वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरोघरी खाद्यपदार्थांचा बटवडा करणारे व्यासपीठ अर्थात आघाडीचे ‘फूड ॲग्रीगेटर’ असलेल्या झोमॅटोची उपकंपनी ‘झोमॅटो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ला रिझर्व्ह बँकेकडून ऑनलाइन देयक व्यवहार प्रणाली चालवण्याचा म्हणजेच ‘पेमेंट ॲग्रीगेटर’ म्हणून व्यवसायासाठी परवाना गुरुवारी बहाल केला.

या मान्यतेमुळे झोमॅटोला तिच्या मंचावरून ई-व्यापार आणि त्या संबंधाने देयक व्यवहाराची पूर्तता सुलभतेने करता येईल. मध्यवर्ती बँकेकडून २४ जानेवारी २०२४ ला मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्याचे कंपनीने बाजारमंचाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. या मंजुरीनंतर झोमॅटो आता ही सेवा देऊ करणाऱ्या टाटा पे, रॅझर पे आणि कॅशफ्री या स्पर्धक कंपन्यांच्या पंक्तीत सामील झाली आहे.

पेमेंट ॲग्रीगेटर अर्थात देयक व्यवहार समूहक हे ई-व्यापार संकेतस्थळ, मोबाइल ॲप आणि व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी देयके स्वीकारण्याची सुविधा देतात. परिणामी व्यापाऱ्यांना त्यांची स्वतःची देयक प्रणाली तयार करण्याची आवश्यकता नाही. पेमेंट गेटवेला या प्रकारची डिजिटल देयक प्रणाली सुरू करण्यासाठी हा परवाना घेणे अनिवार्य आहे.

हेही वाचा >>>Money Mantra : सामान्य करदात्याला बजेटकडून किती अपेक्षा? अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय निघणार?

शुल्कात बचत शक्य

गेल्या वर्षी, झोमॅटोने स्वतःची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा ‘झोमॅटो पे’साठी आयसीआयसीआय बँकेशी सामंजस्य करार केला होता. गूगलपे, फोनपे आणि पेटीएमसारख्या त्रयस्थ देयक ॲपवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. यामुळे झोमॅटोला तृतीय-पक्ष ॲपद्वारे केलेल्या व्यवहारासाठी द्याव्या लागणाऱ्या शुल्कात बचत करणे शक्य होणार आहे. झोमॅटो या खाद्यपदार्थाच्या मंचावर नोंदणीकृत असलेल्या काही रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआयसारख्या विविध पर्यायांचा वापर करून झोमॅटोपेद्वारे पैसे देण्याचा पर्याय देखील उपलब्ध होईल. यापूर्वी, झोमॅटोने को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी आरबीएल बँकेशी भागीदारी करार केली होती. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात ही भागीदारी संपुष्टात आली.

समभागात मात्र घसरण

गुरुवारच्या सत्रात झोमॅटोचा समभाग किरकोळ घसरणीसह १३६.१५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजार भांडवल १.१८ लाख कोटी रुपयांचे झाले आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato payments pvt ltd has been granted permission by rbi to operate an online payment transaction system license print eco news amy
First published on: 26-01-2024 at 05:17 IST