न्यू यॉर्क : भारतीय कंपन्या आता अमेरिकन बाजारपेठेत केवळ सेवा पुरवण्यापुरत्या मर्यादित न राहता, तिथे मोठे ब्रँड मालक बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यामुळे अमेरिकन ग्राहकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आता बॉलीवूड आणि आयटी क्षेत्राच्या पलीकडे दिसेल,” असा विश्वास ओयोची मूळ कंपनी असलेल्या ‘प्रिझम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. “आता भारताचीच वेळ आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेल्या एका विशेष संवादादरम्यान रितेश अग्रवाल यांनी भारतीय स्टार्टअप्सची ताकद आणि जागतिक बाजारपेठेतील संधींवर प्रकाश टाकला.
भारताचे ‘स्टार्टअप प्राइम मिनिस्टर’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख
रितेश अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘स्टार्टअप पीएम’ असा केला. केंद्र सरकारने शासकीय पाठबळ देत २०१६ मध्ये सुरू केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ मोहिमेमुळे देशातील नवउद्योगांना मोठी गती मिळाली. भारताने पहिल्या पिढीतील (First-Generation) नवउद्योजकांसाठी जवळपास २ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १७,००० कोटी रुपये) भांडवल उपलब्ध करून दिले आहे. ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी आर्थिक मदत देणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. म्हणून रितेश अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांना ‘स्टार्टअप प्राइम मिनिस्टर’ असे संबोधिले. शिवाय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यावसायिक धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंध दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेत ‘ओयो’ची मोठी झेप
ओयोने आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रमक विस्तार केला असून, आता त्यांचा सर्वाधिक जागतिक व्यवसाय अमेरिकेतून होत आहे. २०२४ मध्ये ओयोने ५२५ दशलक्ष डॉलर्स खर्च करून उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी हॉटेल शृंखला असलेल्या ‘मोटेल ६’ची (Motel 6) मूळ कंपनी ‘जी६ हॉस्पिटॅलिटी’चे अधिग्रहण केले होते. या ऐतिहासिक खरेदीमुळे ओयो आता अमेरिकेतील इकॉनॉमी हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठी ब्रँड मालक बनली आहे., असे रितेश अग्रवाल यांनी माहिती दिली.
तंत्रज्ञानामुळे चित्र बदलणार
“भविष्यात युरोपियन आणि आशियाई ब्रँड्सप्रमाणेच भारतीय कंपन्याही अमेरिकेत ग्राहक-केंद्रित व्यवसायांमध्ये मोठी गुंतवणूक करताना दिसतील. अमेरिकन नागरिक रोजच्या जगण्यात भारतीय ब्रँड्सचा वापर करतील आणि हे सर्व तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे,” असे अग्रवाल म्हणाले. अमेरिकेतील घरांची टंचाई दूर करण्यासाठी हॉटेल आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या सुवर्णमध्यावर आधारित नवीन ‘एक्सटेंडेड स्टे’ मॉडेलवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
संवादातील महत्त्वाचे मुद्दे :
- ‘प्रिझम’चा ६,६५० कोटींचा आयपीओ : ओयोची पालक कंपनी असलेल्या ‘प्रिझम’ला शेअर बाजारातील नियामक संस्था ‘सेबी’कडून ६,६५० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठी मंजुरी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा संवाद पार पडला. कंपनीने डिसेंबर २०२५ मध्ये गोपनीय मार्गाने यासाठी अर्ज केला होता.
- एलॉन मस्क आणि अपयशाचा उत्सव : स्पेसएक्सच्या आगामी आयपीओबद्दल बोलताना अग्रवाल यांनी एलन मस्क यांच्यासोबतच्या एका भेटीची आठवण सांगितली. एका रॉकेट लॉन्चिंगच्या अपयशानंतरही मस्क अजिबात विचलित झाले नव्हते. “अपयशाचा उत्सव साजरा करणे आणि त्यातून शिकणे मी मस्क यांच्याकडून पाहिले,” असे अग्रवाल म्हणाले.
