मुंबई: देशातील प्रमुख खासगी बँकांमध्ये अचानक वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्गममनाची मालिका सुरू असून, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांनी नव्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शोधाची प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि यामुळे बँकांच्या दीर्घकालीन धोरणांतील सातत्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या घडामोडींचा बँकांच्या भागभांडवलावर आणि मूल्यमापनावर नकारात्मक परिणामाने भागधारकांमध्ये अस्वस्थता आहे.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या ‘एचडीएफसी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी शशीधर जगदीशन यांनी पुढील महिन्यांत त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर पुनर्नियुक्ती घेणार नसल्याची घोषणा केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेल्या सहा महिने अगोदर नावे सुचवण्याच्या नियमाची पायमल्ली झाली असून, अचानक नेतृत्व बदलाचे संकट ओढावले आहे.
या दुसऱ्या एका प्रमुख बँकेतही ३ वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर मुख्याधिकारी अशोक वासवानी यांनी डिसेंबरमध्ये पायउतार होण्याची घोषणा केल्याने विश्लेषक आणि गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत. फिनो बँकेचे मुख्याधिकारी ऋषी गुप्ता यांना फेब्रुवारीमध्ये ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) कायद्यांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. अटकेनंतर लगेचच, बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी केतन मर्चंट यांची हंगामी प्रमुख म्हणून बँकेने नियुक्ती केली.
या महिन्याच्या सुरुवातीला, उज्जीवनचे मुख्याधिकारी संजीव नौटियाल यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे संचालक मंडळाला त्यांच्या जागी नवीन व्यक्ती शोधणे भाग पडले. स्टेट बँकेचे माजी उप-व्यवस्थापकीय संचालक असलेले नौटियाल यांची १ जुलै २०२४ पासून तीन वर्षांसाठी उज्जीवनच्या मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, कोटक महिंद्र बँक आणि फिनो पेमेंट बँकेवर नव्या प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने जगदीशन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी गती दिली जात असल्याचे म्हटले आहे.
निवडीची प्रक्रिया कशी?
प्रक्रियेनुसार, बँकेचे संचालक मंडळ सर्वोच्च कार्यकारी पदासाठी काही नावांची निवड करते. एकदा अंतिम निर्णय झाल्यानंतर, निवडलेली नावे मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवली जातात. सखोल तपासणीनंतर रिझर्व्ह बँक नावांना मंजुरी देते. नव्या पिढीच्या खासगी बँकांच्या दिग्गज संस्थापकांच्या निवृत्तीनंतर आणि फिनटेक कंपन्यांकडे उत्तम प्रतिभेचे पलायन झाल्यामुळे बँकांना नेतृत्त्वक्षम उमेदवारांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या वेतनविषयक कठोर नियमांमुळेही वरिष्ठ पातळीवर भरती आव्हानात्मक ठरली आहे.
