जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असताना, भारताच्या ‘इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम’मुळे देशातील वाहनधारकांना मोठ्या दरवाढीपासून मोठा दिलासा मिळाला असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जर केंद्र सरकारने आणि तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले नसते, तर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १२५ पर्यंत पोहोचले असते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भारतीय बास्केट दर प्रतिपिंप १३५ वर गेला असताना या इथेनॉल मिश्रणाने संरक्षणात्मक ढाल म्हणून काम केले, ज्यामुळे ग्राहकांना प्रतिलिटर सुमारे ३० ची बचत झाली आणि त्यांना पेट्रोल ९४.७७ प्रतिलिटर दराने उपलब्ध होऊ शकले.
मंत्रालयाने जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण (ई-20 पेट्रोल) केल्यामुळे हे शक्य झाले आहे. भारतात उत्पादित होणारे इथेनॉल हे आधीच ठरलेल्या स्थिर किमतींवर खरेदी केले जाते, ज्यामुळे ते आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या चढ-उतारांपासून सुरक्षित राहते. इथेनॉल ब्लेंडिंग ही केवळ रोजच्या दरांशी स्पर्धा करण्यासाठी नसून, जागतिक तेलाच्या धक्क्यांपासून भारतीय ग्राहकांचे रक्षण करणारी आणि भारताची ‘ऊर्जा सुरक्षा’ बळकट करणारी ‘एनर्जी इन्शुरन्स पॉलिसी’ आहे, असे सरकारने याचे समर्थन करताना सांगितले. या प्रणालीमुळे देशाचे परकीय चलन वाचून इंधनावरील खर्च भारतीय अर्थव्यवस्थेतच राहण्यास मदत होते.
ई -२० इंधनाबाबत विरोधी पक्ष आणि काही ग्राहक संघटनांकडून होत असलेल्या टीकेला आणि शंकांना उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, या कार्यक्रमामुळे अन्न सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सार्वजनिक वितरण प्रणालीतील गरिबांसाठीचा तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जात असल्याचे दावे मंत्रालयाने फेटाळून लावले. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत एका अहवालाचा संदर्भ देत सांगितले होते की, वाहनाच्या वयानुसार आणि मॉडेलनुसार E20 मुळे मायलेजमध्ये २ टक्के ते ६ टक्क्यांची किरकोळ घट होऊ शकते. मात्र, देशाचे आयात अवलंबित्व कमी करणे आणि इंधन दर नियंत्रणात ठेवणे यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग हा अत्यंत प्रभावी मार्ग ठरल्याचा दावा सरकारने केला आहे.
