मुंबई: राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या राज्याच्या गृहविभागाच्या शासन निर्णयाला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम योजनेअंतर्गत मंजूरी दिली गेलेले १,७६८ कोटींच्या कर्जाची उभारणी बँकेमार्फत केली जाणार आहे.
बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जातून राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ राज्यातील हजारो पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मिळणार आहे. शासनाने यापूर्वी ९७८१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्राप्त झालेल्या घरबांधणी अग्रिम प्रस्तावाच्या आधारे आणखी ५४५९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
याकरिता गृहनिर्माण मंडळाने सर्व क्षेत्रातील बँकांकडून निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये अनेक राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांनी भाग घेतला. परंतु या सर्वांमध्ये कमीत कमी व्याजदर व इतर आकर्षक अटी व शर्तींच्या आधारे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेची निविदा सर्वश्रेष्ठ ठरली, अशी माहिती बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
