श्रीपाद जाधव
भारतात सुवर्ण कर्ज (गोल्‍ड लोन्‍स) आता केवळ “शेवटचा पर्याय” राहिले नसून नियोजित कर्ज पर्याय म्हणून उदयास येत आहे. घरामध्ये पडून असलेले पिढीजात सोने गहाण ठेवून लोक आता गृहकर्ज किंवा विनातारण कर्जाच्या तुलनेत विनासायास, जलद आणि कमी खर्चात कर्ज मिळवत आहेत.

‘सुवर्ण कर्ज आता केवळ आर्थिक संकटावर मात करण्‍याचे साधन राहिलेले नसून स्थिर उत्पन्‍न आणि मालमत्ता असलेले ग्राहक देखील वेळेचे महत्त्व असलेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी तात्पुरते सोने गहाण ठेवून निधी उभा करत आहेत. अल्पकालीन गरजा पूर्ण करण्याचा हा शिस्तबद्ध मार्ग आहे.

सोन्याच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे घरामध्‍ये असलेल्‍या दागिन्यांचे मूल्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे कुटुंबांना त्यांच्या अल्प आणि मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे सोपे झाले आहे. वाढलेल्या किंमतींमुळे सोन्यावर अधिक कर्ज उपलब्ध होत आहे, ज्‍याचा नवीन संधी साधण्यासाठी वापर केला जात आहे. या परिवर्तनामधून किरकोळ कर्जदार सोयीस्कर कर्ज घेण्याला प्राधान्‍य देत असल्‍याचे दिसून येते, जेथे सुवर्ण कर्जासाठी अत्यंत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

पहिली पसंती आणि मोठ्या प्रमाणात स्‍वीकार

सुवर्ण कर्ज घेण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली आले, ज्‍यामुळे सुवर्ण कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या श्रेणीत देखील मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी समाजातील एका मर्यादित वर्गापुरते मर्यादित असलेले हे उत्पादन आता सर्वव्यापी झाले आहे. जलदपणे कर्ज उपलब्‍धता, स्थिरता, सोयीसुविधा व कमी खर्चामध्‍ये कर्ज यांचा शोघ घेत असलेल्‍या पगारदार व्यावसायिक, उद्योजक आणि एचएनआय यांचा कल सुवर्ण कर्जाकडे वाढला आहे, जे व्यवसायाचा विस्तार, मुलांचे शिक्षण, मालमत्तेतील गुंतवणूक किंवा इतर तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुवर्ण कर्जाचा वापर करत आहेत.

खर्च आणि वेळेची बचत हा सुवर्ण कर्जाचा सर्वात मोठा फायदा आहे. सुवर्ण कर्जाचे व्याजदर साधारणपणे विनातारण कर्जाच्या तुलनेत कमी असतात, मंजुरी अत्यंत जलद मिळते आणि परतफेडीचे पर्याय देखील स्थिर असतात. नियोजित आर्थिक गरजांसाठी सुवर्ण कर्ज स्मार्ट साधन आहे. ग्राहकांनी सोने तारण ठेवावे, निधीचा वापर करावा, कर्जाची परतफेड करावी आणि आपले दागिने सन्मानाने परत न्यावेत, इतकी ही प्रक्रिया सोपी आहे.

कर्जाच्या सरासरी रकमेत झालेली वाढ

पूर्वी सुवर्ण कर्जाचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये दिसून येत होता. पण, आता सुवर्ण कर्जाची वाढ सर्वच क्षेत्रांत आणि स्तरांत व्यापक झाली आहे. विशेषतः २ ते १० लाख रुपयांच्या श्रेणीतील कर्जाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे, अनेक ठिकाणी सुवर्ण कर्ज मालमत्ता तारण कर्ज किंवा होम लोन टॉप-अपला पर्याय ठरत आहे. जलदपणे कर्ज मिळण्‍यासाठी ग्राहक सुवर्ण कर्जाला प्राधान्य देत आहेत. ग्राहक आता त्यांचे सोन्याचे दागिने विकण्याऐवजी ‘गहाण ठेवणे’ पसंत करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, दागिने बँकेत गहाण असताना देखील सोन्याच्या बाजारभावात होणाऱ्या वाढीचा फायदा ग्राहकाला मिळत राहतो.

‘आजच्या काळात वेळेचे महत्त्व वाढले आहे. व्यावसायिक कुटुंबं, एमएसएमई आणि एचएनआय यांच्‍याकडे एखादी मोठी संधी साधण्यासाठी फक्त ४८ ते ७२ तासांचा वेळ असतो, तेव्हा काही मिनिटांत मंजूर होणारे सुवर्ण कर्ज त्यांच्या गरजांसाठी अत्‍यंत उपयुक्त ठरते.

सुवर्ण कर्ज प्रमुख मालमत्ता वर्ग का ठरू शकते?

भारतातील घरगुती सोन्याचा साठा ५ ट्रिलियन डॉलरहून अधिक मूल्याचा आहे. यातील मोठा हिस्सा पिढीजात दागिन्यांच्या स्वरूपात आहे, जो बँकांच्या लॉकरमध्ये पडून आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील जवळपास ९० टक्‍के सोन्याचे अजूनही मुद्रीकरण झालेले नाही, म्हणजेच त्याचा आर्थिक व्यवहारात वापर झालेला नाही. संघटित क्षेत्रातील सुवर्ण कर्जाचा आकडा आधीच १५ लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. वाढीच्या बाबतीत या कर्जांनी मालमत्ता तारण कर्जाला मागे टाकले आहे. सुरक्षित रिटेल श्रेणीमध्ये आता सुवर्ण कर्ज गृहकर्जानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत सुवर्ण कर्ज स्वतंत्र आणि प्रमुख मालमत्ता वर्ग म्हणून उदयास येईल.

दागिने विकण्याऐवजी बँकेकडे गहाण ठेवा हा सुशिक्षित आणि आर्थिक समज असलेल्या कुटुंबांसाठी आता साधा नियम बनला आहे. आपली दीर्घकालीन संपत्ती म्‍हणजेच सोने न गमावता संधींसाठी निधी उभा करण्याचा सुवर्ण कर्ज पारदर्शक आणि कार्यक्षम मार्ग आहे.

लेखक कोटक महिंद्रा बँकेच्‍या गोल्ड लोन विभागाचे अध्यक्ष व प्रमुख