कॅनानास्किस (कॅनडा) : जी-७ शिखर परिषदेदरम्यान झालेल्या भेटीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भारत-अमेरिका संबंधांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. बैठकीनंतर बोलताना ट्रम्प म्हणाले, “मोदी अमेरिकेत खूप पैसा खर्च करत आहेत. आम्ही अनेक प्रकल्पांवर एकत्र काम करत आहोत.”

भारत आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात असून, भारताने अमेरिकेतील ऊर्जा, वाहतूक आणि कृषी क्षेत्रांसह विविध धोरणात्मक क्षेत्रांमध्ये तब्बल ५०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची वचनबद्धता दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित व्यापार कराराबाबतही आशावाद व्यक्त केला. “आम्ही व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत,” असे ते म्हणाले. भारताशी व्यापार चर्चेत चांगली प्रगती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बैठकीत संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि व्यापार यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताकडून अमेरिकेत वाढणारी गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रातील सहकार्य यांचाही उल्लेख चर्चेत झाला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पुरवठा साखळी, ऊर्जा सुरक्षा आणि समुद्री मार्गांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा जागतिक व्यापारावर होणारा परिणाम लक्षात घेता सागरी सुरक्षेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारत-अमेरिका व्यापार करारावर सहमती झाल्यास दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना मिळू शकते. तसेच संरक्षण, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्य आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

मोदी अमेरिकेत कारखाने उभारतायत!”

नुकत्याच पार पडलेल्या जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले. ट्रम्प म्हणाले:

“आमची पंतप्रधान मोदींसोबत अत्यंत सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली आहे. सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक व्यापार करार होत आहेत. अमेरिका सध्या आर्थिकदृष्ट्या सर्वोत्तम कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे, भारताचे पंतप्रधान मोदी अमेरिकेत मोठी गुंतवणूक करत असून येथे अनेक गोष्टी आणि कारखाने उभारत आहेत. ते अमेरिकेत प्रचंड पैसा खर्च करत आहेत आणि आम्ही त्यांच्या या कामाची प्रशंसा करतो.”

मैत्रीचा पुनरुच्चार

डोनाल्ड ट्रम्प यांनी पीएम मोदींसोबतच्या वैयक्तिक संबंधांचा आवर्जून उल्लेख केला. “मोदी हे माझे गेल्या अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले मित्र आहेत. आमच्या दोघांमध्ये नेहमीच उत्तम संबंध राहिले आहेत आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणे हा एक उत्तम अनुभव होता,” असे ट्रम्प यांनी सांगितले.