PPF NPS Safe Government Investment Schemes : श्रीमंत व्हायचं म्हटलं की शेअर बाजारातील ‘मल्टीबॅगर’ शेअर्स, म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ यांना पर्याय नाही, असे अनेकदा सांगितले जाते. सोशल मीडियावरही इक्विटी बाजारातील गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा फंड जमा केलेल्यांचे गुणगान पाहायला मिळते. मोठा कॉर्पस जमा करायचा म्हटलं की जोखीम घ्यावीच लागते, या विचाराला एका ४५ वर्षीय शिक्षकाने छेद दिला आहे. दिल्ली येथील नरेश भारद्वाज यांनी केवळ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करत ५० व्या वर्षी निवृत्ती आणि दरमहा १ लाख पेन्शन मिळण्याची व्यवस्था केली आहे.

नरेश यांनी आयुष्यात कधीही थेट शेअर बाजारात पैसे गुंतवले नाहीत, त्यांच्याकडे एकही म्युच्युअल फंड नाही किंवा कोणतीही फिक्स्ड डिपॉझिट नाही. तरीही, ५०व्या वर्षी (वर्ष २०३१ मध्ये) ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणि दरमहा सुमारे १ लाख रुपयांच्या पेन्शनसह मुदतीपूर्व निवृत्ती घेण्याचे त्यांचे नियोजन साध्य होत आहे.

सोपे आणि शिस्तबद्ध तंत्र!

आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीविषयी नरेश म्हणतात, “गुंतवणुकीत सोप्या गोष्टीच सर्वोत्तम असतात. जे प्रॉडक्ट्स आपल्याला समजत नाहीत, त्यांच्या मागे कधीही धावू नये.” नरेश यांनी मार्च २००६ मध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये खाते उघडले आणि जून २००९ मध्ये नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक सुरू केली. गेल्या २ दशकांपासून या दोन सरकारी योजनाच त्यांच्या आर्थिक नियोजनाचा मुख्य आधार राहिल्या आहेत.

नरेश भारद्वाज यांचे पोर्टफोलिओ गणित (२०३१ चे उद्दिष्ट)

  • पीपीएफ निधी : नरेश यांच्या पीपीएफ खात्यात सध्या सुमारे ८० लाख रुपये जमा असून २०३१ पर्यंत१ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी त्यात जमा होईल. पीपीएफच्या अंतिम रकमेवर कोणताही कर लागत नसल्याने हे संपूर्ण पैसे टॅक्स फ्री आहेत.
  • एनपीएस निधी : निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळावी यासाठी एनपीएसमध्ये गुंतवणूक सुरू असून, सध्या सुमारे १.१ कोटी रुपये त्यात जमा झाले आहे. २०३१ पर्यंत ही रक्कम २.१५ कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. यातूनच पुढे त्यांना महिना १ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकेल.
  • ईपीएफ निधी : २०३१ पर्यंत ईपीएफ खात्यात अंदाजे २ कोटी रुपये जमा करण्याचे त्यांचे ध्येय आहे. हा निधी निवृत्तीसाठी न वापरता मुलाच्या उच्च शिक्षणासाठी सुरक्षित ठेवला आहे.

सामान्यांसाठी या यशोगाथेतून ५ महत्त्वाचे धडे

अनेक लोक महिन्याच्या खर्चातून बचत झालेल्या पैशांची गुंतवणूक करतात. नरेश यांनी ही व्याख्या उलट केली. पगार होताच आधी ठरलेली रक्कम गुंतवणुकीत जमा करायची आणि उरलेल्या पैशांतून घरखर्च चालवायचा, हा नियम ते २० वर्षांपासून नियमित पाळत आहेत.

स्टॉक्स निवडण्याऐवजी तज्ज्ञांकडे जबाबदारी सोपवणे
थेट शेअर्स न खरेदी करता त्यांनी एनपीएसची निवड केली. एनपीएसमधील पैसा ऑटोमॅटिकली इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे थेट बाजाराचा ताण न घेता त्यांना सरासरी १२% वार्षिक परतावा मिळत गेला.

चक्रवाढ व्याजाची ताकद

पीपीएफचा व्याजदर सध्या ७.१ टक्के असला तरी या योजनेत चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. २००६ पासून सलग २० वर्षे वर्षाला कमाल १.५ लाख रुपये गुंतवले आणि मुदत संपल्यानंतर आणखी ५ वर्षे वाढ केल्यामुळे हा निधी आज ८० लाखांच्या पार पोहोचला आहे.

कर बचतीचा स्मार्ट वापर

पीपीएफच्या माध्यमातून कलम ८०सी अंतर्गत त्यांनी दरवर्षी सुमारे ४५,००० रुपयांचा आयकर वाचवला. गेल्या २० वर्षांत त्यांनी केवळ कर बचतीतूनच १० लाख रुपयांचा फायदा मिळवला.

प्रत्येक निधीला एक स्वतंत्र काम देणे

नरेश यांनी आपल्या आर्थिक उद्दीष्टांनुसार वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. ईपीएफचा २ कोटींचा निधी हा केवळ ‘मुलाच्या उच्च शिक्षणासाठी’ राखीव ठेवला आहे, ज्यामुळे निवृत्तीच्या ३ कोटींच्या बजेटला धक्का लागणार नाही.

दरमहा १ लाख रुपयांची पेन्शन कशी मिळेल?

वयाच्या ५०व्या वर्षी मुदतीपूर्व निवृत्त होत असताना एनपीएसच्या नियमानुसार ८०% रक्कम ही ‘ॲन्युइटी’ खरेदी करण्यासाठी वापरावी लागेल आणि २०% रक्कमच रोख काढता येते. नरेश यांच्या २.१५ कोटी रुपयांपैकी ८०% रक्कम (सुमारे १.७२ कोटी रुपये पेन्शन योजनेत गुंतवले जातील, ज्यातून ७% अंदाजित दराने दरमहा १ लाख रुपये पेन्शन सुरू होईल. तर २०% रक्कम म्हणजे सुमारे ४३ लाख रुपये त्यांना रोख स्वरूपात मिळतील.

“माझा परतावा कदाचित शेअर बाजारापेक्षा कमी असेल, पण मला रात्रीची शांत झोप हवी होती,” असे नरेश नम्रपणे सांगता. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेहमी सर्वात जास्त परतावा देणाऱ्या योजनेच्या मागे धावण्याची गरज नसते; तर आपल्याला समजणाऱ्या योजनेत सलग २० वर्षे शिस्तबद्ध राहणे हाच खरा यशाचा मंत्र आहे.