? न्यूटन झाला तरी माणूसच तो! षड् रिपूसहच जन्माला आलेला. शेअरबाजारातला त्रिकालाबाधित घटक ‘हाव’ (Greed) प्रबळ झाला. जून १७२० पर्यंत भाव ७५० पौंडापर्यंत पोचला. न्यूटन चलबिचल झाला. शेअर विकण्याची उगाच घाई केली. आपले चुकले असे वाटू लागले. लोकांच्या नफ्याचे आकडे वाचून अस्वस्थपणा वाढू लागला. बाकीचे सगळे शेअर ठेऊन बसलेत आणि मी मात्र साऊथ सी कंपनीच्या भागधारकांच्या यादीत नाही. शास्त्रीय मेंदूवर भावनिक मेंदूने मात केली. न्यूटनने पुन्हा उडी मारायची ठरवली. जून, जुलै १७२० मध्ये त्याने ७०० ते ८०० दराने आणखी खरेदी केली. पुढील महिन्यापासून दुर्दैव आडवे आले. शेअरचा भाव उतरू लागला. ऑक्टोबर महिन्यात २०० ते २५० भाव झाला. आता आणखी बेईज्जती नको म्हणून ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:’ या सुभाषिताप्रमाणे मिळेल त्या भावाने ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात न्यूटन भरपूर तोटा पदरी घेऊन बाहेर पडला. न्यूटन म्हणतो की, माझे मन तेव्हा भरकटले होते. खरे म्हणजे समाज मनाच्या भाऊगर्दीत त्याची विचारशक्तीच कुंठित झाली होती.
समाज मन ही मेंढ्यांच्या कळपासारखी असते. एक जाईल तिकडे बाकीची जायला लागतात. एक मेंढपाळाचा मुलगा होता, आपण त्याला ‘पांडू’ म्हणू. गणिताच्या सरांनी पांडूला एके दिवशी विचारले ‘समज तुझ्याकडे २० मेंढ्या आहेत. एका मेंढीने कुंपणाच्या पलीकडे उडी मारली तर तुझ्याकडे किती मेंढ्या शिल्लक राहतील?’ पांडूने उत्तर दिले ‘शून्य’. सर चिडून म्हणाले ‘पांडू, काय हे! तुला साधी वजाबाकी येत नाही?’ पांडू म्हणाला ‘होय सर, कदाचित माझे गणित कच्चे असेल, पण मी माझ्या मेंढ्याना पुरता ओळखतो’. (पांडूला पुरते माहीत होते की पहिली गेली म्हणजे बाकीच्याही जाणारच, फरक फक्त दोन चार मिनिटांचाच.) बाजाराची मेंढयांसारखी मानसिकता समजायला गणितापेक्षा ‘पांडू’ची आकलनशक्ती हवी.
न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम
शेअर बाजारात नेहमी एक गोष्ट बोलली जाते ‘जे वर गेलंय ते खाली येतं आणि जे खाली आलंय ते वर जातं’. अर्थात हा सर्व साधारण नियम आहे. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम सांगतो “For every action there is an equal and opposite reaction”. म्हणजे गतीविषयक नियमसुद्धा शेअरबाजाराला लागू पडतो, असं नाही वाटत? बाजारात प्रत्येक ‘खरेदी’ला तेवढीच ‘विक्री’ असते आणि प्रत्येक ‘विक्री’ला तेवढीच ‘खरेदी’ असते. फक्त कधी खरेदी करणाऱ्यांची मानसिकता प्रबळ असते तर कधी विक्री करणाऱ्यांची मानसिकता वरचढ ठरते. त्यावर भाव खालीवर होतो. त्यामुळे फारतर न्यूटनच्या नियमातला ‘equal’ हा शब्द बाजाराला लागू नसेल. गतीविषयक एवढा मोठा नियम सांगणारा शास्त्रज्ञ शेअर व्यवहारात मात्र सपशेल नापास झाला. साऊथ सी कंपनीचे शेअर वर गेले, तसेच ते खाली येऊ शकतील हे न्यूटनच्या नाही लक्षात आले. कारण न्यूटनच म्हणतो तसं ‘I cannot count the Madness of People’
मि. मार्केटची मि. न्यूटनवर मात
वॉलस्ट्रीट जर्नलमधील स्तंभ लेखक जेसन झ्वेग यांनी संपादित केलेल्या बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या ‘The Intelligent Investor’ या पुस्तकात न्यूटनच्या आयुष्यातील या घटनेचा उल्लेख आहे. सुरुवातीला साऊथ सीचे शेअर विकून ७,००० पौंड मिळवणाऱ्या न्यूटनने अतिलोभापाई २०,००० पौंड घालवल्यानंतर उरलेल्या सात वर्षात आपल्या भोवती असणाऱ्या कोणीही ‘साऊथ सी’ हा शब्दसुद्धा उच्चारायचा नाही, अशी तंबीच देऊन ठेवली होती. ‘Sir Isaac Newton, indeed, was in one respect but too like the common race of mortals’ (Isaac Newton : A Biography By Louis Trenchard More -1934.) आणि हे सगळं न्यूटनच्या वयाच्या ८० व्या वर्षी घडलंय. म्हणजे तारुण्याच्या भरात किंवा सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या मन:स्थितीत आधाशीपणा केला असंही नाही. अवकाशातील ग्रहताऱ्यांची खेळी समजणाऱ्या मिस्टर न्यूटनला शेअर बाजारातील मिस्टर मार्केटची खेळी समजलीच नाही. २००५ मध्ये वॉरन बफे यांनी आपल्या गंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, ‘बरेच वर्षांपूर्वी आपल्याला गतीविषयक तीन नियम सांगणाऱ्या न्यूटन यांची उपजत बुद्धी गुंतवणुकीला मात्र गवसणी घालू शकली नाही’. जर हा आघात झाला नसता, तर त्यांनी आपल्याला चौथा नियम दिला असता ‘For Investors as a whole, returns decrease as motion increases’. योगायोग असा की, न्यूटनने आपल्या आयुष्याच्या हिशेबाचे पुस्तक ३१ मार्चलाच बंद केले (३१ मार्च १७२७) त्या निमित्ताने त्याच्या आयुष्याच्या पुस्तकातील एक पान…
-प्रदीप गोखले
pradip.prajakta@gmail.com